रामायणातील रामाच्या लोकप्रियतेचा फायदा खुद्द राजीव गांधी यांनीही घेतला होता

“मला याआधी राजकारण कळत नव्हतं. पण मला जे वाटतं ते मी करून टाकतो. आता मला देशासाठी काहीतरी करायचं आहे. आणि भाजपा हा सगळ्यात चांगला पर्याय आहे.

पहिल्यांदा मी पाहिलं की ममता बॅनर्जी यांना जय श्री राम या घोषणेची ॲलर्जी झाली. जय श्रीराम फक्त एक घोषणा नाही”

हे वाक्य आहेत रामायणातील रामाची. यातील रामायण होतं ते रामानंद सागर यांच आणि रामाचे रोल साकारणारे व्यक्ती होते. अरुण गोविल. काल गुरूवारी अरुण गोविल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

यापूर्वी खुद्द रामायण सिरीयलमधले रावणाची भूमिका करणारे देखील भाजपकडून खासदार झाले होते. खालील लिंकवर क्लिक करुन ती स्टोरी तुम्ही वाचू शकता.

तुर्तास विषय रामाचा आहे. तर रामायणातील राम अर्थात अरुण गोविल यांची एकेकाळात अशी लोकप्रियता होती की खुद्द राजीव गांधींनी देखील त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेतला होता.

ही गोष्ट आहे १९८८ सालची.

तेव्हा बोफोर्स तोफेचं प्रकरण गाजत होत. अगदी दोन-तीन वर्षापूर्वी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांना सगळ्या आघाडीवर विरोधकांनी घेरल होतं. बोफोर्सच्या लिंक्स अगदी राजीव यांच्या बायकोच्या माहेरपर्यंत पोहचले आहेत असे आरोप होत होते. राजकारणात अननुभवी असणाऱ्या राजीवना या आरोपांना उत्तर देण जमलेलं नव्हतं.

अशातच त्यांचे बालपणापासूनचे जिगरी मित्र सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचही नाव या घोटाळ्यात आलं.

अमिताभ हे तेव्हा अलाहाबाद मतदारसंघातून खासदार होते. १९८४ साली तिथे ते विक्रमी मतांनी निवडून आले होते. पण बोफोर्समुळे राजकारणाला रामराम ठोकण्याचा निर्णय बच्चननी घेतला.

त्यांच्या राजीनाम्यामुळे मोकळ्या झालेल्या अलाहाबादच्या जागेवर पोटनिवडणूक होणार होती.

स्वर्गीय जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री याचं हे गाव. काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला. शास्त्रीजी तिथे अनेक वर्ष निवडून येत होते. आता तिथे बोफोर्स मुद्द्यावरून राजीव गांधी यांच्या सरकारमधून बाहेर पडलेले अर्थ व संरक्षणमंत्री व्ही.पी. सिंग काँग्रेसविरुद्ध निवडणुक लढवणार होते. गेल्या काही दिवसात त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली होती.

व्ही.पी.सिंग यांना कोण पाडणार हा प्रश्न राजीव गांधींना रात्रंदिवस छळत होता.

एक दिवस टीव्ही बघताना त्यांना राम आठवला!!

त्याकाळात दूरदर्शनवर रामायण सिरीयल अगदी जोरात सुरु होती. दररोज संध्याकाळी लोक भक्तीभावाने टीव्हीसमोर येऊन बसायचे. त्याकाळात अख्या देशातले रस्ते सुनसान पडायचे. रामाची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल यांना तर लोक खरोखरच राम समजत होते.

अरुण गोविल एकदा गुजरातमध्ये गेले असता काही जणानी त्यांचे पाय धुवून त्यावर डोक टेकवल होतं. घरोघरी देवघरात अरुण गोविल यांचा फोटो भगवान राम म्हणून पुजला जात होता.

उत्तरप्रदेशमध्ये रामाची भक्ती अफाट होती. अजूनही आहे. जर या रामालाच उभ केलं तर व्हीपीसिंग यांचा पराभव अगदी सहज होईल असा सल्ला पंतप्रधानांना त्यांच्या जवळच्यानी दिला. राजीव गांधीनी अरुण गोविल यांना तशी विचारणा केली.

पण गोविल अगदी शांत व साध्या स्वभावाचे होते. त्यांना माहित होते राजकारण आपल्याला झेपणार नाही. पण प्रचाराला येण्यास त्यांनी संमती दिली.

शेवटचा उपाय म्हणून लालबहादूर शास्त्री यांचे चिंरजीव सुनील शास्त्री यांना कॉंग्रेसने तिकीट दिले. राजीव गांधीनी प्रचाराला रामाला पाचारण केलं. अरुण गोविलना पाहायला गर्दी झाली. पण त्याच मतात रुपांतर झालं नाही. ही निवडणूक लढवून दलित नेते कांशीराम यांनी सुद्धा राजकारणात प्रवेश केला होता.

व्हीपी.सिंग यांनी तब्बल एक लाख मतांनी विजय मिळवला. या निवडणुकीने सिद्ध केलं की राजीव गांधींचा पडता काळ सुरु झाला होता.

व्ही.पी. सिंग पुढे त्यांना हरवून पंतप्रधान बनले.

निकालानंतर भाजपचे जेष्ठ नेता लालकृष्ण अडवाणी यांनी या निवडणुकीच्या प्रचाराचा त्यांना ऐकायला मिळालेला एक किस्सा पत्रकारांना सांगितला.

इथल्या प्रचारावेळी अरुण गोविल यांचं स्वागत थोडसं थंडपणे करण्यात आलं. अरुण गोविल यांना ते थोडसं अनपेक्षित होतं. काही तरी गडबड आहे हे त्यांना जाणवलं. आपल्या भाषणावेळी बोलताना ते म्हणाले,

“लोक जिथे मी जाईन तिथे मला राम म्हणून सन्मान करतात. पण खरा राम मी नाही. खरा राम आहेत राजीव गांधी.”

या भाषणामुळे तिथे जमलेली जनता चिडली. त्यांनी तिथेच आरडाओरडा करून अरुण गोविल यांच्या वक्तव्याचा निषेध केला. काँग्रेसने रामायणाचा आपल्या राजकारणासाठी वापर केलेला जनतेला आवडला नाही आणि त्यांनी मतपेटीतून हे दाखवून दिले असं अडवाणी याचं मत होतं.

मात्र पुढच्या काहीच दिवसात रामजन्मभूमीच आंदोलन भारतभर पसरवणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांनी रामायण सिरीयलमध्ये सीतेचा रोल करणाऱ्या दीपिका चिखलीया यांना व रावणचा रोल करणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांना गुजरातमधून लोकसभेच भाजपच तिकीट दिल आणि निवडूनही आणलं, आणि आत्ता राम असणाऱ्या अरुण गोविल देखील भाजपमध्ये दाखल झाले.

रामायण आणि त्याची सिरीयलची जादू एवढी जनमानसात पसरली होती की त्याचा राजकारणात वापर करण्याचा मोह सगळ्या पक्षांना झाला होता, विशेष म्हणजे हा मोह आजसुद्धा आवरता येवू शकत नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.