पंजाबमध्ये चर्चाय, नवज्योतसिंग सिद्धू आणि केजरीवाल जवळ येत आहेत

येत्या २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात पंजाबच्या विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत. विधानसभेच्या एकूण ११७ जागांवर ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या तोंडावर सगळ्याच पक्षांनी आपल्या हालचालींचा वेग वाढवला असून नवनवीन रणनीती बनवण्यावर जोर दिला जात आहे.

म्हणजे काही दिवसांपूर्वीच शीख समुदायाला खुश करण्यासाठी भाजपने वर्षभरानंतर तीन कृषी कायदे मागे घेतले, राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असणारा आम आदमी पक्ष वेगवगेळी आश्वासनं देत जनतेचं लक्ष आपल्याकडे खेचत आहे. तर आपल्या अंतर्गत भांडणांमुळे वैतागलेल्या सत्ताधारी काँग्रेस काही दिवसांपूर्वी आपला मुख्यमंत्री बदलून पक्षात सगळं काही सुरळीत आहे, असे सांगून पक्ष मजबूत असल्याचं दाखवून द्यायचा प्रयत्न केला आहे. 

पण भिडू काँग्रेस वरवरून जरी सगळं निवांत असल्याचं दाखवत असलं, तरीपण ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधले वाद काय संपण्याचं नाव घेत नाहीयेत. म्हणजे आधी नवज्योतसिंग सिद्धू आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या भांडणाने काँग्रेसची अब्रू निघाली होती. ज्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह तयार व्हायला लागली होती. यानंतर अशी काही परिस्थिती निर्माण झाली की, अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. 

यानंतर आता नवज्योतसिंग सिद्धू यांची गाडी नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्यावर घसरली आहे. आणि याचाच फायदा आम आदमी पक्ष घेतंय. 

म्हणजे झालं असं कि, मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला आपल्या कामांची आणि आश्वासनांची लिस्ट वाचून दाखवली. ज्यात त्यांनी वाळूच्या किमती कमी केल्याचं आणि वाळू माफिया संपवल्याचं सांगितलं, सोबतच राज्यात विजेच्या किमती कमी केल्याचंही सांगितलं. 

पण नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्याचं मुख्यमंत्र्याला आणि पक्षाला घरचा आहेर देत हे सगळं खोटं असल्याचं म्हटलं. सिद्धू म्हणाले की, 

ही माहिती चुकीची आहे. वाळू माफिया अजूनही कार्यरत आहेत.

यावरून आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिद्धू यांचे कौतुक केले आहे. केजरीवालांनी सिद्धूच्या खऱ्या बोलण्याच्या धाडसाचे कौतुक करत म्हटले की,

नवज्योतसिंग सिद्धू यांनी दाखवलेल्या धाडसाचा मला अभिमान आहे, ज्यांनी चरणजीत सिंग चन्नी सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांचा पर्दाफाश केला आहे. मी त्यांच्या धैर्याला सलाम करतो. ते (सिद्धू) लोककेंद्रित मुद्दे मांडत आहेत पण संपूर्ण काँग्रेस पक्ष त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आधी कॅप्टन अमरिंदर सिंग होते आणि आता चन्नी आहेत.

केजरीवाल पुढे म्हणाले कि, “नवज्योतसिंग सिद्धू  पंजाब सरकारचे अपयश उघड करत आहेत. पंजाबची तिजोरी रिकामी झाल्याचं काँग्रेस रडगाणं गातं, पण पाच वर्षे फक्त काँग्रेसचेच सरकार होते. तिजोरी कोणी रिकामी केली, सत्तेत आल्यानंतर त्याची चौकशी होईल. पंजाबमध्ये पाच वर्षे काँग्रेसचे सरकार असून त्यांनी तिजोरी रिकामी केली आहे.”

आपल्या पत्रकार परिषदेदरम्यान केजरीवाल यांनी मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्यावर देखील ताशेरे ओढले. ते म्हणाले की, त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. जसे की राज्यातील लोकांना मोफत वीज देणे, मोहल्ला दवाखाने बांधणे. 

आता केजरीवाल यांच्या या कौतुकावर ते सिद्धू यांना सपोर्ट करत असल्याचं चित्र उभं राहिलंय. पण याआधी आप आणि सिद्धू यांच्या जवळीकतेची चर्चा समोर आली होती.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सिद्धू यांच्यावर हल्लाबोल करत ते संधीसंधू असल्याचं म्हटलं होत.  सोबतच असाही दावा केला होता की, ते विधानसभा निवडणुकीपूर्वी आपमध्ये सामील होऊ शकतात. त्यावेळी कॅप्टन यांनी सिद्धू यांच्या केजरीवाल यांच्यासोबत झालेल्या अनेक बैठकांचा संदर्भ दिला होता.

तसं पाहायचं झालं तर, नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्याच पक्षाच्या कारभारावर बोट दाखवण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी जेव्हा काही नियुक्त्या झाल्या होत्या, त्यावेळी सिद्धू यांनी त्याचा विरोध करत पक्षप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. पण काँग्रेस हायकमांडने हस्तक्षेप करत या भांडणावर तोडगा काढला. 

आता सिद्धू यांच्या या वागण्यावरून पक्षातले नेते तर बुचकळ्यात पडलेच आहेत, पण सोबतच इतरांचं सुद्धा कन्फ्युजन वाढवलंय. पण या सगळ्याचा  हाय कमांडची मात्र गोची होतेय,एवढं मात्र नक्की. 

हे ही वाच  भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.