बोलभिडू स्पेशल : तूम्ही जिवंत असताना चार रुपये देऊ शकत नाही आणि मेल्यावर आमची किंमत करता

कोरोना काळात आपण ज्यांच्या भीतीने घरात बसतो ते पोलिस, जे आपल्याला या आजारातुन बरं करतात ते डॉक्टर्स, बरं होत असतांना ज्या आपली सेवा करतात त्या नर्सेस हे अशा वेगवेगळ्या स्वरुपात योद्धे म्हणून धावून आले. सरकारनं आणि समाजानं देखील यांच्या कामाची दखलं घेतली.

पण यांच्यासोबतच खांद्याला खांदा लावून काम करणारे पण काहीसे दुर्लक्षित राहिलेले कोरोना योद्धा म्हणजे ‘आशा’ अर्थात ॲक्रिडेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट.

कोरोनाच्या लढाईतील सगळ्यात शेवटच्या स्तरावरील योद्ध्या.

त्या गावपातळीवर काम करत असतात, त्यांना किती मानधन मिळत, कोरोनाच्या आधी त्यांच काम काय असायचं, आणि आता त्यात कसा बदल झाला आहे या गोष्टी अगदीच जुजबी आणि कागदोपत्री माहित होत्या. पण याबाबतीत प्रत्यक्ष परिस्थिती काय होती हे माहित करुन घेण्यासाठी बोलभिडूने ‘आशा’ सेविकांशीच बोलण्याचं ठरवलं.

त्यासाठी आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कावने गावातील ‘लता ढेरे’ यांच्याशी संपर्क केला.

त्या सांगतात,

मी २००९ पासून ‘आशा’ सेविका म्हणून काम करत आहे. आमचं काम म्हणजे, गावातील गरोदर महिलांची देखभाल करणं, बाळंतपणावेळी त्यांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी मदत करणं, स्तनदा मातांचा आहार, नवजात शिशूचं लसिकरण यासोबतचं हिवताप आणि इतर आजारी रुग्णांचा सर्वे करणं हे होतं. पण आता कोरोना पासून काम जास्त वाढलं.

यामध्ये पुणे, मुंबई व इतर बाहेरगावहून आलेल्या नागरिकांची माहिती गोळा करतो. जर बाहेरुन कोणी आलं असेलं तर त्यांना आम्ही शाळेतच क्वारंटाईन करतो. मग पुढचे १४ दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवतो. रात्री – अपरात्री कोणाला काही त्रास जाणवला तरी जावं लागतं. आमच्या मदतील आता गावातील अंगणवाडी सेविका देखील आहेत. सगळे गावातील प्रत्येक घरोघरी जावून सर्वे करतो. त्यासाठी सकाळी नऊला जावचं लागतं. अन्यथा त्यानंतर गावातील महिला, पुरुष ही बहुतांश मंडळी शेतात जातात. मग सर्वेसाठी भेटत नाहीत.

आणि या सगळ्या कोरोनाच्या कामासाठी सरकार आम्हाला महिन्याला एक हजार रुपये देतं. म्हणजे दिवसाला ३० रुपये.

ते ही वेळेवर देत नाही. एप्रिलपासून आम्हाला आमचं नेहमीच मानधन आणि कोरोनाच मानधन यापैकी एक रुपया पण मिळालेला नाही. जुलैमध्ये मिटींगला सांगितलं की, आता मानधन वाढणार आहे. सध्या आम्ही हे समाजसेवा केल्या सारखंचं करतोय, पण आता नको वाटतं आहे. पती पेट्रोल पंपावर कामाला जातात. त्यांचा तुटपुंज्या ९-१० हजारावरचं दोन मुलांच्या शिक्षणापासून सगळं घर चालवाव लागतं.

घरची एखादी जबाबदारी उचलायची तर ती पण उचलता येत नाही. गावात जेव्हा सर्वेला जातो तेव्हा लोकं विचारतात “काय मग ढेरे मॅडम, चांगला पगार झाला असेल आता, त्याशिवाय काय एवढं रोज फिरताय. पण त्यांना काय सांगायचं की ६ महिने झाले आमचा पगारच झालेला नाही.

मानधन वाढवून आणि वेळेवर मिळावं यासाठी आम्ही आंदोलन पण केलं. पुढारीच्या प्रेसजवळ हायवे अडवला होता, तेव्हा गांधीनगर पोलिस स्टेशनला उचलून नेलं होतं. तेव्हा आमचं म्हणणं एवढचं होतं की, आमच्या कामाची कुठं तरी थोडी दखलं घेवून जे काही तुटपुंज तुम्ही देता त्यात थोडी वाढं करा. आणि वेळेवर द्यावं.

सुरक्षेसाठी पण मागील महिन्यात किट दिलं. त्याआधीव आम्ही सनकोट आणि स्टोल बांधूनच आमचं कर्तव्य पुर्ण केलं.

विम्याबद्दल विचारलं असता लता ढेरे म्हणाल्या,

विमा असून उपयोग काय? तुम्ही जर जिवंत असताना चार रुपये देत नसाल आणि मेल्यावर आमची किंमत ५० हजार रुपये करता. कशासाठी?

असा प्रश्नही लता ढेरे यांनी व्यवस्थेला विचारला आहे.

कावने गावातील अंगणवाडी सेविका रुपाली पाटील यांचं आता डबल काम चालू आहे. त्या म्हणाल्या, आता अंगणवाडी बंद असली तरी अंगणवाडीची काम चालूच आहेत. यामध्ये धान्य वाटप, लहान मुलांची उंची आणि वजन याचं निरिक्षण ठेवणं, मुलं, माता यांचं नियमित लसीकरण आणि आरोग्य तपासणी, गरोदर आणि स्तनदा मातेला पूरक पोषण आहार मिळवून देणं ही कामं आहेत.

सोबत आता आशा सेविकांसोबत कोरोनाच्या कामादेखील आम्हाला जोडलं आहे.

कोतोली गावातील आशा सेविका अंजना कोळेकर यांचा अनुभव थोडा वेगळा आहे.

सर्वेमध्ये त्यांना अशी बरीचं उदाहरण पाहायला मिळाली की ज्यात माहिती लपवली जात होती. म्हणजे बाहेरुन आलेले किंवा काही लक्षण जाणवतं असलेल्यांना रुममध्ये किंवा पडद्यामागं लपवल्याचं देखील पहायला मिळालं.

गावात फिरायला भिती वाटायची सर्वेच्या वेळी आलेल्या दुसऱ्या अनुभवाबद्दल कोळेकर सांगतात, सुरवातील भिती वाटायची. भयानक घाबरायचो. म्हणजे पहिल्या दोन लॉकडाऊनमध्ये बाहेर कोणीच नसायचं. सगळं गाव सामसुम आणि आम्हीच बाहेर असायचो. या आजाराबद्दल पण सुरुवातीला काही जास्त माहिती नव्हतं. त्यामुळे आम्ही घरी जाताना खूप घाबरत जायचो. कुटुंबीयांचा संपर्क टाळायचो.

कारण आम्ही ज्यांच्याशी रोज बोलायचो त्यातील १/२ तरी पॉझिटीव्ह सापडतच होते. आज गावात १०० पर्यंत पॉझिटीव्हचा आकडा गेला आहे.

सुरक्षा साधनांविषयी विचारलं असता त्या म्हणाल्या, आमच्या ऑफिसकडून आम्हाला सगळं साहित्य मिळालं. प्रकल्प अधिकाऱ्यांनी सगळं बंद होतं, वाहतुक बंद होती तरीही बीट पर्यंत सॅनिटायझरच्या बाटल्या, हॅन्डग्लोव्हज, मास्क असं साहित्य आणून दिलं होतं. सुरक्षा साधनं असली तरी भिती होतीच. पण आता जरा सवय झाली आहे.

लता ढेरे यांनी मानधन मिळालं नसल्याचं सांगितल्यानंतर हाच प्रश्न आम्ही अंजना कोळेकर यांना विचारला. तेव्हा त्या म्हणाल्या, मानधन मिळत नाही, पण आम्ही भत्ता आणि पगार यापेक्षा पण काम करताना अडचणीत असलेल्या गरोदर मातेचा चेहरा, एखादे कुपोषित बाळ, क्षयरुग्ण, कोरोनाचा संशयित असा कोणीही ज्याला औषध आणि उपचाराची गरज आहे, तो डोळ्यासमोर असतो. अशा अडलेल्या लोकांची सेवा करण्याचा आनंद वेगळाच असतो.

नाशिक जिल्ह्यातल्या मळगाव या गावी राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या आशा गटप्रवर्तक रोहिणी आहिरे यांना दोन दिवस संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होवू शकला नाही. परंतु त्यांच्या बाबतीत घडलेली घटना इथं सांगणं करणं गरजेचं आहे.

आशा गटप्रवर्तक म्हणजे १२ ते १५ आशा सेविकेंची प्रमुख. काही दिवसांपुर्वी रोहिणी यांनी बाहेरगावहून आलेल्या काही लोकांना होम क्वारंटाईन व्हायला सांगितलं होतं आणि अशा लोकांची यादी आरोग्य विभागाला पाठवली. पण “आमची नावं वर पाठवलीच कशी?” याचा राग येऊन गावातल्या काही लोकांनी रोहिणी आहिरेंना मारहाण केली.

त्या आणि त्यांचे पति गाडीवरून जात होते. तेव्हा काहीही ध्यानीमनी नसताना गावात त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यात रोहिणी यांच्या मांडीला तर त्यांच्या पतिच्या हातावर मार लागला होता.

एप्रिलमध्ये मध्यप्रदेशमधील इंदूरमध्ये डॉक्टरांना मारहाण झाल्यानंतर कोरोना काळात आरोग्य कर्मचारी तसंच आशा सेविकांवर हल्ले करणाऱ्या व्यक्तींना ७ वर्षांपर्यत कैद आणि दंडाची शिक्षा सुनावणारा अध्यादेश केंद्र सरकारने काढला होता.

तुंटपुंजे मानधन ते देखील वेळेत भेटत नाही, कोरोना काळात बाहेर आलेल्यांची, अस्वस्थ वाटणाऱ्यांची नावे वरती कळवावीत तर गावकऱ्यांची अनामिक भिती, सुरक्षतेच्या नावाने सनकोट आणि सॅनिटायझर वरती घर आणि संसार अशा वेगवेगळ्या चक्रात अडकलेल्या आशा-सेविकांना निदान आपल्या कामांच कौतुक तरी समाजाने करावं अशी अपेक्षा असते, हल्ली जो तो उठून कोरोना योद्ध्याचं सर्टिफिकेट घेवून चालला असताना खरा योद्धा मात्र चार पैशांसाठी आजही आपला जीव पणाला लावत आहे हिच वास्तविकता आशा सेविकांसोबत बोलल्यानंतर जाणवली.

  • ऋषिकेश नळगुणे

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.