मोठ्या पगाराची नोकरी सोडून मूर्तिकार झाला, आज त्यानंच सुभाषचंद्र बोस यांची मूर्ती साकारली…

इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलेली पोरं बरेचदा भलत्याच क्षेत्रात काम करत असतात हे काय आपल्याला नवीन नाय. चारातला एक तर असा सापडतोच. पण आजची गोष्ट आहे MBA केलेल्या एका भन्नाट कलाकाराची. चांगली रग्गड पैसे कमवून देणारी नोकरी सोडून या कलाकाराने अख्ख्या देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केलीये.

८ सप्टेंबरला दिल्लीच्या इंडिया गेटवर, देशाचे महान स्वतंत्र्यसेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा २८ फुट उंच पुतळा उभारण्यात आला. आणि या पुतळ्याचं अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं . 

हा पुतळा बनवलाय मैसूरच्या अरुण योगिराज यांनी

विशेष म्हणजे MBA चं शिक्षण पूर्ण केलेल्या अरुण योगीराज यांनी आपली कला जोपासण्यासाठी कॉर्पोरेट नोकरी सोडली आणि आयुष्यात काहीतरी कमावण्यासाठी सोप्पा सोडून खडतर मार्ग निवडला. अरुण योगीराज यांना मूर्तीकलेचं बाळकडू त्यांच्या वडिलांकडून मिळालं.

ते आपल्या वडिलांना दगड कोरत असताना बरेचदा पाहायचे. ते चवदा वर्षांचे असताना त्यांना आपणही आपल्या वडिलांना मदत करावी अशी इच्छा झाली आणि त्यांच्या मूर्तिकलेच्या प्रवासाला सुरवात झाली. मात्र त्यांच्या आईची, आपल्या मुलाने मूर्तिकाम करावं अशी आजिबात इच्छा नव्हती. अरुण योगीराज यांच्या आईने त्यांच्या वडिलांचे कष्ट जवळून पाहिले होते त्यामुळे आपल्या मुलाने सुद्धा असेच कष्ट उपसावेत असं त्यांना अजिबात वाटत नव्हतं.

आईने केलेल्या विरोधाचा आदर आणि वडिलांना कामात मदत अशा दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी अरुण योगीराज हे शिक्षण घेता घेता मूर्तिकाम करत राहिले. मैसूर विद्यापीठातूनच त्यांनी आपलं एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं. शिवाय आपल्या आईच्या इच्छेखातर त्यांनी एका प्रायवेट कंपनीमध्ये एचआरचं कामही केलं.

पण नंतर या सगळ्यात अरुण योगीराज यांची प्रचंड तारांबळ उडत असल्याचं आणि त्यांचं या कामात अजिबात मॅन लागत नसल्याचं त्यांच्या आईच्याही लक्षात आलं आणि त्यांच्या आईने त्यांना पूर्णवेळ मूर्तिकाम करण्यासाठी परवानगी दिली.

मूर्तीकाराला दगडांमध्ये राहून आपलं आयुष्य घडवायचं असतं.

मूर्तीकरांचं आयुष्य सुद्धा काही सोपं नसतं. दिवस रात्र एक करणारे लोकं चांगले मूर्तिकार बनतात. मूर्तिकार होण्यासाठी अंगी कला असणं तर महत्वाचं आहेच पण त्याचबरोबर ध्येय, जिद्द, चिकाटी हे गुण असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे याची प्रचिती अरुण योगीराज यांना संपूर्णपणे मूर्तीकामात उतरल्यावर आली.

अरुण योगीराज यांनी आजवर हजारहून अधिक मुर्त्या आणि पुतळे बनवले आहेत पण नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा हा २८ फुट उंच पुतळा बनवणं सगळ्यात कठीण काम होतं. 

फक्त ऊंची हे एक कारण नाही तर हा पुतळा बनवणं हे कठीण काम होतं कारण हा अख्खा पुतळा ग्रॅनाईट या दगडापासून बनवण्यात आला आहे. ग्रॅनाईट चा दगड म्हणजे एक असं मिडियम आहे जिथे तुम्हाला तुमची चूक सुधारायची संधी सुद्धा मिळत  नाही. चिकणमाती किंवा ब्रासमध्ये तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला काम करत असताना एखादी चूक झालीच तर ती दुरुस्त करण्याची संधी मिळते पण ग्रॅनाईट दगडाच्या बाबतीत तसं होत नाही.

त्यामुळे तुमचं काम परफेक्टच असावं लागतं नाहीतर मोठं नुकसान पचवण्याची तयारी असावी लागते. पण अरुण योगीराज यांनी हे चॅलेंज स्वीकारलं आणि ७५ दिवसांत ४८ सहकालाकारांसोबत दिवस रात्र एक करत  हा पुतळा बनवून तयार केला. हा पुतळा तयार करण्याचं काम तब्बल २६ हजार तास चाललं असं अरुण योगीराज सांगतात.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बनवण्यासाठी या वर्षाच्या सुरुवातीपासूनच म्हणजे जानेवारी महिन्यापासून देशभरातून सात कलाकारांना बोलावण्यात आलं होतं, आणि त्यांच्यापैकीच अरुण योगीराज हे एक होते. मूर्तीकलेचं विशेष ज्ञान आणि दांडगा अनुभाव गाठीशी असल्यामुळे नेताजी सुभाष चंद्र बोस या महान व्यक्तीचा पुतळा साकारण्याची इतकी मोठी जबाबदारी अरुण योगीराज यांच्यावर सोपवण्यात आली.

 नंतर पुढे अरुण योगीराज यांच्या हाताखाली पुतळा साकारण्यासाठी देशभरातल्या म्हणजेच आंध्रप्रदेश, तामिळनाडू, राजस्थान अशा अनेक ठिकाणांहून प्रसिद्ध मूर्तीकारांना बोलावण्यात आलं होतं. 

याविषयी माध्यमांशी बोलताना अरुण योगीराज म्हणतात, नुकतच म्हणजेच अवघ्या दहा महिन्यापूर्वीच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे ज्यांच्याकडून त्यांनी ही मूर्तीकला आत्मसात केली तेच त्यांचे वडील आज त्यांचं इतकं मोठं यश पाहायला या जगात नाहीत या गोष्टीची अरुण योगीराज यांना खंत वाटते.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.