बॉलिवूडच्या नटीने अपमान केला, दादांनी सातारा स्टॅन्डवर गाठ पडलेल्या पोरीला हिरॉईन बनवलं..

दादा कोंडके हे नाव जरी डोळ्यासमोर आलं तरी त्यांच्या चित्रपटातील गाणी ,विनोद ,गमतीदार संवाद असा सगळा भव्य दिव्य काळ आपल्यासमोर उभा राहतो. प्रत्येक मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत म्हणजे दादा कोंडके. त्यांची चित्रपट क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी आणि सलग हिट चित्रपट देण्याचा फॉर्मुला त्यांना गिनीज बुकापर्यंत घेऊन गेला.

दादांचा पहिलाच चित्रपट निर्माते आणि मुख्य अभिनेते म्हणून असलेला

‘ सोंगाड्या ‘

या सोंगाड्या चित्रपटाच्या अभिनेत्रीचा शोध घेताना झालेली दादांची तारांबळ आपण बघूया.

चित्रपट क्षेत्रात येण्याआधी दादा सेवादलातील कलापथकात काम करायचे. तिथे निळू फुले आणि राम नगरकर यांच्याशी त्यांची चांगली मैत्री होती. पुढे कलापथक बंद पडल्यावर दादांनी स्वतच कलापथक स्थापन केलं आणि तिथे लोकनाट्य निर्माण केल.

वसंत सबनिसांनी त्यांचं ‘ विच्छा माझी पुरी करा ‘ हे लोकनाट्य लिहिलं आणि ते भरपूर चालत होतं. त्यांची लोकनाट्य इतकी तुफ्फान चालत होती की महिन्या महिन्याच्या त्यांच्या तारखा बुक असत. या लोकनाट्याचे १५००हुन अधिक प्रयोग झाले होते. मोठमोठी राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मातब्बर मंडळी त्यांच्या नाटकाला आवर्जून येत असत. नाटकातील त्यांचा अभिनय आणि हजरजबाबीपणा सगळ्यांनाच आवडायचा.

एकदा आशा भोसले प्रयोग बघायला आल्या आणि त्यांनी दादांचा अभिनय बघून भालजी पेंढारकरांना त्यांच्या पुढच्या चित्रपटासाठी दादा कोंडके हे नाव सुचवलं. मग तिथून दादा कोंडके हे पर्व सुरु झाले.

पुढे त्यांनी भालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती या चित्रपटातून पदार्पण केलं. १९७१ साली दादांनी स्वतची निर्मिती असलेला सोंगाड्या हा चित्रपट बनवण्याचा निश्चय केला. दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी आणि निर्माते दादा कोंडके. या चित्रपटाच कथानक भालजी पेंढारकर यांनी तयार केलं. संवाद वसंत सबनिसांनी लिहिले.  राम कदम यांनी या चित्रपटाच संगीत दिग्दर्शन केलं. दादा यात स्वत मुख्य भूमिकेत होते, आणि अभिनेत्री शोधत होते.

आधी त्यांनी जयश्री गडकरींना चित्रपटासाठी विचारलं कारण त्या उत्तम नृत्य करायच्या आणि अभिनयही तोडीस तोड करायच्या. त्यावेळी

जयश्री गडकर या टॉपच्या नायिका होत्या. अरुण सरनाईक ,सुर्यकांत मांढरे अशा देखण्या नट लोकांसोबत त्या काम करायच्या. प्रस्ताव वाचून झाल्यावर दादा मुख्य नायक आहेत हे कळल्यावर त्यांनी चित्रपट करण्यासाठी नकार दिला.

याचदरम्यान हिंदी चित्रपटातील आघाडीची नायिका आशा पारेख या फक्त हिंदीत न अडकता वेगळ काहीतरी करू पाहत आहे असं दादांना कळल. लगेचच दादा आशा पारेख यांच्याकडे गेले. दादांनी त्यांना सोंगाड्या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवली. आशा पारेख यांना स्क्रिप्ट आवडली.

मुख्य नायक कोण आहे याची विचारणा केली असता दादांनी स्वत मुख्य भूमिका करणार आहे असं त्यांना सांगितलं. हे वाक्य ऐकून आशा पारेख यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आणि त्यांचे बदलले हावभाव बघून दादांनी तिथून काढता पाय घेतला.

अजूनही या चित्रपटाच्या नायिकेचा शोध सुरूच होता. त्याचबरोबर त्यांचे ‘ विच्छा ‘चे प्रयोगही चालूच होते. त्यावेळी प्रयोगासाठी कोल्हापूरला जात असताना सातारा बस स्टॅन्ड वर त्यांची भेट उषा चव्हाण यांच्याशी झाली. तेव्हा

उषा चव्हाण या ‘ लवंगी मिरची कोल्हापूरची ‘ या प्रयोगासाठी कोल्हापूरला चालल्या होत्या.

त्यांच्या बरोबर तेव्हा निळू फुले, अरुण सरनाईक, राम नगरकर ही मंडळी होती. दादांनी राम नगरकरांना उषा चव्हाण यांना विचारायला सांगितलं की त्या माझ्या चित्रपटात काम करतील का ?

चित्रपटात मुख्य नायिका म्हणून विचारणा होत असल्याने उषा चव्हाण यांनीही भूमिकेसाठी होकार दर्शविला. सोंगाड्या हा चित्रपट पुढे तब्बल ३३हुन अधिक आठवडे चित्रपट गृहात तळ ठोकून होता.

उषा चव्हाण या नायिका मिळाल्यानंतर दादांनी मग इतर कुठल्याही अभिनेत्रीला माझा चित्रपट करा म्हणून ऑफर दिली नाही. सोंगाड्या चित्रपटानंतर मराठी इंडस्ट्रीला एक नवीन जोडी मिळाली ती म्हणजे दादा कोंडके आणि उषा चव्हाण.

माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी……

हे गाण प्रचंड गाजलं आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता.

या जोडीने पुढे सलग ९ चित्रपट केले आणि सगळेच्या सगळे गाजले.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.