आर्यन खानला क्लीन चीट मिळाली आता समीर वानखेडे गोत्यात येऊ शकतात…

आर्यन खान ड्रग्स प्रकरणाने बॉलिवूड आणि राजकारण दोन्ही क्षेत्र ढवळून निघाले होते. या प्रकरणामुळे जेवढं आर्यन खानला लक्षात ठेवलं जाईल तितकंच समीर वानखेडे यांना देखील कुणीच विसरू शकणार नाही.

या प्रकरणी आर्यन खानला एनसीबीने गेल्या वर्षी ३ ऑक्टोबरला अटक केली होती. २६ दिवस तुरुंगात काढल्यानंतर ६ नोव्हेंबरला त्याला जामीन मंजुर झाला होता. याप्रकरणी आर्यनसह १९ जण आरोपी होते. मधल्या काळात या प्रकरणाचे अपडेट्स आले नव्हते, मात्र २७ मे २०२२ रोजी, 

आर्यन खानला एनसीबीने NCB ने क्रुझ शीप ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट दिली.  

याप्रकरणी एनसीबीने एनडीपीएस कोर्टात ६ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते मात्र त्यात आर्यन खानच्या नावाचा उल्लेखही नव्हता. आर्यन खानला क्लीन चीट तर मिळाली मात्र एनसीबीचे माजी तपास अधिकारी समीर वानखेडे गोत्यात येऊ शकतात. 

आर्यन खानला क्लीन चीट मिळणे म्हणजे तपासात काही गडबडी झाल्यात का ? किंव्हा मग आर्यन खान दोषीच नव्हता का ? असे प्रश्न उपस्थित झालेत. 

थोडक्यात आर्यन खान प्रकरण सर्वांना माहितीच आहे. जेंव्हा क्रुझ शीपवर ड्रग्स आढळले तेंव्हा एनसीबीने छापा टाकून आर्यन खान सह १९ जणांना आरोपी करण्यात आले होते.  हा तपास सुरुवातीपासूनच एनसीबी करत होती. मात्र एनसीबीच्या समीर वानखेडेंच्या नेतृत्वात असणाऱ्या तपासात चुका आढळल्या आणि मग हा तपास एसआयटीकडे सोपवला. 

SIT ने हाती केस घेतल्यानंतर SIT ला आर्यन आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करी सिंडिकेटचा भाग असल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाहीये. क्रुझवर देखील आर्यन खान आणि इतर काही जण सोडले तर बाकीचे नशेत आढळले होते.

SIT च्या तपास अहवालात काय आहे ?

 • आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे ड्रज नव्हते, त्यामुळे त्याच्या फोन आणि व्हॉट्सॲप चॅटची चौकशी करण्याची गरज नव्हती.
 • चॅटच्या चौकशीवरुन आर्यन आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा भाग होता, हे सिद्ध होत नाही.
 • आर्यनने त्याचा मित्र अरबाज मर्चंटला क्रूझवर ड्रग्ज आणण्यास सांगितले नव्हते.
 • एनसीबीने क्रूझ छापेमारीदरम्यान व्हिडिओ रेकॉर्डिंग केली नव्हती.

सर्वात महत्वाचं म्हणजे, ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर आर्यनचे मेडिकल झाले नाही, त्यामुळे आर्यनने ड्रग्ज सेवन केले होते की नाही हे सिद्ध होऊ शकले नाही?

 • सर्व आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची एकच जप्ती दाखवण्यात आली होती. 
 • एनसीबीचे डीजी संजय सिंह यांनी सांगितले की, अरबाज मर्चंटने आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलंय कि, त्याच्याकडचे जप्त करण्यात आलेले ड्रग्ज आर्यन खानसाठी आणलेले नव्हते.
 • एकाही ड्रग्ज तस्कराने आर्यनचा उल्लेख केला नाही. 
 • थोडक्यात पुराव्याअभावी आर्यन खान सह ५ व्यक्तींना क्लीन चिट मिळाली आहे.

मुंबई हाय कोर्टाने असं निरीक्षण नोंदवलं आहे कि, एनसीबीकडे आर्यन खानला दोषी सिद्ध करण्याएवढे सबळ पुरावे नाहीत.  

एनसीबीने एक प्रेस नोट जारी करून आर्यनला क्लीन चिट देण्याचे मान्य केले आहे.

एनसीबीचे डीजी एसएन प्रधान यांनी देखील हेच सांगितले कि, एनसीबीच्या तपासात काही उणीवा राहिल्यात, एवढेच नाही तर क्रूझवर छापा टाकणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात येईल आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे संकेत प्रधान यांनी दिले आहेत.

या सगळ्या मुद्द्यांमुळे समीर वानखेडेंच्या तपासावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.

SIT च्या अहवालानंतर चौकशी लागणार आहे आणि या चौकशीच्या कक्षेत समीर वानखेडे देखील येणार आहेत. थोडक्यात त्यांच्या वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्या दरम्यान वानखेडे यांना NCB मधून काढून रेव्हेन्यू इंटेलिजन्स DRI मध्ये पाठवण्यात आलं. SIT च्या तपासादरम्यान वानखेडे यांचे अनेक जबाब नोंदवण्यात आले. 

तसेच फक्त क्रुझवर छापा मारल्याच्या दरम्यान अनेक चुका झाल्या तसेच आर्यन खान इंटरनॅशनल ड्रग्स सिंडीकेटचा भाग असल्याचा आरोप करत व्हॉट्सॲप चॅटला मोठा पुरावा म्हणून न्यायालयात सादर केला होता. थोडक्यात तपासात उणीवा आढळल्या, आणि छापेमारीत देखील अनियमितता आढळली. असं SIT च्या अहवालात म्हंटलं गेलं आहे.

यावर केंद्र सरकार काय म्हणतंय ?

SIT चा अहवालाच्या आधारे, केंद्र सरकारने समीर वानखेडे यांची चौकशी करण्याचे आदेश दिलेत.  वानखेडे यांचा तपास निकृष्ट असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. तपास यंत्रणांनी वानखेडे यांची योग्य ती चौकशी करून कारवाई करावी असे आदेश सरकारने तपास यंत्रणेला दिले आहेत. 

हे झालं चौकशीच्या बाबतचा मुद्दा मात्र त्यानंतर समीर वानखेडे यांच्यावर काय कारवाई होऊ शकते ?

 याबाबत आम्ही कायदे तज्ञ असीम सरोदे चर्चा केली असता त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की,

“समीर वानखेडे यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून, आर्यन खानवर आकसापोटी कारवाई केलेली आहे अशा आरोपांतून आता समीर वानखेडे यांची चौकशी केली जाईल”. 

“या तपासाच्या चौकशीनंतर समीर वानखेडे हे मुख्य आरोपी ठरू शकतात. इतक्या दिवस कोणत्या पुराव्यांच्या आधारे आर्यन खानला तुरुंगवास करण्यात आला होता,. याबद्दलच्या कायदेशीर उत्तर देण्यास समीर वानखेडे बांधील ठरू शकतात”.

नवोदित मुलाला काहीही गुन्हा केलेला नसतांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून त्याला त्यासाठी तब्बल २६ दिवस तुरुंगात राहावं लागलं आहे. थोडक्यात त्याच्यावर बेजबाबदारपणे खोटे गुन्हे दाखल केले गेले, त्यामुळे त्या निर्दोष व्यक्तीवर मानसिक परिणाम झालेला आहे. त्याची नुकसान भरपाई कुणीच देऊ शकत नाही.

शाहरुख खान आर्यन खानच्या वडिलांची देखील बदनामी झालेली असल्यामुळे खान कुटुंब समीर वानखेडे यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकू शकतं, न्यायालयात खेचू शकते आणि नुकसान भरपाई मागू शकते. तसेच निर्दोष व्यक्तीचं गुन्हेगारीकरण करणे हे कायद्याच्या दृष्टिकोनातून गंभीर गुन्हा आहे.  

काय कारवाई होऊ शकते याबाबत असीम सरोदे सांगतात कि, 

 • समीर वानखेडे या तपासाचे नेतृत्व करत असल्यामुळे एक तर त्यांना नोकरीतून कायमचं सस्पेंड केलं जाईल.  
 • किंव्हा त्यांना नोकरीचे आणि नोकरी नंतर मिळणारे कोणतेच फायदे मिळणार नाहीत, जसे की, रिटायर्ड बेनिफिट इत्यादी लाभ त्यांना मिळणार नाही. 
 • किंव्हा त्यांच्यावर खूप मोठी दंडात्मक कारवाई होऊ शकते, अशी माहिती सरोदे यांनी बोल भिडूशी बोलताना दिली आहे. 

समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार…  ?

आधीच समीर वानखेडे यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्रक जमा केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला गेलाय ज्याअंतर्गत त्यांची कारवाई अजून चालूच आहे.

त्यात आता आर्यन खान प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने झाल्याचं स्पष्ट झालं आहे आणि या तपासाच्या वेळेस ही केस समीर वानखेडे यांच्याकडे होती. समीर वानखेडे आणि त्यांच्या तपास टीम ने आणखी काय चुका या तपासात केल्या आहेत याबाबतचा एनसीबीच्या व्हिजिलन्स टीमचा रिपोर्ट लवकरच समोर येण्याची शक्यता आहे असल्यामुळे वानखेडेंच्या अडचणीत भर पडणार अशी शक्यता वर्तवली जातेय…

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.