अतिरेकी गोळीबार करत होते, तेवढ्यात बाळकृष्णाने आपली रायफल काढली आणि…

काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा दहशतवादाने डोकं वर काढलं आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी काश्मीरमध्ये तीन ठिकाणी अतिरेक्यांनी गोळीबार केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये ६ लोक मृत्युमुखी पडल्याचं सांगितलं जात आहे. राजौरीमध्ये असाच हल्ला अतिरेक्यांनी केला होता.
किमान चार घरांना लक्ष्य करण्यात आले, ज्यात चार लोक मारले गेले. तर आणखी सहा जण जखमी झाले. कथितरित्या हा हिंदू कुटुंबांवर हल्ला होता. हल्ला झाला त्यावेळी बाळकृष्ण हे दुकानातून घरी परतत होते. अचानक गोळीबाराचा आवाज आल्यावर ते लगेच घरात शिरले आणि त्यांच्याकडे असलेली विनापरवाना रायफल त्यांनी बाहेर काढली.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना बाळकृष्ण शर्मा सांगतात
“मी माझी रायफल उचलली आणि बाहेर पडलो. शेजारी दोन हल्लेखोर फिरताना मला दिसले. दोघेही माझ्या घराच्या अगदी जवळ होते. मी दोन राउंड फायर केले. ते घाबरले आणि जंगलात पळून गेले.”
बाळकृष्ण शर्मा यांच्या या कामगिरीमुळे अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण वाचल्याचं सांगण्यात येत आहे. अप्पर डांगरी पंचायतीचे सरपंच दर्शन शर्मा म्हणाले की, बाळकृष्ण घटनास्थळी नसता तर मृतांची संख्या खूप वाढली असती. बालकृष्ण यांच्या गोळीबारानंतर गावकरी घराबाहेर आले आणि जखमींना बाहेर काढण्यात आले. एक सामान्य नागरिक असलेल्या बाळकृष्ण शर्मा यांच्याकडे रायफल कशी आली याची गोष्टही इंटरेस्टिंग आहे. बालकृष्ण हे यापूर्वी ग्राम संरक्षण समितीचे (व्हीडीसी) सदस्य होते.
त्यावेळी त्यांना 1998-99 मध्ये पहिल्यांदा लष्कराने त्यांना बंदूक हाताळण्याचे प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीला 100 राउंड काडतुसे देण्यात आली. लष्कराच्या प्रशिक्षण शिबिरात त्यांनी 10 राउंड वापरल्या. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्याकडे 90 राउंड शिल्लक आहेत.
बाळकृष्ण शर्मा सांगतात
”माझ्याकडे परवाना नव्हता आणि तो वापरला जाण्याची शक्यता नव्हती, त्यामुळे ही रायफल घरी मला ‘दांडा’ सारखा वापरला जायचा. 24 वर्षात मला कधीच बंदूक चालवून पाहायची गरज लागली नाही”
1990 च्या दशकात -जेव्हा जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद शिगेला पोहोचला होता. लष्कराला मदत व्हावी म्हणून जम्मूच्या 10 जिल्ह्यांमध्ये ग्राम संरक्षण समित्या तयार करण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर ग्राम संरक्षण समित्यांच्या मेम्बर्सवर शस्त्रांचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे पुढे या समित्यांचे महत्व कमी होत गेले. प्रशासनाने व्हीडीसीच्या माजी सदस्यांना त्यांची शस्त्रे परत करण्याची विनंती केली. बाळकृष्ण शर्मा यांच्या डांगरीमध्येही जिल्हा प्रशासनाने ६० वर्षांवरील व्हीडीसी सदस्यांना त्यांच्या बंदुका परत करण्यास सांगितले. मात्र बाळकृष्ण हे अवघे ४२ वर्षांचे असल्याने त्यांनी रायफल ठेवली.
विशेष म्हणजे बाळकृष्ण शर्मा यांनी नेमक टायमिंगल शौर्य दाखवलं आहे. कारण जम्मू काश्मीर प्रशासन ग्राम संरक्षण समित्या पुनश्च चालू करण्याची तयारी करत आहे. 2 जानेवारीलाच जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये व्हीडीसीची पुनर्रचना केली जाईल. त्यानुसार सामान्य नागरिकांना शस्त्र परवाने दिले जाऊ शकतात. जम्मू काश्मीरमध्ये अतेरिके घटना अधून मधुन चालूच असतात अशावेळी सरकारचा हा निर्णय महत्वपूर्ण ठरू शकतोय.
त्यामुळे आता बाळकृष्ण शर्मा यांच्यासारखे अनेक सामान्य नागरिकांच्या हातात स्वसंरक्षणसाठी आणि सैन्याला मदत म्हणून शस्त्रं दिली जाऊ शकतात. बाकी बाळकृष्ण शर्मा यांचे त्यांनी दाखवलेल्या धौर्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यासाठी जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी देखील शर्मा यांचं कौतुक केलं आहे.
हे ही वाच भिडू :
- आरडी बर्मन खऱ्या अर्थानं प्लेबॅक सिंगिंगचे ट्रेंडसेटर होते…
- दोन सरकारी विभागांमधला वाद थांबला असता, तर कदाचित रिषभ पंतचा अपघात झाला नसता