अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार, अशी चर्चा दरवेळी का होते ?

अलीकडच्या काळात अनेक भाजप नेते हे छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा  ज्योतिबा-सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील इत्यादी थोर पुरुषांवर वादग्रस्त विधान केल्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या वक्तव्यांचा निषेध, बेरोजगारी, महागाई इत्यादी समस्यांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज महाविकास आघाडीकडून मुंबईमध्ये महामोर्चाचं काढण्यात आला होता.

लाखो कार्यकर्ते सहभागी झालेल्या या मोर्चात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच मोठे नेते उपस्थित होते. परंतु यात काँग्रेसचे एक एक नेते गैरहजर होते.

ते म्हणजे अशोक चव्हाण…

अशोक चव्हाण यांनी महामोर्चाला गैरहजर राहण्याचं कारण ट्विट करून सांगितलं  

अशोक चव्हाण यांच्या निकटवर्तीय कुटुंबात आज एक विवाहसोहळा आहे. ते पूर्वनियोजित कार्यक्रमात सहभागी होणार असल्यामुळे महामोर्चाला हजर राहणार नाहीत. त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी आणि माजी आमदार अमिता चव्हाण या महामोर्चात सहभागी होतील असं चव्हाण यांनी सांगितलं.

 

महाविकास आघाडी आक्रमक होत आहे. तर दुसरीकडे एका लग्नसोहळ्यामुळे अशोक चव्हाणांनी महामोर्चाला उपस्थित न राहणे हे अनेकांना पटलेलं नाही, असं सांगितलं जात आहे. त्यामुळेच अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

पण निव्वळ आजच नाही तर यापूर्वी देखील अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा झाली होती. 

१) शिवसेनेतील बंडखोरीनंतर झालेल्या विश्वासदर्शक ठरावाला अशोक चव्हाण उशिरा पोहोचले होते.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना झाल्यानंतर विश्वासदर्शक ठराव घेण्यात आला होता. या विश्वासदर्शक ठरावासाठी घेण्यात आलेल्या अधिवेशनाला सकाळी ११ च्या आत हजार राहायचं होतं हे आधीच जाहीर करण्यात आलं होतं. मात्र तरीदेखील अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे काही आमदार उशिरा सभागृहात पोहोचले होते.

अशोक चव्हाण यांना उशीर झाल्यामुळे त्यांना सभागृहात प्रवेश मिळाला नाही आणि त्यामुळे त्यांना मतदान करता आलं नाही. सभागृहात उशिरा पोहोचल्यामुळे त्यांना आणि इतर आमदारांना करणे दाखवा नोटीस देखील पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येते.

२) चव्हाणांच्या भोकर मतदार संघातील वाटरग्रीड प्रोजेक्टला शिंदे-फडणवीस सरकारने निधी दिला होता.

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने मंजुरी दिलेल्या अनेक प्रकल्पांना रद्द केलं होतं. परंतु अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदार संघामध्ये १८३ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या वॉटरग्रीड प्रकल्पाला  शिंदे-फडणवीस सरकारने ७२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. 

या प्रकल्पाला निधी मिळाल्यामुळे अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली होती. परंतु स्वतः अशोक चव्हाणांनी आपण काँग्रेस सोडणार नसल्याची माहिती दिली तेव्हा या चर्चा बंद झाल्या होत्या.  

३) अब्दुल सत्तार आणि अशोक चव्हाण यांच्या भेटीनंतर चर्चा सुरु झाल्या होत्या.  

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झाल्यानंतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्याचा दौरा केला. यात जेव्हा ते नांदेडच्या दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी अशोक चव्हाण यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये चव्हाण आणि सत्तारांनी जवळपास २० मिनिटे चर्चा केली असं सांगितलं जातं.

चव्हाण आणि सत्तार यांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा चव्हाण काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरु झाली होती. परंतु अब्दुल सत्तारांनी स्पष्ट केलं की अशोक चव्हाण आणि मी जुने मित्र आहोत, ही फक्त सदिच्छा भेट होती, यात कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तेव्हा त्या चर्चेवर पूर्णविराम लागला होता.

४) ऐन भारत जोडो यात्रेच्या पूर्वी अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे चर्चा सुरु झाली होती.

७ नोव्हेंबरला भारत जोडो यात्रा तेलंगणामधून महाराष्ट्रात येणार होती. अशोक चव्हाण भारत जोडो यात्रेच्या नांदेमधील सर्व तयारीच्या कामात व्यस्त होते तेव्हा अब्दुल सत्तार यांनी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं विधान केलं होतं.

ते म्हणाले होते की, “अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे असं मला अशोक चव्हाणांच्या जवळचे आमदार अमर राजूकर यांनी सांगितलं आहे.” असं सत्तार यांनी म्हटलं होतं.

सत्तारांच्या या विधानानंतर चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. मात्र चव्हाणांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. जेव्हा भारत जोडो यात्रा नांदेडला आली तेव्हा चव्हाणांनी भाजपवर निशाणा साधला आणि सगळ्या चर्चांवर परत फुल स्टॉप लागलं होतं.

काँग्रेस सोडणार नाही असं सांगितल्यानंतर आता कौटुंबिक कारण देऊन अशोक चव्हाण महामोर्चाला गैरहजर राहिले. त्यामुळे चव्हाण यांनी भाजपबाबत सावध भूमिका घेण्याचं कारण काय असेल? 

१) नांदेडचा बालेकिल्ला राखून देखील काँग्रेसमध्ये न मिळणारी संधी

अशोक चव्हाण हे काँग्रेसमधील मोठे नेते आहेत, वडील शंकरराव चव्हाण यांच्याप्रमाणेच ते देखील राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील सर्व ९ जागा त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला मिळवून दिल्या होत्या. परंतु २०१० मध्ये मुख्यमंत्री पदावरून काढून टाकण्यात आल्यापासून पक्षाने त्यांना कोणतीही मोठी जबाबदारी दिलेली नाही. 

२०१४ मध्ये अशोक चव्हाण यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. मोदी लाटेमध्ये महाराष्ट्रातील दिग्गज नेते निवडणूक हरले असतांना अशोक चव्हाणांची स्वतःचा नांदेड मतदार संघ राखून ठेवला होता. एवढंच नाही तर शेजारच्या हिंगोली मतदारसंघातून राजीव सातव यांना निवडून आणण्यामागे देखील अशोक चव्हाण यांचा महत्वाचा वाटा असल्याचं सांगितलं जातं. 

मात्र पक्षाने २०१४ पासून चव्हाण यांना राष्ट्रीय पातळीवर मोठी संधी दिलेली नाही. यासाठी सुरक्षित पर्याय म्हणून अशोक चव्हाण अशी सावध भूमिका घेत असल्याचे सांगितले जाते.

२) अशोक चव्हाणांना वारंवार डावलण्यात येत असल्याची खदखद त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असल्याचं म्हटलं जातं.

२०१५ मध्ये अशोक चव्हाणांना महाराष्ट्र काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं होतं, मात्र २०१९ मध्ये त्यांना या पदावरून काढून हे पद बाळासाहेब थोरात यांना देण्यात आलं. सध्या हे प्रदेशाध्यक्ष पद नाना पटोले यांच्याकडे आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील महत्वाचं महसूल खातं अशोक चव्हाणांऐवजी बाळासाहेब थोरात यांना देण्यात आलं होतं. 

सध्याच्या घडीला तर अशोक चव्हाण यांच्याकडे पक्षाने कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांचा प्रभाव असलेल्या नांदेड आणि आसपासच्या परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये खदखद असल्याचं स्थानिक विश्लेषकांचं म्हणणं आहे. अशीच नाराजगी खुद्द अशोक चव्हाणांच्या मनात देखील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

३) बाकी काँग्रेस नेत्यांप्रमाणे अशोक चव्हाण देखील भाजपवर थेट टिका करत नसल्याचं सांगितलं जातं.

२०१४ मध्ये केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा विरोध तितक्या ताकदीने केलेला नाही. तसेच  काँग्रेस नेत्यांमध्ये कोणत्याही बाबतीत एकमत नसल्याचं दिसून येतं. फडणवीस मुख्यमंत्री असतांना काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपच्या बाबतीत नरमाईची भूमिका घेतली होती.

पटोले व्यतिरिक्त काँग्रेसचे मोठे नेते तितक्या ताकदीने सरकारचा विरोध करतांना दिसत नाहीत. ज्याप्रमाणे महाविकास आघाडीतील संजय राऊत सरकारचा विरोध करतात. अशोक चव्हाणांनी देखील काँग्रेसच्या इतर नेत्यांप्रमाणे बचावाची भूमिका घेतली असल्याचे सांगितले जाते.

याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी बोल भिडूने स्थानिक पत्रकार आणि गोदातीर समाचारचे संपादक केशव घोणसे यांच्याशी संपर्क साधला. 

ते म्हणाले की, 

“अशोक चव्हाण हे साधे नेते नाहीत तर त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांच्यासारखेच प्रचंड जनाधार असलेले नेते आहेत. संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत जे अशोक चव्हाण यांचा शब्द प्रमाण मानतात. परंतु २०१० मध्ये जेव्हा अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावरून काढण्यात आलं आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हापासून अशोक चव्हाणांचं पक्षात खच्चीकरणाचं केलं जात असल्याचं दिसतं. यामुळेच अशोक चव्हाण यांच्या स्थानिक समर्थकांच्या मनात खदखद असल्याची दिसून येते.”

ते पुढे सांगतात की, 

“जर २०१० नंतरचा घटनाक्रम पहिला तर अशोक चव्हाण यांना नांदेड आणि स्थानिक भागात प्रचंड जनाधार असताना देखील त्यांना पक्षात तोलामोलाच्या संधी मिळत नसल्याचं दिसतं. त्यांच्याकडून काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद काढून टाकण्यात आलं, तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये महत्वपूर्ण महसूल खातं अशोक चव्हाण यांना डावलून बाळासाहेब थोरात यांना देण्यात आलं.

त्यामुळे काँग्रेसमधील इतर नेत्यांना संधी देऊन अशोक चव्हाण यांना डावललं जात आहे असं दिसून येतं. त्यामुळे कदाचित अशोक चव्हाण सुरक्षित पर्याय म्हणून भाजपाकडे बघत असल्याचं चित्र दिसत आहे.” असं घोणसे यांनी सांगितलं.

मात्र या जर तरच्या प्रकरणात अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्यासमोर  दोन पर्याय असतील असं सांगितलं जातं. 

यात पहिला पर्याय आहे पक्षात बंडखोरी करून स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा.

अशोक चव्हाण हे काही आज आणि कालचे काँग्रेसचे नेते नाहीत तर त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांच्यापासून त्यांना काँग्रेसचा वारसा मिळाला आहे. अशोक चव्हाण यांचा नांदेडमध्ये प्रभाव तर आहेच परंतु महाराष्ट्र काँग्रेसमध्ये १०-१२ आमदारांच्या गटाचं अशोक चव्हाण यांना समर्थन असल्याचं सांगितलं जातं. या आधारावर ते थेट भाजपमध्ये न जाता स्वतःचा पक्ष स्थापन करतील असं सांगितलं जातं. 

परंतु या शक्यतेबद्दल बोलतांना केशव घोणसे सांगतात की, 

“ही शक्यता तितकीशी प्रबळ वाटत नाही, कारण राज्यातील जनतेसमोर आधीच अनेक पक्षांचे पर्याय आहेत. कारण अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाला काही मर्यादा आहेत आणि जर लोकं विचारधारेच्या आधारावर मतदान करतील तर काँग्रेस राष्ट्रवादीचे पर्याय आहेतच.

यापूर्वी शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस अर्थात मस्काची स्थापना केली होती. त्यांचा प्रभाव फार मोठा होता तरी देखील त्यांना पक्षाचा विस्तार करता आला नव्हता, त्यामुळे अशीच मर्यादा अशोक चव्हाणांच्या बाबतीत देखील लागू होईल,” असं घोणसे सांगतात.

त्यानंतर दुसरा आणि सर्वात महत्वाचा पर्याय म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करणे.

अशोक चव्हाणांसमोर पक्ष स्थापन करण्याच्या काही मर्यादा आहेत त्यामुळे अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडल्यास  थेट भाजपमध्ये प्रवेश करतील असं सांगितलं जातं. किंवा मग स्वतःचा पक्ष स्थापन करून त्याचं भाजपमध्ये विलीनीकरण करण्याचा देखील पर्याय अशोक चव्हाण यांच्यासमोर आहे.

यापूर्वी काँग्रेसचा वारसा असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. २०१९ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला असतांना देखील राधाकृष्ण विखे पाटील हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये महसूल खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण देखील भाजपमध्ये प्रवेश करत असतील तर मराठवाड्यात त्यांचा असलेला वट बघता भाजपमध्ये चांगली संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

परंतु या सर्व निव्वळ चर्चाच आहेत, कदाचित काँग्रेसमध्ये डावललं जात असल्यामुळे पक्षावर दबाव ठेवण्यासाठी देखील अशोक चव्हाण भाजपच्या पर्यायाला समोर आणत असतील असंही सांगितलं जातं. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी महामोर्चात सहभागी न होण्यासाठी दिलेलं कारण अनेकांना न पटणारं असलं तरी अशोक चव्हाण यावर आणखी काय प्रतिक्रिया देतात ते महत्वाचं असेल.

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.