जामीन म्हणजे नक्की काय ? कोणाला मिळतो? कोणाला नाकारला जातो ?

तुम्ही-आम्ही आपआपल्या कामात व्यस्त आहोत. शिक्षण घेणारे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात व्यस्त आहेत.चाकरमानी त्यांच्या नोकरीच्या कामात व्यस्त आहेत. प्रत्येकजण सध्या फारच बिझी आहेत.आपली पोरं अभ्यास करताय कि नाही हे बघायला सुद्धा कामाच्या व्यस्ततेमुळे बऱ्याच पालकांना  वेळ मिळत नसेल. जेव्हा केव्हा वेळ मिळत असेल तो सोशल मीडिया वापरण्यात जातोय. आणि ह्या सोशल मीडिया वर एकच चर्चा जोरात सुरु आहे ती म्हणजे त्या शाहरुख खान च्या पोराची… त्याला मुंबईतील क्रूझ वर अटक केल्यापासून न्युज चॅनेल, सोशल मेडिया याच्यावर फक्त त्याचीच चर्चा.

जेल मध्ये असताना त्याने जेल मधील जेवण खाण्यास मनाई केली या बातमीपासून ते त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली,त्याला अमुक दिवस न्यायालयीन कोठडी मिळाली, त्याने जामिनासाठी अर्ज केलाय,त्याचा जामीन कोर्टाकडून नाकारण्यात आलाय, त्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी,ह्या असल्या बातम्या तुम्हाला दोन आठवड्यांपासून ऐकायला येत असतील आणि ह्या बातम्या  ऐकून तुम्ही फार कंटाळून गेला असाल…

पण ह्या बातम्यांचा विषय राहू द्या बाजूला , हे जामीन वगैरे नक्की काय भानगड आहे हे माहितीये का तुम्हाला…

एखादा आरोपी जामिनावर बाहेर आहे, एखाद्याचा जामीन नाकारण्यात आला हे सगळं बरेचदा आपल्या कानावर ऐकायला आलंय…

चला तर मग तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो नक्की हा जामीन म्हणजे काय प्रकार आहे. पण त्याआधी गुन्हयाचे काय प्रकार आहेत हे समजून घ्यायला पाहिजे.

तुमच्याकडून चुकून मॅटर वगैरे झालं तर तुम्हाला माहिती पाहिजे कि आपण केलेला गुन्हा कोणत्या प्रकारचा आहे ते !

पहिला प्रकार आहे दखलपात्र गुन्हा. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असतो बरं का ! .  गुन्हयाची दखल पोलिसांना घ्यावीच लागते. याबाबत ताबडतोब तपास सुरु करावा लागतो. या गुन्हयात वॉरंट शिवाय पोलिस आरोपीला अटक करु शकतात. गुन्हयाची नोंद एफ.आय.आर. रजिस्टर मध्ये लिहिली जाते. उदा. चोरी, खून, बलात्कार इ.

आणि दुसरा प्रकार आहे अदखलपात्र गुन्हा.. अदखलपात्र गुन्हा म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, कलम १५५ अन्‍वये पोलीसांनी किरकोळ प्रकरणात दाखल केलेली तक्रार, अशा प्रकरणात खटला चालवण्याचा अधिकार असलेल्या दंडाधिकारी यांची पूर्वपरवानगी प्राप्त केल्याशिवाय कोणताही पोलीस अधिकारी अदखलपात्र प्रकरणांचा तपास करू शकत नाही.

आता हे झालं गुन्ह्यांचं … आता आपण बघूया गुन्हा केल्यानंतर मिळणाऱ्या जामिनाबद्दल.जामीन म्हणजे आरोपीला तात्पुरते सोडणे तसेच हमीशिवाय किंवा जामीन रोखीत किंवा जामीनदाराशिवाय पोलिसांच्या ताब्यातून सोडणे. जामीन मिळविण्यासाठी न्यायालय रोख, बाँड किंवा मालमत्तेच्या रूपात काही सुरक्षा देण्याचा आदेश देऊ शकतो.

जामीनाचे सुद्धा दोन प्रकार आहेत बरं  का ! जामीनाचे जामीनपात्र व अजामीनपात्र असे दोन प्रकार आहेत. जामीनपात्र गुन्ह्यात जामीन मिळवणे अधिकार असून अजामीनपात्र गुन्ह्याात पोलिसांना जामीन देण्याचा अधिकार नसतो. संबंधित न्यायालयासमोर अशा व्यक्तीस हजर केले जाते. न्यायालय घटनेच्या बाबींवर विचार करून जामीन देण्यासंबंधी निर्णय देते.

यातील गंभीर गुन्हे सत्र न्यायालयासमोर तर इतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिक-यासमोर चालतात. सत्र न्यायलयासमोरील प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांना जामीन देण्याचा अधिकार नाही. अपवादात्मक स्थितीत खालचे न्यायालय स्त्रिया, लहान मुले, अपंग व्यक्ती आदींसंबंधी जामीन देण्याचा विचार करते. जामीन देताना संबंधित व्यक्ती पळून जाणार नाही, साक्षीदारावर दबाव आणणार नाही, सुनावणीसाठी नियमित हजर राहील आदींचा प्रामुख्याने विचार केला जातो.

समजा एखाद्या प्रकरणाचा तपास अद्याप चालू आहे. आणि तपास करताना पोलिसांना आरोपीची गरज भासणार असेल किंवा आरोपीची जामिनावर सुटका झाल्यास तो साक्षीदारावर दबाव आणू शकतो असं पोलिसांना वाटतं  तेव्हा आरोपीला कोर्टात हजर करताना पोलीस आरोपीच्या कोठडीची मागणी करतात आणि हि मागणी करताना तपास अधिकाऱ्याला पुरेशी अशी कारणे पुराव्यानिशी न्यायाधीशांसमोर समोर सादर करावी लागतात.

न्यायाधीश त्या कारणांचा आणि पुराव्यांचा विचार करून कोठडी ची आवश्यकता आहे किंवा नाही यावर निर्णय घेऊन जामीन मंजूर अथवा नामंजूर करत असतात. जामीन मंजूर होणे म्हणजे आरोपी निर्दोष आहे असा त्याचा अर्थ होत नाही. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर कोर्टात खटला चालविला जातो. त्यावर सुनावणी घेतली जाते पुरावे आणि साक्षीदार तपासले जातात. दावे प्रतिदावे कोर्टात होतात. या सगळ्यांवर विचार करून न्यायाधीश निर्णय देत असतात.

वर आपण जे जामीनाचे प्रकार बघितले ते अटक झाल्यांनतर मिळणाऱ्या जामीनाचे आहेत. काही प्रकरणात अटक करण्यापूर्वीच जामीन दिला जातो त्याला अटक पूर्व जामीन असं म्हणतात.अटक पूर्व जामीन म्हणजे एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष अटक होण्यापूर्वीच जामिनावर सोडण्यासाठी दिले जाणारे निर्देश. एखाद्याने पोलिसांकडे आरोपी विरुद्द दिलेल्या गुन्हेगारी तक्रारीची माहिती घेतल्यानंतर, आरोपीकडून जामिनासाठी अर्ज केला जातो. सर्व परिस्थितींचा विचार केल्यानंतर न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर केला जातो.

आता आर्यन खान च्या जामिनाबाबत काय चाललंय हे जाणून घेऊया…

एनसीबी ने कोर्टामध्ये आर्यन खान च्या कोठडी ची मागणी करत आलंय. मागणी करत असताना त्यांनी असं म्हटलंय कि, क्रूझ वर जे ड्रग्स आढळून आले आहे त्याचा थेट संबंध परदेशातील ड्रग्स टोळीशी आहे त्यामुळे आर्यन खान चा ताबा असणं गरजेचं आहे.

यामुळे कोर्टाने आर्यन च्या कोठडीत वाढ केली होती. आर्यन खानचं  पुढे काय होतंय  हे तुम्हाला न्यूज चॅनेल, सोशल मेडिया च्या माध्यमातून हे कळेलच. पण जामीन म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते हे पण आज आपण जाणून घेतलंय. आता आर्यन खान आणि जामिनाच्या संदर्भात येणाऱ्या  बातम्या अधिक स्पष्टपणे समजायला लागतील एवढं मात्र नक्की.

हे ही  वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.