पहिली मेड इन इंडिया लिमोझीन सरकारी धोरणांमुळे रस्त्यावर उतरू शकली नाही.

आजकाल स्वदेशी वस्तू वापरायचा प्रचार सुरु आहे. अगदी मोबाईल फोन पासून ते कार पर्यंत प्रत्येक गोष्ट मेड इन इंडिया आहे का हे चेक करायचा अनेकांचा आग्रह असतो. खुद्द भारताचे पंतप्रधान आपल्या वेगवेगळ्या योजना आणून मेड इन इंडिया आणि ते जमत नसेल तर कमीत कमी मेक इन इंडिया सारख्या गोष्टींना प्रोत्साहन देत आहेत.

पण एक काळ असा होता, भारतातली पहिली मेड इन इंडिया कार सरकारी धोरणांमुळे रस्त्यावरच उतरू शकली नाही.

या गाडीचे नाव अरविंद कार.

अरविंद हि साधी छोटी कार नव्हती तर ती होती लिमोझीन कार.

आधी ज्यांना लिमोझीन माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो. लिमोझीन ही मोठी लांब सडक लक्झरी कार असते. हिला लक्झरी सेदान असंही म्हणतात. या गाड्या चालवण्यासाठी खास शोफर असतो. जगातले मोठे राष्ट्राध्यक्ष, अब्जावधी मालमत्ता असणारे उद्योगपती ही कर वापरतात. या कारला एक अशी कोणती कंपनी नाही. मर्सिडीज पासून अनेक कंपन्या या लिमोझीन बनवतात.

अजूनही एकही भारतीय कंपनी लिमोझीन बनवत नाही. पण साठच्या दशकात एका माणसाने लिमोझीन बनवली होती.

त्रावणकोर संस्थानचा शेवटचा महाराजा होता चित्तिर तिरुनाल बालरामवर्मम. हा विचाराने आधुनिक होता. त्याच्याच काळात केरळ मध्ये अनेक उद्योगधंदे स्थापन झाले. बलरामवर्मम हा अतिशय लोकप्रिय राजा होता. जगातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या पदमनाभ स्वामी मंदिराचा तो मालक म्हणजे त्याच्याकडे किती पैसे अडका असेल याचा विचार करा.

अशा या बलराम वर्मनला आपल्या जवळ लिमोझीन असावी अशी इच्छा निर्माण झाली. त्याकाळी भारतातले नियम अतिशय कडक होते. परदेशातून कार आणायची म्हणजे अनेक सरकारी ऑफिस मधून परवानग्या लायसन्स वगैरे प्रकार असायचा. त्यासाठी कित्येक महिने वाट पाहायला लागणार होती.

राजाला कुठून तरी कळालं की गोव्यात एकेठिकाणी लिमोझीन कार मिळू शकेल.

नुकताच गोवा पोर्तुगीजांकडून स्वतंत्र झाला होता. तिथे अनेकदा युरोपियन अमेरिकन गाड्या असायच्या. गोव्याचा पोर्तुगीज व्हाइसरॉय वापरत होता ती लिमोझीन त्रावणकोरच्या राजाला हवी असावी. बलराम वर्मनने आपल्या दरबारातील दोघांना ही कार आणायसाठी गोव्याला पाठवलं.

यात होते त्याचे पर्सनल सेक्रेटरी पी.व्ही.थंपी आणि सुप्रसिद्ध ऑटोमोबाईल इंजिनियर के. ए. बालकृष्णन मेनन.

बालकृष्ण मेनन यांचे त्रिवेंद्रम येथे अरविंद ऑटोमोबाइल्स नावाचे गॅरेज होते. राजघराण्यातील सर्व गाड्या त्यांच्याइथे दुरुस्त होत असतं. वयाच्या १४ व्या वर्षांपासून ते या व्यवसायात होते. अनेक परदेशी गाड्या त्यांनी हाताळल्या होत्या. त्यांच्यावर राजाचा विश्वास होता म्हणूनच त्यांना गोव्याला लिमोझीन घेऊन येण्यास पाठवलं होतं.

राजाने दिलेल्या पत्त्यावर थंपी आणि बालकृष्ण मेनन दोघेही गेले पण त्यांना तिथे लिमो मिळाली नाही. चौकशी केल्यावर वेगळाच पत्ता मिळाला.  फिरत फिरत दोघे गोव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन पोहचले. अनेक कार त्यांनी नजरेखालून घातल्या पण काही केल्या त्यांना लिमोझीन मिळाली नाही. दोघेही प्रचंड निराश होऊन हॉटेलवर परतले. त्यांनी परत जाण्याचा निर्णय घेतला.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघायचं होतं. मेनन यांना रात्रभर झोप लागली नाही, मोकळ्या हाताने परत राजासमोर जाणे त्यांना पटत नव्हते.

त्यांनी हॉटेलच्या रिसेप्शनमधून एक कागद आणि पेन्सिल मागवली. त्या कच्च्या कागदावरच एक स्केच बनवलं. गोव्यात पाहिलेल्या अत्याधुनिक कारचे सगळे फीचर्स एकत्र करून हे डिझाईन तयार झालं होतं. सकाळी त्यांनी ते थंपी यांना दाखवलं. त्यांना सुरवातीला तर धक्काच बसला होता. पण थोड्याशा व्दिधा मनस्थितीतच त्यांनी हे डिझाईन राजाला दाखवायला संमती दिली.

त्रावणकोरला परतल्यावर ते डिझाईन राजाच्या समोर ठेवण्यात आलं. मेनन यांनी राजाला विंनती केली कि

तुमच्या गॅरेजमध्ये जी जुनी १९३९ सालची लिमोझीन पडून आहे ती मला दिली तर मी जगातील सर्वात भारी कार तुम्हाला बनवून दाखवेन.

राजाला अशी कार भारतात बनवता येईल हे पटलं नाही. त्याला वाटलं की हा मेनन चक्रम झाला आहे. पण कुठे त्याच्या नादाला लागायचं म्हणून त्याला ती अडगळीत पडलेली कार देऊन टाकली. पण एक अट घातली. जर मेनन यांनी बनवलेली कार राजाला तर त्याने कार बनवण्यासाठी आलेला खर्च व जुन्या लिमोझीनची किंमत राजाला परत करायची.

नुसता तोंडी बोलणी नाही तर याचा व्यवस्थित करार करण्यात आला आणि परत करायची रक्कम १० हजार इतकी ठरवण्यात आली. 

मेनन यांनी हे वेडं धाडस करायचं ठरवलं. त्यांच्या गॅरेजमध्ये काम करणारे ६ अशिक्षित मेकॅनिक यांना घेऊन लिमोझीन बनवण्याच्या मागे लागले. त्यांच्याजवळ कोणत्याही आधुनिक मशिनरी नव्हत्या. साध्या लेथमशीनवर या  स्पेअरपार्ट बनवण्यात आले. रात्रंदिवस एक करून अवघ्या १० महिन्यात मेनन यांनी भारतातली पहिली लिमोझीन कार बनवली.

या गाडीला नाव देण्यात होतं, पॅलेस स्पेशल

बालकृष्ण मेनन स्वतः ड्राईव्ह करत पॅलेस स्पेशल गाडी त्रावणकोर महाराजांच्या राजवाड्यावर घेऊन आले. राजा बलरामवर्मन आपल्या राणींसह बाहेर आला तेव्हा त्याला आनंदाने धक्का  बसला. त्याच्या स्वप्नातली कार त्याच्या समोर उभी होती. राजाने मेनन यांची पाठ थोपटली. आपल्या प्रजाजनांपैकी एकाने जिद्दीने चॅलेंज स्वीकारून भारतात निव्व्ल अशक्यप्राय वाटेल अशी गाडी बनवून दाखवली होती याचा त्यांना अभिमान होता.

राजाने मेनन यांच्या कडे गाडीची चावी मागितली. पण त्यांनी नकार दिला.

राजाला अदबीने फ्रंट सीटवर बसवले व स्वतः गाडी चालवत त्रिवेंद्रमची सैर घडवून आणली. अबालवृद्ध रस्त्यावर उतरून हा सोहळा पाहत होते. दुसऱ्या दिवशी ही राष्ट्रीय बातमी बनली. इतकेच नाही तर मेनन यांची गाडी बघण्यासाठी परदेशातून लोक आले. तिथल्या ऑटोमॅगझीनमध्ये या गाडीवर विशेष कव्हर स्टोरी करण्यात आली होती.

पॅलेस स्पेशल बनवल्यानंतर बालकृष्ण मेनन यांना स्वतःची कार बनवण्याचा आत्मविश्वास मिळाला. त्यांनी सर्वसामान्यांना वापरता येईल अशा छोट्या मात्र लक्झरी कार बनवण्यास सुरवात केली. या कारला नाव दिले अरविंद कार.

त्या काळी भारतीय रस्त्यांवर अँबेसेडर आणि फियाट या गाड्यांचे वर्चस्व होते. या सोडून अतिश्रीमंतांकडे फॉरेनच्या कार असायच्या. अरविंदने अस्स्स्ल भारतीय कारचा ऑप्शन आणला. या गाडीची किंमत ५००० रुपये ठेवण्यात आली होती. अरविंद कारचे प्रोटोटाइप तयार झाले. पहिली गाडी तामिळ सिनेस्टार नागर्जन यांना देण्यात आली.  

पण गाड्यांचा कारखाना टाकून मास प्रोडक्शन करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी लागणार होती.

तेव्हा भारताच्या पंतप्रधान होत्या श्रीमती इंदिरा गांधी. त्यांचा धाकटा मुलगा संजय गांधी हा देखील कार बनवण्याच्या मागे लागला होता. त्याच्या कारला म्हणजेच मारुतीला स्पर्धा होऊ नये म्हणून इतरांच्या गाडीला परवानगी नाकारण्याचे अन्यायी धोरण तत्कालीन सरकारने अवलंबले होते. याच लायसन्स राजमुळे भारतातील अनेक उद्योगांचा बळी घेतला यात अरविंद कारचा देखील समावेश होता.

अशातच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या बालकृष्ण मेनन यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीने आपले वर्कशॉप कामगारांना देऊन टाकले. एखाद्या सहकारी संस्थेप्रमाणे त्यांनी हे वर्कशॉप ३ वर्षे सांभाळले पण त्यांनाही हे परवानगी मिळाली नाही.

भारतीयांना आलिशान कारच स्वप्न दाखवणारी अस्सल मेड इन इंडिया कार रस्त्यावर उतरूच शकली नाही. त्रावणकोरचे बालकृष्ण मेनन आणि त्यांच्या अरविंद कारच्या आठवणी इतिहास जमा झाल्या.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.