अशोक कामटे का डंडा, सोलापूर ठंडा..

२६/ ११ च्या मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात आपल्या देशाची अपरिमित हानी झाली. मात्र सगळ्यात मोठ नुकसान अनेक शूर अधिकारी, सैनिक ,पोलीस यांच्या हौतात्म्यान झालं. याच हल्ल्यात शहीद झालेले शूर पोलीस अधिकारी म्हणजे अशोक कामटे.

टू द लास्ट बुलेट या पुस्तकात अशोक कामटेच्या पत्नी विनिता कामटे यांनी त्यांच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. या पैकीच एक आठवण.

अशोक कामटेंची पोस्टिंग तेव्हा सोलापुरात होती. सोलापूरचे ते पोलीस आयुक्त होते. सोलापूरला कर्नाटक आणि आंध्रच्या सीमा जवळ. यामुळे या भागात विविध भाषिक लोक उद्योगधंद्यासाठी येऊन राहिलेले. सोलापूरचा कापड उद्योग तर पूर्ण देशभर फेमस. अशा या बहुसांस्कृतिक गावात संघटीत गुन्हेगारीचं प्रमाण सुद्धा अधिक होत.

संवेदनशील सोलापुरात अशोक कामटेच आगमन झालं आणि पोलिसांचा एक दरारा हळूहळू गुन्हेगारांच्यात निर्माण होऊ लागला. त्यांच व्यक्तिमत्वच तसं होत. त्यांच्या घराण्यात लष्करी आणि पोलीस सेवेची परंपरा होती. ते स्वतः पॉवरलिफ्टिंग, शुटींग या खेळाचे चम्पियन होते. गोरा गोमटा तुळतुळीत गोल चेहरा, एखाद्या पहिलवानासारखी छाती, भारदस्त उंची हे पाहून छोटे मोठे गुन्हेगार चळाचळा कापायचे.

मोठी दंगल असो वा एखाद्या मुलीला छेडछाडीची किरकोळ घटना कामटेसाहेब हातात लाठी घेऊन स्वतः स्थिती काबूत आणायला फिल्ड वर उतरायचे. ऑफिसमध्ये बसून फक्त ऑर्डर देणाऱ्या अधिकाऱ्यापैकी ते नव्हते. यामुळे संपूर्ण पोलीस खात्यामध्ये त्यांच्याबद्दल आपुलकीची भावना झाली होती.

१६ ऑगस्ट २००७ची घटना, सोलापुरात मध्यरात्री अचानक जोरजोरात फटाक्यांची आतिषबाजी सुरु झाली.

त्याकाळात सुद्धा रात्री १० च्या नंतर फटाके उडवण्यास कोर्टाने कायद्याने बंदी आणली होती. काय प्रकार आहे याची चौकशी करायला गस्तीवरचे पोलीस गेले. तेव्हा त्यांना कळाले की कर्नाटकच्या ईंडी गावचे अपक्ष आमदार रविकांत पाटील याच्या पन्नासाव्या वाढदिवसानिम्मित्त त्यांच्या बंगल्यावर ही आतिषबाजी सुरु आहे. त्यांचे हजारो समर्थक वाढदिवस साजरा करायला जमले होते. रंगारंग कार्यक्रम सुरु होता.

रविकांत पाटील हे आमदार जरी कर्नाटकतले असले तरी त्यांचा अख्खा गोतावळा सोलापुरात होता. आमदार झाल्यावरही ते सोलापुरातच राहायचे. आता स्वतः आमदारांच्या वाढदिवसाबद्दल फटाके उडवले जात असतील तर कोण काय बोलणार? पण तरीही गस्तीवरच्या पोलिसांनी धाडस दाखवलं आणि हा प्रकार थांबवायचा प्रयत्न केला. आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यामध्ये आणि पोलिसांच्यात बाचाबाची झाली.

हा प्रकार कंट्रोलरूमवरून अशोक कामटेंना कळाला.

खाकी वर्दीचा होत असलेला अपमान कळताच त्यांनी स्वतः पोलीसजीप काढली आणि रविकांत पाटलांच्या बंगल्यावर येऊन धडकले. खुर्चीची मग्रुरी आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झळकत होती. रागाने लाल झालेले अशोक कामटे सरळ रविकांत पाटलांना अटक करण्यासाठी त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले. आमदारांसाठी हे नवीन होते. लोकप्रतिनिधी हा जनतेचा राजा असतो या अविर्भावात ते असावेत. कोण कुठला अधिकारी येऊन आपल्याला शहाणपणा सांगतोय अस वाटून त्यांनी अशोक कामटेशी वाद घालण्यास सुरवात केली.

वाद विकोपास गेला. अशोक कामटेंसोबत झटापट झाली. या गोंधळात कामटेंच्या छातीचा बॅज तुटून खाली पडला. रविकांत पाटलांची ही मजल अशोक कामटेंच्या मस्तकात गेली. क्षणार्धात त्यांनी आमदार साहेबाना कॉलर धरून उचलले आणि फरफटत आणून आपल्या जीप मध्ये आणून टाकले. पोलिसांनी घेतलेला आक्रमक पवित्रा पाहून त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली. त्यातल्या अनेकांना उचलून त्यांना ठोकत पोलीस कोठडी मध्ये टाकण्यात आले.

ही केस जेव्हा न्यायलयासमोर उभी राहिली तेव्हा रविकांत पाटीलना स्ट्रेचर वरून कोर्टात आणावे लागले. कायद्याच्यापुढे सगळे समान आहेत हा आदर्श अशोक कामटेनी घालून दिला होता. सोलापूरचे गुन्हेगारी विश्व हादरून गेले.

कोणतीही डॉनगिरी आता गावात चालणार नाही हे सिद्ध झाले होते. “अशोक कामटे का डंडा – सोलापूर ठंडा” असे संदेश सगळी कडे झळकू लागले. धडाकेबाज कामामुळे अशोक कामटे सोलापूरचेच नव्हे तर अख्या महाराष्ट्राचे हिरो बनले होते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.