रजत शर्मा यांना फी भरायला पैसे नव्हते, तेव्हा अरुण जेटलींनी त्यांना मदत केली होती

दोस्ती. हा असा शब्द आहे भिडू ज्यावर प्रत्येकजण भरभरून लिहू शकतो. कारण म्हणतात ना, ज्या गोष्टी आपल्या घरच्यांना सुद्धा माहित नसतात त्या आपल्या दोस्तांना माहित असतात. या दोस्तीवर बरीच गझलं झाली, गाणी आली आणि चित्रपट आले. ज्यातून जय बिरू पासून सोनू टीट्टू पर्यंत अनेकांच्या मैत्रीचे किस्से फेमस झाले.

अश्याचं मैत्रीचं एक उदाहरण म्हणजे रजत शर्मा आणि अरुण जेटली

प्रसिद्ध पत्रकार रजत शर्मा. जे ‘आप कि अदालत’ या एका न्यूज चॅनेलच्या मुलाखतींच्या शोमधून घरा-घरात पोहोचलेत. भारताच्या प्रसिद्ध आणि सार्वधिक मानधन घेणाऱ्या पत्रकारांच्या यादीत रजत शर्मा हे नाव घेतलं जात.

आज लाखोंचा पगार घेणारे रजत शर्मा यांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थती  एकेकाळी फार बेताची होती. दहा भाऊ -बहिणींचा मोठा परिवार होता, जुन्या दिल्लीत एका छोट्या खोलीत राहायचा. पण अभ्यासात एकदम हुशार असल्यामुळं रजत शर्माचं इंटर नंतर श्रीराम महाविद्यालयात प्रवेशासाठी मेरिट लिस्ट  मध्ये नाव  आलं. 

तो १९७३ चा काळ होता. त्यावेळी दिवंगत अर्थमंत्री अरुण जेटली सुद्धा याच महाविद्यालयात शिकायला होते. त्यावेळी जेटली कॉलेज युनियनचे अध्यक्ष होते. घरची आर्थिक परिस्थती एकदम चांगली.

आता एवढं मोठं कॉलेज म्हंटल्यावर फी सुद्धा तेवढीच असणार. तर कॉलेजच्या पहिल्याच दिवशी रजत कॉलेजमध्ये इकडून तिकडं नुसती येरझाऱ्या मारत होते, कारण जेवढी कॉलेजची फीज होती. तेवढे पैसे रजत शर्माकडे नव्हते. ह्या ऑफिसातून त्या ऑफिसात अश्या फेऱ्या मारून रजत फी भरण्याच्या रांगेत उभे राहिले. 

दोन- दोन, पाच- पाच रुपयांचा जुगाड करून रजतने फीचे पैसे गोळा केलेले. अखेर  फी भरण्याच्या रांगेत उभ्या असलेल्या रजतचा नंबर आला. तो त्या लेखापालापुढं दोन- दोन, पाच- पाच रुपयांचे चिल्लर मोजायला लागला.

पण ही फी सुद्धा पूर्ण नव्हती. एकूण फीच्या रकमेपैकी त्यावेळी ४ रुपये कमी होते. यावर आधीच संतापलेल्या लेखापालाने रजत शर्मावर ओरडायला सुरुवात केली. आधीच फी भरायला पैसे नव्हते, कसातरी आटापिटा करून पैसे जमा केले, त्यातही ४ रुपये कमी आणि वर या लेखापालाची फुकटची बोलणी सुरु होती. 

रजत शर्माला काय करावं सूचना. कारण जीवाचा एवढा आटापिटा करून अभ्यास केलाय, तेव्हा कुठं एवढ्या मोठ्या कॉलेजात अॅडमिशन मिळालीये आणि ४ रुपयासाठी आपलं अॅडमिशन हुकतंय का काय ही भीती रजत शर्माला होती.

मनात एवढ्या सगळ्या गोष्टींचा गोंधळ सुरु होता आणि लेखापालची बडबड सुरूच होती. अश्यात मागून एक आवाज आला…

नए छात्र से बात करने का यह क्या तरीका है

तो आवाज होता अरुण जेटली यांचा. फीला पैसे कमी पडतायेत हे समजल्यावर अरुण जेटलींनी आपल्या खिश्यातुन ५ रुपये काढले आणि त्या लेखापालाला दिले. ज्यामुळं रजतचं अॅडमिशन फिक्स झालं. 

आपली पूर्ण फी भरली हे पाहून सुटकेच्या  श्वास घेणाऱ्या रजतच्या डोळ्यात अरुण जेटलींबद्दल आदर स्पष्टपणे दिसत होता. अरुण जेटलींनी सुद्धा नंतर रजत शर्माच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हंटल, ‘तुझ्याकडे चहासाठीही पैसे नसतील, चल मी तुला चहा देतो.’

असे म्हणत या दोघेही चहा प्यायला गेले आणि जेटली- शर्मा यांच्या  मैत्रीला सुरूवात झाली. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.