गिरणीवाल्या कंपनीने भारताला जीन्स घालायची सवय लावली.

बांद्राचा सल्लू असो किंवा बार्शीचा सल्ल्या यांच्या कपड्यात कोणते साम्य असू शकते? दोघेही रोज न चुकता जीन्स वापरतात. भलेही त्यांच्या जीन्सच्या किंमतीमध्ये जमीन अस्मानाचं अंतर असेल मात्र जीन्स हा आपला राष्ट्रीय पोशाख बनत चालला आहे.

बारा महिने चालणारी जीन्स बॅचलर पोरांसाठी तर वरदान असते. टिकाऊ, दमदार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कितीही वापरली तरी घाण होत नाही. कुठल्याही शर्टवर सहज मॅच होते. कॉलेजच्या पोरापोरींना तर ही कम्फर्टेबल आहेच पण अनेक ‘पिकलं पान’ आणि ‘हिरवा देठ’ असलेले भिडू सुद्धा जीन्स वागवताना दिसतात.

जीन्स ही चीन आणि जपानपासून ते युरोप-अमेरिकेपर्यंत सगळ्यांच्या वार्डरोबचा  अविभाज्य घटक बनली आहे.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीन्सच्या निर्मितीत मराठी मातीचं कनेक्शन आहे.

सोळाव्या शतकात मुंबईच्या डोंगरी भागात जीन्सच्या कापडाचा शोध लागला असं मानलं जातं. पुढे इंग्रजांनी हि जीन्स युरोपात नेली. तिथल्या कामगार वर्गाने अमेरिकेत नेली. कारखान्यात काम करताना किती पण रगडा कधीही न फाटणारी जीन्स अल्पावधीत फेमस झाली.

अमेरिकेत हॉलिवूडने या जीन्सला फॅशन म्हणून अधिमान्यता दिली. कामगारांचा निळा ड्रेस आता भारी भारी हॉट मॉडेलच्या अंगावर दिसू लागला. सिनेमात चमकू लागला.

हे सगळं फॉरेनमध्ये चालू होतं आणि जीन्सचा शोध लावणारे आपण चरखा चला चला के आझादी लेंगे म्हणून नारा देत होतो. खादीचे कपडे घालून ब्रिटिशांना घाबरवत होतो. स्वदेशीची चळवळ जोरात होती. परदेशी कापडाची होळी होत होती.

याच स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीतून अहमदाबादमध्ये एका कापड गिरणीची स्थापना झाली. नाव अरविंद मिल्स.

अहमदाबादच्या सर्वात प्रमुख नगरशेठ फॅमिलीचे व्यापारी म्हणजे लालभाई दलपतभाई. १८९७ सालीचा त्यांनी साड्या बनवण्याचा कारखाना सुरु केला होता. आधीच श्रीमंत होते त्यात या कापडाच्या बिझनेसने बक्कळ पैसे कमवला. त्यांची तीन मुले म्हणजे कस्तुरभाई लालभाई, नरोत्तमभाई लालभाई आणि चिमणभाई लालभाई. हे तिघे पण गांधीजींचे प्रचंड मोठे फॉलोवर होते.

गांधीजींच्या स्वदेशीच्या हाकेला ओ देऊन त्यांनी १९३१ साली अरविंद मिल या कापड गिरणीची सुरवात केली.

अरविंद मिलने फक्त स्वदेशी कापडाचं स्वप्न साकार केलं असं नाही तर त्यांनी हे कापड निर्यात करायला देखील सुरवात केली. पुढच्या पाच वर्षात स्वित्झर्लंड मध्ये बुट्टा वोयल नावाचं अरविंद मिलच कापड प्रचंड फेमस झालं होतं.

स्वातंत्र्यानंतर भारतातले जे अग्रगण्य उद्योगसमूह होते यात अरविंद मिलचा समावेश होता. १९५२ साली त्यांनी भारतात पहिल्यांदा डाय आणि केमिकल प्लॅंट सुरु केला. स्वतः पंतप्रधान नेहरू याच्या उदघाटना साठी आले होते. पुढची काही वर्ष अरविंद मिलने पारंपरिक कापड व्यवसायात अनेक बदल करत करत नेले.

साधारण सत्तरच्या दशकात भारतात अमिताभने अँग्री यंग मॅन फेमस केला. त्याची हेअरस्टाईल, ती बुटकट पॅन्ट, तो बुशशर्ट प्रत्येक तरुण कॉपी करत होता. या पूर्वी अगदी साधे भोळे असणारे भारतीय नट आता फॅशनेबल होऊ लागले होते. अमिताभ मुळे ऍक्शन हिरोंची लाट अली. यात शत्रुघन सिन्हा, विनोद खन्ना, धर्मेंद्र पुढे जाऊन संजय दत्त,सनी देओल, जॅकीश्रॉफ अनिल यांनी आपला स्वतःचा अँग्री यंग लूक फेमस केला.

ऐंशीच्या दशकात अरविंद मिलने या पडद्यावरच्या अँग्री हिरोंना शोभेल अशी जीन्स लॉन्च करायची ठरवली होती. तो पर्यंत भारतात फारच मोजके उच्च्भ्रू लोक जीन्स वापरायचे, तेही युरोपमधून मागवलेली.

अरविंद मिलने फ्लायिंग मशीन हा पहिला भारतीय जीन्स ब्रँड बनवला.

अहमदाबादच्या नरोडा रोड प्लान्टवर लालभाई फॅमिलीच्या तरुण पिढीने जीन्स बनवण्याची फॅक्ट्री सुरु केली. फ्लायिंग मशीन आणि रफ अँड टफ ब्रँडच्या जीन्स बनवल्या जाऊ लागल्या. सिनेमामुळे या जीन्स गाजू देखील लागल्या.

आपल्याला आयुष्यभर दिवाळीच्या आधी शिंप्याकडे कापड घेऊन कपडे शिवून घेण्याची सवय होती. भले शिंपी महिनाभर लेट का करेना, घेतले तर कपडे शिवूनच घेईन हा आपला मंत्र होता. रेडिमेड कपड्यावर भारताचा विश्वासच नव्हता.

भारत उष्णकटी बंधीय प्रदेशात येत असल्यामुळे आपल्या आधीच्या अजय पंज्यांच्या पिढ्या धोतर विजार सारख्या अघळपघळ कपड्यात होत्या. त्यातल्या त्यात बच्चनच बघून आपले बापजादे बुटकट पॅन्ट वापरू लागले होते. पण जाड कापडाच्या जीन्स मध्ये गरम होणार, तीच फिटिंग बरोबर नसते वगैरे हजार चिंता आपल्या पिढीला सतावत होत्या.

अखेर अरविंदने यावर उपाय काढायचं ठरवलं.

नव्वदच दशक सुरु झालं होतं. ग्लोबलाझेशन मुळे आपला देश ब्लॅक अँड व्हाईटचा रंगीत झाला होता. भारतात आता फॉरेनच्या जीन्स कंपन्या देखील येऊ लागल्या होत्या. पण त्यांनाही जम बसवता येत नव्हता. अशातच अरविंद मिलची अक्षय कुमारला घेऊन जाहिरात आली.

“अपने जिंदगी का फैसला आप खुद्द करते हो तो जीन्स के फिटिंग का फैसला कोई और क्यू करे?

सिलाई के लिए तयार जीन्स रफ अँड टफ ” 

Bhehr8cCIAEWK5X

जीन्स जिचे फिटिंग आपल्याला टेलरकडे जाऊन करता येऊ शकत होतं. रफ अँड टफ जीन्स काही दिवसात प्रचंड हिट झाली. ती खरोखर रफ अँड टफ होती. अक्षयकुमार आपल्या प्रत्येक सिनेमात याच जीन्स मध्ये दिसायचा. अगदी खेडोपाडीचे टेलर देखील आपल्या कन्फर्टटेबल होईल अशी जीन्स शिवून देऊ लागले.

अरविंद मिलच्या रफ अँड टफ जीन्स ने क्रांतीच आणली.

वर म्हटल्याप्रमाणे बांद्राचा सल्लू असो किंवा लातूरचा सल्ल्या सगळ्यांनी जीन्स घालायला सुरवात केली याला अरविंद मिलची कृपा कारणीभूत ठरली.

पुढे आपलं आपण जीन्स फिटिंग करायची प्रथा मागे पडली. रफ अँड टफ जीन्स सुद्धा मागे पडली. फॉरेनच्या लिव्हाइस , लिव्ह इन, भारतातील स्पायकर, रँग्लर, मुफ्ती बरोबर अरविंदचा फ्लायिंग मशीन आजही फेमस ब्रँड आहे. तो फक्त भारतातच नाही तर जगभरात वापरला जातो.

आजही अरविंद मिल जगातील सर्वात मोठ्या टेक्स्टाईल कंपनीपैकी एक कंपनी आहे. गांधीजींनी दिलेला स्वदेशीचा वसा लालभाईनि जीन्स, लॉन्जरीच्या रूपात फडकत ठेवला आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.