दानवे म्हणतायेत तसं मराठवाड्याच्या रेल्वेचा विकास निजमामुळेच झाला नाही का ?

मराठवाड्यात रेल्वेचं नेटवर्क नाही कारण निझाम. मिझामाला रेल्वेची गरज नव्हती म्हणून मराठवाड्यात रेल्वे आली नाही त्यामुळे मराठवाडा मागास राहिला..मराठवाड्याच्या मागासलेपणाबाबत केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी हे विधान केलय.

पण खरच रेल्वे न येण्यास निझाम कारणीभूत होता का?

तर यासाठी अधिकृत माहिती मिळते ती रावसाहेब दानवे ज्या खात्याचे राज्यमंत्री आहेत त्यांच्याच खात्याच्या वेबसाईटवरूनindianrailways.gov.in या बेवसाईटवर निझामाने मराठवाड्यात रेल्वे आणली की नाही याबाबत माहिती मिळते.

मात्र हा इतिहास समजून घेण्यापूर्वी आपणाला निझाम आणि त्यांच्या संस्थानाची बेसिक माहिती समजून घेतली पाहीजे.

भारताच्या स्वातंत्रवेळी स्वतंत्र भारतात जी काही संस्थाने शिल्लक होती त्यामध्ये हैद्राबात संस्थान हे भौगोलिक क्षेत्रफळ, संपत्ती या बाबतीत सर्वात मोठ्ठ संस्थान होतं. भारतात पाय रोवताना ब्रिटीशांनी एक पॅटर्न फॉलो केला. तो पॅटर्न होता तैनाती फौजांचा. म्हणजे एखाद्या संस्थानासोबत तैनाती फौजेचा करार करायचा. यामुळे संबंधित संस्थानाच्या सुरक्षेचे अधिकार ब्रिटीशांकडे जायचे, टेक्निकली फौज ब्रिटीशांची असायची मात्र पगार संस्थान करायचे.

याच तैनाती फौजांचा खर्च निझामाला परवडेना झाला, हा खर्च भागवण्यासाठी निझामाने ब्रिटीशांसोबत अजून एक करार केला.

यामध्ये निझामाच्या हैद्राबात संस्थानामध्ये असणारा बेरारचा भाग ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली गेला. आजच्या विदर्भातील अकोल, अमरावती, वाशीम याच बेरार भागात येणारी प्रमुख शहरं.
या भागातल्या शेतीचं प्रमुख उत्त्पन्न यायचं ते कापसापासून आणि या कापसाचं प्रमुख मार्केट होतं हैद्राबाद. शहर. मात्र ब्रिटीश व्यापारांचा फायदा हैद्राबादच्या मार्केटला घेता येत नव्हता. कारण त्यावेळी व्यापारी ठिकाणं असणारी मुंबई, चैन्नई व कलकत्ता ही शहर हैद्राबादला रेल्वेने कनेक्ट नव्हती.

दूसरी गोष्ट म्हणजे 1857 च्या उठावात निझामाने ब्रिटीशांना सहकार्य केलं होतं.

अशा प्रकारचा उठाव भविष्यात झाला तर रेल्वेमार्फत हैद्राबाद संस्थान ब्रिटीश भारतासोबत कनेक्ट असण्याची गरज ब्रिटीश व निझाम दोघांना जाणवत होती. पण खरी गरज ब्रिटीशांनाच अधिक होती.
ब्रिटीशांसाठी व्यापारापेक्षा हैद्राबादचं भौगोलिक स्थान महत्वाचं होतं. उत्तर भारताला दक्षिण भारतासोबत कनेक्ट होण्यासाठी हैद्राबाद संस्थान महत्वाचं होतं. शिवाय ब्रिटीश भारताच्या बरोबर मध्यभागी असल्याने हैद्राबाद संस्थान महत्वाचं ठरत होतं. म्हणूनच ब्रिटीशांनी निझामाकडे रेल्वे लाईन सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव प्रामुख्याने सैन्य व सैन्याच्या सामानाची ने आण करण्यासाठी उपयोगाला येणार होता.

पण रेल्वे लाईनचा सर्व खर्च करायचा होता तो निझामाने.

रेल्वे लाईन बांधणीचं काम ग्रेट इंडियन पेनिन्सुलार कंपनी करेल, खर्च निझाम करेल अस ठरवण्यात आणलं. याच कामाचा पहिला भाग म्हणून आजच्या कर्नाटकातील वाडी या स्टेशनवरून हैद्राबादच्या सिकंदरबादला कनेक्ट करणारी रेल्वे लाईन टाकण्यात आली. याचा प्रमुख वापर हा सैन्यासाठीच होणार असल्याने आजही ही रेल्वेलाईन इतर शहरांमधून न जाता डोंगर रस्त्यातून आडमार्गाने गेलेली दिसते.
या रेल्वे मार्गाचा खर्च करत होता तो निझाम.

साधारण 1 मैल रेल्वे ट्रॅक बांधण्यासाठी त्यावेळी 1 लाख रुपये निझाम ब्रिटीशांना देत होता.

श्रीमंत पण कंजूस समजल्या जाणाऱ्या निझामाला हा खर्च वायफळ वाटत होता. फायदा काहीच नाही पण ब्रिटीश आपल्याला पैसे खर्च करायला लावून स्वत:ची सोय करत आहेत. दूसरीकडे निझामाचा पैसा देखील कमी पडू लागल्याने ग्रेट इंडियन पेनिन्सुलार कंपनीने लंडनमध्ये आपले शेअर्स विकून पैसा उभारण्याचे प्रयत्न केले.

या सर्व घडामोडींमध्ये निझाम रेल्वेबद्दल नकारात्मकच होत गेला.

मात्र या काळात मनमाड-जालना, जालना-सेलू, परभणी-नांदेड, नांदेड-शिवणगाव असे रेल्वेमार्ग बांधण्यात आले. पण यातला सर्वात महत्वाचा मुद्दा होता तो मीटर गेज आणि ब्रॉड गेजचा. आपले जुने रेल्वे मार्ग हे मीटर गेज होते. मीटर गेज म्हणजे रेल्वेच्या दोन चाकांमधलं अंतर 1 मीटर इतकं. मात्र पुढे मोठे मार्ग ब्रॉडगेज झाले. त्यामुळे या मीटर गेज लाईन ब्रॉड गेज सोबत जोडण्यात आल्या नाहीत किंवा नव्याने खर्च करण्यात मर्यादा येत गेल्या.
दूसरीकडे निझाम देखील वाढत्या खर्चाने नकारात्मक झाला होता. रेल्वेच्या कनेक्टिविटीमुळे ब्रिटीशांचा हैद्राबाद संस्थानामध्ये हस्तक्षेप वाढेल अस त्याचं ठाम मत तयार झालं होतं. त्यामुळेच तत्कालीन बॉम्बे गव्हर्नरने बॉम्बे टू मद्रास हा हैद्राबादवरून जोडण्याचा प्रस्ताव निझामाने नाकारला व ही रेल्वे लाईन बॉम्बे-पुणे-वाडी मार्गे हैद्राबादला गेली.

अर्थात यावरून अस दिसतं की हैद्राबादच्या निझामाला रेल्वेचा खर्च करावा लागल्याने तो रेल्वे ट्रॅक उभारण्याबाबत उत्सुक नव्हता.

तरिही काही प्रमाणात लाईट गेज मार्ग सुरू करण्यात आले होते. अर्थात मराठवाड्यात रेल्वे रुट होण्याबद्दल निझाम कारणीभूत होता अस म्हणता येतं. पण त्यासाठीची कारण ही ब्रिटीश विरुद्ध निझाम या सत्तासंघर्षात होती.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.