अन् युपीच्या उद्योगपतीनं योगी सरकारला आपली ६०० कोटींची संपत्ती दान केली
भारतात बघा ढिगाने उद्योगपती आहेत आणि कोरोना काळापासून तर खूप जास्त प्रमाणात या उद्योगपतींच्या संपत्तीत वाढ झाली आहे. कोरोना असा काळ होता जेव्हा जगभरातील उद्योगपतींच्या संपत्तीत घट झाली मात्र फक्त भारताच्या उद्योगपतींनी तग धरून ठेवला, अशा आशयाच्या बातम्या मागे ऐकल्याच असतील.
पण बक्कळ पैसे कमावणारे तेवढ्याच खुल्या मनाने आणि सढळ हाताने परोपकार देखील करतील, असं नसतंय.
भारतात कोणते उद्योगपती त्यांच्या कमाईतून दान देखील करतात असं विचारलं तर विप्रोचे संस्थापक अध्यक्ष अझीम प्रेमजी याचं नाव टॉपवर येतं. मग त्यापाठोपाठ शिव नादर, टाटा, बिर्ला, मुकेश अंबानी अशांच्या दानाचे किस्से येतात.
पण अशा एखाद्या भारतीय उद्योगपतीबद्दल कधी तुम्ही ऐकलं आहे की ज्याने सगळीच्या सगळी संपत्ती, आयुष्यभराची कमाई एकदाच दान करून टाकली?
असं कुठं असतंय का? असं म्हणणार असाल तर शब्द थोडावेळ तोंडातच ठेवा. आणि पुढे वाचा…
अगदी ताजी घटना आहे… उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये एक उद्योगपती आहेत, डॉ.अरविंदकुमार गोयल. सध्या ते खूप जास्त चर्चेत आहेत याचं कारण ठरतंय त्यांचं ‘दान’. गोयल यांनी त्यांची सगळी मालमत्ता गरिबांना दान करण्याची घोषणा केली आहे. सगळी म्हणजे किती? तर सुमारे ६०० कोटी रुपये.
गेल्या ५० वर्षांत त्यांनी मेहनतीने ही संपत्ती एकगठ्ठा केली होती, जिला तेवढ्याच खुल्या हातांनी त्यांनी दान करण्याची तयारी दर्शवली आहे.
कारण काय?
उद्योगपती गोयल यांच्या आयुष्यात तो क्षण मनात आजपासून २५ वर्षांपूर्वी आला होता आणि तेव्हाच त्यांच्या मनात दानाची इच्छा उत्पन्न झाली होती. डॉ. गोयल यांनी त्या घटनेबद्दल सांगितलं आहे…
२५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. डिसेंबरचा महिना होता, थंडीचे दिवस होते. तेव्हा गोयल रेल्वेने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान एका स्टेशनवर रेल्वेत चढत असताना त्यांना एक गरीब व्यक्ती दिसली. ती व्यक्ती थंडीत कुडकुडत बसली होती. ना त्यांच्याकडे पांघरायला चादर होती ना त्यांच्या पायात साधी चप्पल होती. गोयल यांना ते पाठवलं नाही आणि त्यांनी लगेच स्वतःच्या पायातले बूट काढून त्या व्यक्तीला दिले.
गोयल यांनी स्वतःचे बूट काढून दिले खरे मात्र आता त्यांना थंडी वाजायला लागली होती. त्यांनी काही वेळ ते सहन केलं मात्र कडाक्याच्या थंडीमुळे हळूहळू त्यांना थंडी सहन होईनाशी झाली. त्यांची स्थिती अगदीच वाईट झाली.
तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की…
आपल्याला थोडी थंडी सहन होत नाहीये तर तो व्यक्ती कसं सहन करत असेल? फक्त तो व्यक्तीच नाही तर असे किती लोक असतील ते अशा थंडीत कुडकुडत असतील. आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो का? असा प्रश्न ते स्वतःला विचारू लागले आणि त्यांना एक उपाय दिसला तो त्यांच्या संपत्तीचा.
आपण आपल्या कमाईतून त्यांची मदत करू शकतो, असं त्यांना जाणवलं आणि तेव्हापासून त्यांनी गरीब आणि निराधार लोकांना मदत करण्यास सुरुवात केली. ही मदत करत असताना एकदिवस आपली सर्व संपत्ती दान करण्याचं करण्याचं देखील त्यांनी निश्चित केलं.
त्यानुसार आता त्यांनी संपत्ती योगी सरकारला दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा निर्णय त्यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या संमतीने घेतला आहे. सध्या त्यांच्या कुटुंबात पत्नी रेणू यांच्याशिवाय दोन मुले आणि एक मुलगी आहे. मोठा मुलगा मधुर मुंबईत राहतो. लहान मुलगा शुभमप्रकाश गोयल मुरादाबाद इथे राहतो आणि वडिलांच्या व्यवसायात मदत करतो.
तर मुलीचं लग्न झालं आहे. डॉ गोयल यांचे जावई कर्नल आणि सासरे लष्करात न्यायाधीश आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी अरविंद गोयल यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
यूपीतील आघाडीच्या उद्योगपतींमध्ये डॉ. अरविंदकुमार गोयल यांचं नाव घेतलं जातं. डॉ गोयल यांचे वडील प्रमोद कुमार गोयल आणि आई शकुंतला देवी स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्यसैनिकांचे पुत्र असल्याने त्यांच्यात नेहमीच देशासाठी काहीतरी करण्याची भावना राहिली आहे, जी वयानुसार अजून बळावत गेली.
गडगंज श्रीमंत असूनही गोयल अगदी साधेपणाने आयुष्य जगतात. दुचाकीवर फिरतात. दिसेल त्या गरीब आणि गरजूंना मदत करतात. शिवाय रुग्णालयात जाणून गरिबांना मदत पुरवतात. त्यांच्या मदतीने गेली २० वर्षे देशभरात शेकडो वृद्धाश्रम, अनाथाश्रम आणि मोफत आरोग्य केंद्रे चालवली जात आहेत. त्यांच्या मदतीने सुरू असलेल्या शाळांमध्ये गरीब मुलांना मोफत शिक्षणही दिलं जात आहे, असं सांगितलं जातं.
त्यांनी कोविड लॉकडाऊनदरम्यान मुरादाबादमधील ५० गावं दत्तक घेऊन गरिबांना मोफत जेवण आणि औषध उपलब्ध करून दिलं होतं.
ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांना दिल्लीतल्या एका खासगी कार्यक्रमात बोलावण्यात आलं होतं. या काळात मुलांवर संस्कार कसे करावेत, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. त्याचबरोबर विविध राज्यांतील सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिकांचा सन्मान करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ त्यांच्या एका फॅनने सोशल मीडियात अपलोड केला होता.
दोन आठवड्यांमध्ये हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. दोनच आठवड्यात या व्हिडिओला फेसबुकवर ५० लाख आणि इन्स्टाग्रामवर ८९ लाख लोकांनी पाहिलं होतं. हे दाखवून देतं की ते उत्तरप्रदेशमध्ये किती फेमस आहेत.
त्यांच्या परोपकारांकडे बघता आजवर अनेकांनी त्यांना सन्मानित केलं आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी राष्ट्रपती प्रतिभा देवी पाटील आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम अशा चार राष्ट्रपतींनी गोयल यांचा गौरव केला आहे.
उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत त्यांच्या १०० पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था, वृद्धाश्रम आणि रुग्णालये आहेत. अशाप्रकारे त्यांच्या संपत्तीचं एकूण मूल्य ६०० कोटी असल्याची माहिती मिळतेय.
ही संपत्ती गोयल यांनी थेट राज्य सरकारला हे दान दिलं आहे.
डॉ.गोयल यांच्या संपत्तीचं योग्य मोजमाप करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली जाईल. यामध्ये ३ सदस्य गोयल स्वत: नियुक्त करतील. दोन सदस्य सरकारकडून नियुक्त केले जातील. संपत्ती विकून आलेला पैसा अनाथ आणि निराधारांच्या मोफत शिक्षण, उपचारांवर खर्च केला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
डॉ. गोयल म्हणतात…
“त्या रात्रीने माझं आयुष्य बदललं. मी दान करण्याचं निश्चित केलं. आज मी खूप प्रगती केली आहे पण आयुष्याचा काही भरवसा नाही. त्यामुळे मी जिवंत असताना मला माझी मालमत्ता योग्य हातात सोपवायची आहे. जेणेकरून काही गरजूंना त्याचा उपयोग होईल.”
गोयल यांनी त्यांची मालमत्ता दान करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पत्र लिहिलं आहे. जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली की त्यानुसार आता पुढची कार्यवाही केली जाणार आहे.
सध्या अरविंद कुमार गोयल यांनी स्वतःकडे फक्त मुरादाबाद सिव्हिल लाइन्स इथलं घर ठेवलं आहे. पुढचं संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी आणि समाजसेवेसाठी समर्पित करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाच भिडू :
- म्हणून जगभरातला प्रत्येक ‘फॉरेनर कृष्णभक्त’ हा ‘इस्कॉनचा’ असतो…
- खरंच दिलीप कुमारांनी आपली संपत्ती वक्फ बोर्डाला दान केली होती का?
- सगळ्यात श्रीमंत मराठी माणूस गळ्यात सोन्याच्या चेन घालून बीएमडब्ल्यू उडवत फिरत नाही.