१६ वर्षांच्या आशा भोसलेंनी घरच्यां विरोधात बंड पुकारून लतादीदींच्या सेक्रेटरीशी लग्न केलं
आशा भोसले या नावाचं वलय आणि सुवर्णकाळ बॉलिवूडमध्ये होता आणि अजूनही आहेच म्हणावा लागेल कारण त्यांच्या चाहत्यांची संख्या आजही वाढतेच आहे. बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करून आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गाण्याचा रेकॉर्डसुद्धा आशा भोसलेंनी केला होता. पण वैयक्तिक आयुष्यात आशा भोसले या बंडखोर होत्या आणि त्याची सुरवात त्यांच्या लग्नापासूनच होते.
८ सप्टेंबर १९३३ रोजी आशाताईंचा जन्म झाला. दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या असल्याने संगीत त्यांच्या नसानसात भिनलेलं होतं. मास्टर दीनानाथ मंगेशकरांचं निधन झाल्यानंतर सांगलीहून त्या लता दीदींसोबत कोल्हापूरला आल्या. घरची परिस्थिती सांभाळण्यासाठी आशाताईसुद्धा गात होत्या पण लता दीदींइतकं फेम त्यांना मिळत नव्हतं. लताईदीदी तेव्हा प्रसिद्धीच्या भरात होत्या आणि आशाताई अजूनही स्वतःला गायिका म्हणून सिद्ध करण्यासाठी झगडत होत्या.
याच स्ट्रगलच्या काळात कल्पना केली नसेल असं कृत्य आशा ताईंच्या हातून घडलं. आशाताई या लतादीदींचे सेक्रेटरी असलेल्या गणपतराव भोसले यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. आणि मेन म्हणजे आशा भोसले तेव्हा फक्त १६ वर्षांच्या होत्या आणि गणपतराव भोसले हे आशाताईंच्या तुलनेत वयाने दुप्पट होते. हि बातमी लतादीदींना कळली आणि त्यांनी आपल्या बहिणीसोबत मंगेशकर कुटुंबियांचे सगळे संबंध तोडून टाकले.
आशाताईंनीही गणपतराव भोसलेंसाठी मंगेशकर कुटुंबासोबत संबंध तोडले. गणपतराव भोसलेंसोबत लग्न करून आशाताईंना एक मुलगा झाला आणि मंगेशकर कुटुंबासोबत त्यांचं परत एकदा पॅचअप झालं. मंगेशकर कुटुंबाने आशा भोसले यांच्या संसाराला स्वीकार केलं. आता सगळं चांगलं सुरु होतं आशाताई आणि लतादीदी एकत्र आल्या होत्या पण गणपतराव भोसलेंना हे काही रुचेना आणि त्यांनी आशाताईंना मंगेशकर कुटुंबियांपासून दूर राहण्यास सांगितलं विशेषकरून लता दीदींपासून.
पुढे आशाताईंना अजून दोन मुले झाली, पण भोसले कुटुंबात त्यांच्यासोबत चांगल्या गोष्टी घेत नव्हत्या. आशा भोसले आपल्या तीन अपत्यांचा सांभाळ करत होत्या तर नेमकं त्याच वेळी लता दीदी बॉलिवूडवर राज्य करत होत्या. लता दीदींची प्रसिद्धी बघून गणपतराव भोसलेंना असं वागतु लागलं कि आशाताईंना पूर्ण संधी मिळाली नाही. त्यांनी आशा ताईंकडे जास्त पैसे कमवण्याची अट ठेवली.
१९५० च्या सुमारास लता दीदींसोबत जास्त संबंध ठेवण्यास गणपतराव भोसलेंनी आशाताईंना मनाई केली. पुढे या कारणांवरून या दाम्पत्यामध्ये वाद होऊ लागले. दोघांचही एकमेकांशी पटेनासं झालं आणि १९६० मध्ये गणपतराव भोसलेंनी आशाताई आणि त्यांच्या तीन मुलांना बाहेरची वाट दाखवली. हे लग्न काही जास्त काळ टिकू शकलं नाही. पण याच काळात आशाताईंनी बॉलिवूडमध्ये आपली जादू दाखवायला सुरवात केली.
एकामागोमाग हिट देत आशाताईंनी आपली यशस्वी घोडदौड सुरु ठेवली. खरंतर गणपतराव भोसलेंपासून वेगळं झाल्यानंतर उलट आशाताईंच्या करिअरला बहर आला. गुमराह, वक्त, आदमी और इन्सान आणि हमराज सारख्या सिनेमांमध्ये गाऊन आशा भोसले या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचल्या. करोडोंमध्ये आशाताईंची फॅन फॉलोईंग वाढली होती. यातच एक फॅन होता आर.डी.बर्मन.
१९७१ मध्ये बर्मनचा त्याच्या बायकोसोबत घटस्फोट झाला. पण आशा भोसले आणि आरडी बर्मन हि जोडी बॉलिवूडमध्ये जबरदस्त हिट गाणी देऊ लागली होती. आरडी बर्मन हे आशा भोसलेंपेक्षा ६ वर्षांनी लहान होते तरीही आशा भोसलेंना प्रपोज केलं पण हे प्रपोजल आशा भोसलेंनी स्वीकारलं नाही कारण त्यांच्या जुन्या आठवणी अजूनही ताज्याच होत्या. पण काही काळानंतर त्यांचं जुळलं.
वयाच्या ४७ व्या वर्षी आशा भोसलेंनी आरडी बर्मन यांच्यासोबत लग्न केलं. या काळात आशा भोसलेंनी पंचमदा सोबत अनेक हिट गाणी दिली. पुढे दारूच्या अतिसेवनाने आरडी बर्मन यांचं निधन झालं. आशा भोसले आणि आरडी बर्मन यांचा १४ वर्षे संसार चालला. पण पुढे आशा भोसले यांनी या कठीण काळातून पुढे जात आपली कला दाखवून दिली.
घरच्यांच्या विरोधात जात आपली लव्हस्टोरी पुढे चालवणाऱ्या आशाताई या बंडखोरचं होत्या, गाण्याच्या बाबतीतही त्यांनी आपला हा बंडखोरपणा खरा ठरवला आणि आपला एक वेगळा ठसा उमटवला. आजही आशा भोसले यांची गाणी तितकीच फ्रेश मानली जातात आणि त्यांचे चाहते आजही टिकून आहेत.
हे हि वाच भिडू :
- लतादीदी व रफीच्या भांडणात आशा भोसलेंनी संधी साधली आणि गिनीज बुकात नाव नोंदवलं..
- आशा भोसलेंना ठाऊक नव्हतं त्यांना चोरून गुलाब पाठवणारा शेजारीच बसलाय
- रद्दीच्या दुकानात हृदयनाथ मंगेशकरांना सापडलेलं गाणं अजरामर झालं…
- बॉलिवूडच्या नटीने अपमान केला, दादांनी सातारा स्टॅन्डवर गाठ पडलेल्या पोरीला हिरॉईन बनवलं..