सोनूला ब्रँड अँबेसेडर बनवण्यामागं केजरीवाल यांनी पंजाब निवडणुकीवर डोळा ठेवलाय?

गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान आरोग्य कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि अनेक स्वयंसेवक हे खरे हिरोज बनवून समोर आले. ज्यांनी निस्वार्थीपणे इतरांची मदत केली. याच दरम्यान आणखी एक चेहरा देशभरात चर्चित आला. तो म्हणजे अभिनेता सोनू.

स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मूळ राज्यापर्यंत, गावापर्यंत पोहचवणं असो, एखाद्याला कोणती वैद्यकीय मदत किंवा खाण्यापिण्याची सोय करणं असो, खाटा, हॉस्पिटल कॅम्प, ऑक्सिजन सिलिंडर, रेमेडिसिवीर ऑक्सिजन सारखी इंजेक्शन अश्या हर प्रकारे सोनू सूदनं मदत केली. त्यानं अगदी बाहेरच्या देशात अडकलेल्या आपल्या नागरिकांना घरी सुखरूप पोहोचवावं, म्हणून स्पेशल विमानांची व्यवस्था केली. एवढंच काय तर या मदतीसाठी २४/७ हेल्पलाईन नंबर सुरु केली. 

चित्रपटात व्हिलन म्हणून दिसणारा सोनू सूद आपल्या या कामामुळं पब्लिकमध्ये रिअल हिरो बनला होता. लोक त्याची अक्षरशः पूजा करायला लागलेत. त्याच्या नावावरून आपल्या पोरांची नाव ठेवलीत.

आता सोनूच्या याच वाढत्या फेमचा दिल्ली सरकारनं आपल्या योजनांच्या फेमसाठी वापर करायचं ठरवलंय. अरविंद केजरीवाल सरकारनं ‘देश के मेंटॉर’ या मुलांच्या मार्गदर्शन कार्यक्रमासाठी सोनू सूदची दिल्ली सरकारचा ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती केलीये. शुक्रवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोनू सुदची भेट घेतल्यानंतर ही घोषणा केली.

आपल्या भेटीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सोनू सूद यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी केजरीवाल यांनी आपला कार्यक्रमाची माहिती देताना म्हंटल कि,

“आपल्या बीजी शेड्युलमधून वेळ काढल्याबद्दल सोनू सूदचे आभारी आहोत. ते संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहेत. हजारो लोक त्यांच्याकडे मदतीसाठी पोहोचतात. तो जे काही करतोय तो एक प्रकारचा चमत्कार आहे, जे इतर सरकार करू शकले नाहीत. आम्ही त्यांच्या कार्याबद्दल बऱ्याच वेळ चर्चा केली आणि दिल्ली सरकारचे काम त्यांच्यासोबत शेअर केले.”

मेंटॉरशिप प्रोग्रामबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,

“दिल्ली सरकारकडे मेंटोरशिप प्रोग्राम आहे. बऱ्याच मुलांना कुठे जायचे, काय करावे हे माहित नसते. आम्ही लोकांना फोनद्वारे अशा मुलांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन करत आहोत.”

या घोषणेनंतर सोनू सूदने देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.  तो म्हणाला कि, “दिल्ली सरकारने आपल्या सर्वांना पुढे येण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केलेय. ही एक उत्तम संधी आहे. या प्रोग्रॅमच्या माध्यमातून मी लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल याचा मला आनंद वाटतो. ”

या दरम्यान एका पत्रकारानं विचारलं कि,’या प्रोग्रॅमच्या माध्यमातून सोनू सूदची राजकीय एन्ट्री होणार का?

यावर उत्तर देताना सोनुने स्पष्ट केलं कि. ‘राजकीय काहीही नाही. आत्तापर्यंत आम्ही कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा केलेली नाही. त्यामुळे राजकारणात येण्याचा विचारही मी करत नाहीये. आमची भेट फक्त प्रोग्रॅमसाठीच होती.’

दरम्यान, काहींचे असेही म्हणणे आहे कि, सोनू सूदचा हा फेमस चेहरा अरविंद केजरीवाल आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरतील.

कारण, सोनू सूद हा मूळचा पंजाबातल्या मोगा भागातला. त्यात दिल्लीनंतर केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष पंजाबात दोन नंबरचा मोठा राजकीय पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसला टक्कर देण्यासाठी आप सोनू सूदच्या प्रसिद्धीचं कार्ड खेळणार असल्याचं बोललं जातंय. 

या चर्चा तर इथवर पोहोचल्यात कि, जनतेचा पाठींबा मिळावा आणि आपला पक्ष सत्तेत यावा यासाठी आप आपल्याकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून सोनू सूदच नाव पुढे देऊ शकत.

दरम्यान, केजरीवाल यांनी या परिषदेदरम्यान जाहीर केलं की, त्यांचे सरकार लवकरच देशातील “सर्वात प्रोग्रेसिव्ह” फिल्म पॉलिसी घेऊन येणार आहे,  जे मनोरंजन उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना देईल.

दरम्यान, सोनू सूदचं नाही तर या अभिनेत्याची ४७ वर्षीय बहीण मालविका सच्चर आगामी पंजाब विधानसभा निवडणूक लढवू शकते. आपल्या मोगा मतदारसंघातून मालविका काँग्रेसच्या तिकिटावर पंजाब निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. कारण, गेल्या काही महिन्यांपासून पंजाबच्या मोगा भागात सामाजिक कार्यक्रमात तिचा सहभाग वाढलाय. तिला विविध सरकारी विभागांनी स्थानिक कार्यक्रमातही आमंत्रित केलं असल्याचं समजतंय.

तसं पाहिलं तर पंजाब काँग्रेसमधला पक्षांतर्गत वाद पार दिल्लीपर्यंत येऊन पोहोचलाय. कॅप्टन अमरिंदर सिंग विरुद्ध नवज्योत सिंग सिद्धू अश्या दोन गटात पक्ष विभागला गेलाय. आता जरी गेल्या दोन दिवसांपासून वर-वरून  आम्ही गुण्या गोविंदाने नांदतोय हे दाखवत असले, तरी आतली खलबत सुरूच आहेत. त्यामुळे केजरीवाल पक्षाला काँग्रेसच्या या वादाचा देखील भरपूर फायदा होऊ शकतो. 

भाजपही तिथं आपले हातपाय मारतोय, पण पंजाबात भाजप सध्या चौथ्या नंबरवर आहे. त्यामुळे आप आदमी पक्षाला मार्ग सोपा आहे.

त्यात आता पक्षानं सोनू सूदशी हातमिळवणी केलीये म्हंटल्यावर पक्षाचा कॉन्फिडन्स हाय लेव्हलवर असणार यात शंका नाही.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.