हा मराठी माणूस थेट नॉर्वेच्या पंतप्रधानपदाला धडक देऊ शकतो.

नुकताच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या  निवडणुकांचा निकाल आला. डोनाल्ड तात्यांना हरवून ज्यो बायडेन नाना निवडून आले. त्यांच्यापेक्षा जास्त चर्चा उपराष्ट्राध्यक्ष बनलेल्या कमला ताईंची झाली. कमला ताई भारतीय वंशाच्या आहेत म्हणून आपला उर अभिमानाने भरून आला.

अमेरिकेच्या मंत्रिमंडळात अनेक भारतीयांनी काम केलंय. जगात अनेक देशांमध्ये भारतीय नेते राजकारणात सक्रिय असतात. असाच एक मराठी माणूस नॉर्वेसारख्या देशात आघाडीचा नेता आहे, तिथे मंत्रीपदी देखील राहिला आहे. उद्या पुढे मागे पंतप्रधान देखील होईल पण आपल्याला त्याच नाव देखील ठाऊक नसत.

त्याच नाव अर्विन गाडगीळ.

अर्विन मूळचे नाशिकचे. त्यांचे वडील अरुणकुमार केशवराव गाडगीळ हे नॉर्वेला जाणारे गाडगीळ घराण्यातील पहिली व्यक्ती. त्यांचे आजोबा कि काका कोणीतरी एअर इंडियाच्या स्थापनेवेळी टाटांच्या सोबत त्यात सहभागी होते. अशा या होतकरू घराण्यात जन्मलेले अरुणकुमार गाडगीळ हे इंगर एकलँड नावाच्या एका नॉर्वेच्या मुलीच्या प्रेमात पडले. दोघांनी लग्न केलं आणि तिच्या आग्रहामुळे त्यांनी आपला बाडबिस्तरा थेट युरोपला हलवला. नॉर्वेमध्ये त्यांना नोकरी देखील मिळाली. वर्णव्देषीय टीकांशी संघर्ष करत, अनेक खस्ता खात त्यांनी तिथे जम बसवला.

पण कितीही झालं तरी गावाकडच्या मातीशी नाळ तुटली नव्हती. त्यांच्या लेकाचा जन्म नाशिक येथेच झाला. त्याच नाव ठेवलं अर्विन. त्याला शाळेत घालताना आई आणि बाबा दोघांचंही आडनाव लावण्यात आलं. त्यामुळे तो झाला अर्विन एकलँड गाडगीळ.  

अर्विनला शिक्षणासाठी त्यांनी पुण्या जवळ सुरु झालेल्या इंटरनॅशनल स्कुल येथे पाठवलं. १९९७ साली पुण्याजवळच्या मुळशी तालुक्यात स्थापन झालेल्या UWC महिंद्रा या इंटरनॅशनल स्कुल मध्ये पहिल्याच बॅचचे विद्यार्थी अर्विन गाडगीळ होते. जगभरातले देशोदेशीचे साधारण १५० विद्यार्थी इथे शिकत होते. आंतरराष्ट्रीय शिक्षण व आपल्या संस्कृतीची देवाणघेवाण हे या संस्थेचं महत्वाचं उद्दिष्ट होतं.

या शाळेच्या उदघाटनासाठी जॉर्डनची राणी क्वीन नूर आणि आफ्रिकेचे राष्ट्रपिता नेल्सन मंडेला पौड गावात आले होते.

याच शाळेत असताना अर्विन यांचा राजकारणाशी पहिल्यांदा संबंध आला. त्याकाळी महाराष्ट्रात युतीचे शासन होते. काही कारणामुळे त्यांचा व या इंटरनॅशनल स्कुलचा वाद झाला. शासनाने या शाळेची वीज व पाणीपुरवठा बंद करून टाकला. जगभरातील मुले या शाळेत शिकायला होती. अचानक हॉस्टेलमधील  वीज आणि पाणी बंद झाल्यामुळे त्यांच्यात घबराट पसरली.

तेव्हा या विद्यार्थ्यांना गोळा करून प्रशासनाशी लढा देण्याचं काम १७ वर्षांच्या अर्विन यांनी केलं. राजकारण काय असत याचा त्यांना चांगलाच अनुभव आला. या शाळेत ते तीन वर्ष होते. अनेक भाषा, संस्कृतीशी त्यांना ओळख झाली. अगदी आफ्रिकेच्या छोट्याशा देशापासून ते जपान अमेरिकेसारख्या आधुनिक देशापर्यंत त्यांचे मित्र बनले. याचा त्यांना पुढच्या आयुष्यात खूप मोठा फायदा झाला.

भारतामधल्या वास्तव्यात दोन घटनांनी त्यांच्या मनावर खोल परिणाम केला त्या म्हणजे १९९२ सालची मुंबई दंगल आणि १९९९ सालचे कारगिल युद्ध. या दोन्ही घटना त्यांनी जवळून अनुभवल्या, कारगिल युद्धावेळी तर लोणावळ्याच्या बेस कॅम्प वरून उडणारे लढाऊ विमान त्यांच्या शाळेवरून जाताना नेहमी दिसायचे. युद्धातील हिंसा, जातीय दंगलीमध्ये उजाड होणारे संसार हे त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं.याच दोन्ही घटनांमुळे त्यांची राजकीय विचारसरणी डावीकडे झुकली.

अमर्त्य सेन यांच्या भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी मांडणीमुळे प्रभावित होऊन त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंड गाठले.

लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स या जगातील सर्वात प्रतिष्ठित महाविद्यालयातून डेव्हलपमेंट स्टडीज या विषयात डिस्टिंक्शन मिळवत आपले मास्टर्स पूर्ण केले. पौंडमधल्या शाळेत मिळालेलं राजकीय भान त्यांनी पुढे देखील जपलं. लंडन स्कुल ऑफ इकोनिमिक्स मध्ये शिकत असताना देखील ते जागतिक विद्यार्थी चळवळीचा भाग बनले. २००६ साली नॉर्वेच्या United World Colleges National Committeeचा त्यांना मानद सदस्यपद देण्यात आलं.

त्यांनी फॉरेन सर्व्हिस ट्रेनी म्हणून अफगाणिस्तान सारख्या युद्धप्रवीण देशात काम देखील केलं.

२००७ साली त्यांनी अधिकृतरीत्या नॉर्वेच्या सोशालिस्ट लेफ्ट पार्टी मध्ये प्रवेश केला आणि राजकीय कारकीर्दीस प्रारंभ झाला. तिथल्या कायएड यामोठ्या राजकीयनेत्याचा असिस्टंट म्हणून त्यांनी काम सुरु केलं. एकाच वर्षात त्यांची तिथल्या पर्यावरण मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सल्लागार पदी निवड झाली.

तिथल्या एरीक सॉलिहियम नावाच्या राजकीय नेत्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांची राजकीय कारकीर्द बहरत गेली. विशेषतः आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात त्यांचा अभ्यास मोठा होता. त्यात त्यांनी केलेलं काम आणि त्यांच्या कामाची तडफ याचं कौतुक झालं.

२०१२ साली फक्त ३२ वर्षांच्या अर्विन गाडगीळ यांची नॉर्वेच्या परराष्ट्र राज्यमंत्रीपदी निवड झाली. 

तेव्हा लेबर पार्टीचे सरकार सत्ते मध्ये होते. त्यांच्यावर त्याकाळी वर्णभेदी टीका होत होती. याच्या पासून वाचण्यासाठी म्हणून त्यांनी सोशालिस्ट लेफ्ट पार्टीशी युती केली आणि अर्विन यांची मंत्रीपदी निवडलं असल्याचं बोललं गेलं. पण गाडगीळ यांनी या आरोपाकडे दुर्लक्ष करत आपलं काम सुरु केलं. दक्षिण आशिया विशेषतः भारत,श्रीलंका, नेपाळ, म्यानमार या देशांशी नॉर्वेचे संबंध सुधारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे.

अगदी वेळ पडली तर लिट्टे सारख्या दहशतवादी संघटनेशी संपर्क साधून शांतता प्रशतपीत करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची दखल घेण्यात आली. भारतीय राजकारणातले मोठे नेते फारुख अब्दुल्ला, नोबेल पुरस्कार प्राप्त कैलास सत्यार्थी यांनी देखील नॉर्वेमधल्या या तरुण भारतीय वंशाच्या मंत्र्यांचं प्रचंड कौतुक केलं.

२०१३ साली सरकार बदलल्यावर ते या मंत्रिपदावरून दूर झाले. मात्र त्यांचं राजकीय महत्व मुळीच कमी झालं नाही. डेव्हलपमेंट फ़ंड नॉर्वे या एनजीओ च्या मध्यमातून त्यांचं समाजकार्य सुरूच असत. सोशालिस्ट लेफ्ट पार्टी मधील ते पहिल्या फळीतील नेते समजले जातात. ते तरुण आहेत, तिथे लोकप्रिय आहेत.

आज जरी त्यांचा पक्ष नॉर्वेमध्ये छोटा समजला जात असला तरी त्यांचे कार्यकर्ते तळागाळात जाऊन काम करणारे म्हणून ओळखले जातात. काय माहित उद्या हा मराठी माणूस तिथल्या पंतप्रधानपदी देखील जाऊन बसेल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.