गोसावीचा सेल्फी १८ कोटीला पडला, आर्यन खान प्रकरणात नवा ट्विस्ट

जगात कुठं काही घडो ना घडो, आर्यन खान ड्रग्स प्रकरणात रोज काही ना काहीतरी खळबळ होतेच. आता हेच बघा सुरुवातीला असं वाटत होतं की, आर्यनला लगेच बेल मिळेल आणि तो बाहेर येईल. पण तसं झालं नाही. समीर वानखेडे आणि त्यांची टीम झटपट तपास करून निकाल देईल असं वाटत असताना तेही शक्य झालं नाही. उलट आता एनसीबीच्या दिल्लीतल्या पथकाकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे. वेगवेगळ्या पक्षाचे नेते रोज नवे दावे आणि प्रत्यारोप करत आहेत.

आर्यन खान प्रकरण जेव्हा उजेडात आलं, तेव्हापासून एक प्रश्न लोकांच्या चर्चेचा विषय ठरला होता, तो म्हणजे आर्यनसोबत सेल्फी काढणारा कार्यकर्ता कोण?

त्याचं नाव किरण गोसावी. आता तो एनसीबीचा अधिकारी आहे का खासगी गुप्तहेर हा प्रश्नही पडला. पण नंतर समजलं की, गोसावी या प्रकरणातला साक्षीदार आहे आणि त्याच्या स्वतःवरच गुन्हे दाखल आहेत. आता तुम्ही म्हणाल हे सगळं आम्हाला पाठ झालंय, परत कशाला सांगतोय भिडू?

पण कसंय नवा ट्विस्ट आलाय, तर तुमची जरा उजळणी करून द्यावी म्हणलं.

ट्विस्ट काय आलाय?

आर्यन खान प्रकरणातले प्रत्यक्ष साक्षीदार विजय पगारे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला. ते म्हणाले, ‘किरण गोसावीनं ५० लाख घेतले होते, त्यातली काही रक्कम अधिकाऱ्यांना मिळणार होती. सुनील पाटील हे समीर वानखेडेंच्या संपर्कात होते, माझ्यासमोर त्यांचं बोलणं व्हायचं. आर्यन खानला फसवलं जात असल्याचं मला ३ ऑक्टोबरलाच लक्षात आलं. या प्रकरणात खंडणी घेण्यात आली होती आणि यात अधिकारी वर्गाचाही समावेश असण्याची दाट शक्यता आहे.’

सुनील पाटील हे नाव आर्यन खान प्रकरणात नुकतंच समोर आलं. पगारे यांनीही सुनील पाटील यांचा प्रकरणात सक्रिय सहभाग असल्याचा दावा केला. ते म्हणाले, ‘सुनील पाटीलनं रेल्वेत कंत्राट मिळवून देतो सांगत, माझे आणि माझ्या मित्राचे मिळून ४३ लाख रुपये घेतलेत. तीन वर्ष झाले तरी त्यानं हे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळं मागच्या ६ महिन्यांपासून मी सतत सुनील पाटीलच्या सोबत होतो.’

त्याच्यापुढं काय झालं?

‘हा सगळा प्रकार २७ सप्टेंबर पासून सुरू होता. मी, सुनील पाटील आणि किरण गोसावी वाशीच्या फॉर्च्युन हॉटेलला होतो. तिथं मनीष भानुशाली (ड्रग्स प्रकरणातला आणखी एक साक्षीदार) आणि त्याची मैत्रीण दारू पिऊन आले होते. यावेळी भानुशालीनं आपल्या हातात मोठी गेम लागल्याचं पाटीलला सांगितलं. त्यातून खूप पैसे मिळणार आहेत आणि लगेच अहमदाबादला निघायचं आहे असंही तो म्हणाला. लगेचच सुनील पाटील आणि किरण गोसावी अहमदाबादला निघाले, तर मनीष दुसऱ्या दिवशी विमानानं अहमदाबादला गेला. त्यानंतर माझा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही,’ असं पगारे सांगतात.

त्यानंतर, २ ऑक्टोबरला माझं आणि सुनील पाटीलचं बोलणं झालं. तेव्हा आपल्या हाताला मोठं काम मिळालंय, त्यामुळं निवांत राहा, आज किंवा उद्या तुमचे ३५ लाख रुपये देतो, असं तो म्हणाल्याचा दावाही पगारे यांनी केला.

‘३ ऑक्टोबरला पहाटे मनीष भानुशाली हॉटेलवर आला आणि त्यानं आपलं मोठं काम झाल्याचं सांगितलं. मला तो एनसीबी ऑफिसला घेऊन आला. त्यावेळी प्रवासात तो मराठी, गुजराती आणि हिंदी भाषेत बोलत होता. तो फोनवर बोलताना, आपले पैसे अधिकारी तर खाणार नाहीत ना? किरण गोसावी पैसे घेऊन गायब तर होणार नाही ना? अशा चर्चा करत होता. त्यावेळी त्याचं सुनील पाटीलशीही बोलणं होत होतं. एनसीबी ऑफिसला पोहोचल्यावर तिथं मला अनेक कॅमेरे दिसले. मी घाबरलो आणि यांनी काहीतरी घोळ केल्याचं लक्षात आलं, त्यामुळं मी लगेचच हॉटेलला परतलो,’ असं पगारे यांनी सांगितलं.

वकील माने शिंदे यांचीही भेट घेतली

पगारे सांगतात, ‘दिवसभर किरण गोसावी आणि मनीष भानुशाली सतत टीव्हीवर दिसत होते. दुसऱ्या दिवशीच म्हणजे ४ तारखेला माझं सुनील पाटीलसोबत बोलणं झालं. ‘किरण गोसावीचा एक सेल्फी आपल्याला १८ कोटी रुपयांना पडला. गोसावीच्या मस्तीमुळं हातात आलेला सर्व पैसा परत गेला,’ असं तो म्हणल्यानंतर आर्यन खानला फसवलं जात असल्याचं माझ्या लक्षात आलं. आर्यन खानला कोर्टात आणलेलं असताना वकील सतीश माने शिंदे यांना भेटून मी आर्यनला फसवलंय याबद्दल सांगितलं, मात्र त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही.

आता जर पगारे यांच्या दाव्यात तथ्य सापडलं, तर आर्यन खान ड्रग्स प्रकरणातली गुंतागुंत आणखी वाढणार हे नक्की. सोबतच संशयाची सुई आता कुणाकडं फिरणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.