मुंबईच्या चाळीत स्वप्न बघत मोठ्या झालेल्या माणसाने जगातील सर्वात उंच हॉटेल बांधलं

मुंबईमध्ये वरळी मधली एक सर्वसामान्य चाळ. विचार करायला देखील वेळ नसणाऱ्या मिडलक्लास चाकरमानी लोकांच जग. गल्लीतली एखादी क्रिकेट मॅच, दिवाळी गणपती एकत्र साजरे करणे, दही हंडीचा जल्लोष अशा छोट्या छोट्या गोष्टीत भरमसाठ आनंद गोळा करायचा इतपत त्यांचं भावविश्व.

यातच वाढलेला अशोक कोरगावकर.

१९७० सालची मुंबई. वेगाने आपल रूपड बदलत होती. वरळीमध्ये देखील चाळी जाऊन  गगनचुंबी बिल्डींग उभ्या रहात होत्या. अशोकच्या खिडकी बाहेर बघितल की चोहोबाजूला उंच बांधकाम चाललेलं दिसायचं. त्याला चित्रकलेची आवड होती. त्याच्या चित्रात देखील या उंच इमारती झळकायच्या.

एक दिवस आपण जगातली सगळ्यात उंच बिल्डींग बांधायची हे स्वप्न त्याला दिसायचं !

अशातच गल्लीतला कोणीतरी आर्किटेक्ट झाला आणि तो अमेरिकेला नोकरीला जातोय हे कळाल. तो पर्यंत हे असल काही प्रोफेशन असत याची माहिती सुद्धा नव्हती. हुशार मुलांनी सायन्स, बाकीचे कॉमर्स किंवा आर्ट्स एवढच ज्ञान अख्ख्या भारताला होत.

अशोक कोरगावकरनी त्या मुलाची आर्किटेक्ट ओळख काढली. आपल्या कडे फेमस आहे तसा करीयर गायडन्स घेतला आणि ठरवलं,

“मी पण आर्किटेक्ट होणार !”

बिल्डींग बांधायला आवडते म्हणून आर्किटेक्चर कडे जाणाऱ्या मध्यमवर्गीयांच त्याकाळात अत्यल्प प्रमाण होत. कॉमर्स करून बँकेत सुखाची नोकरी करायचं सोडून हा कसला उपद्व्याप म्हणून घरच्यांनी अशोकला दाबायचा प्रयत्न केला. पण गडी ऐकला नाही.

घरची परिस्थिती नव्हती. पण कसबस पैसे जुळवून आर्किटेक्चरच्या कॉलेजला अॅडमिशन घेतलं. आयुष्याच एक पान बदललं जात होतं.

आर्किटेक्ट बनण्याचे पाच वर्षे म्हणजे त्यांच्या साठी महत्वाचा काळ होता. स्वप्न नुसता बघायची नसतात तर ते साकारण्यासाठीचे धडे मेहनतीने गिरवायचे असतात. महत्वाकांक्षेची एकएक वीट रचली जात होती.

याच काळात त्यांना आयुष्याची साथीदार आरती  भेटली. कॉलेजमधलं प्रेम लग्नापर्यंत पोहचलं.

दोघेही आर्किटेक्ट पण भारतात त्याकाळी म्हणाव्या तशा संधी नव्हत्या. अशोक कोरगावकर यांचा एक भाऊ अखाती देशात नोकरीला होता. त्याने या दोघांना तिकडे बोलावून घेतलं. कोरगावकर दाम्पत्याच विमान भारताच आभाळ ओलांडून बहारीनला पोहचलं.

साधारण ऐंशीच्या दशकातला काळ.

आखाती देशांना तेलाच्या रुपात सोन्याची खाण सापडली होती. पाण्यासारखा पैसा वाहत होता. एकापाठोपाठ एक नवीन प्रोजेक्ट उभे राहत होते. या अरब देशांची स्वप्ननगरी होती दुबई.

दुबईच रुपांतर तर मायानगरीमध्ये होत होतं. अशोक आणि आरती कोरगावकर सुद्धा दुबईला आले. इथे नामांकित कंपनीत नोकरी मिळाली. हातात पैसा आला. मोठ पद मिळाल. संसाराची गाडी रुळावर आली. अगदी बुलेट ट्रेनच्या वेगाने धावू लागली.

सगळी सुखे हात जोडून दाराशी उभी होती. पण अशोक कोरगावकर खुश नव्हते. त्यांचं स्वप्न अजून पूर्ण झालेलं नव्हत.

दहा वर्षांची नोकरी झाल्यावर मात्र त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. सुखाची नोकरी सोडून स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा !

त्यांच्या पत्नीचाही याला पाठींबा होता. १९९२ साली दोघांनी मिळून स्वत:ची आर्चग्रुप कन्सल्टन्ट ही कंपनी स्थापन केली. नोकरीत केलेल्या चांगल्या प्रोजेक्टमुळे कोरगावकर यांना नाव दुबईच्या कन्सट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख मिळालेली होती. छोट्या मोठ्या इमारतींचे डिझाईन करण्याचे काम त्याना मिळू लागले.

अवघ्या काही वर्षातच त्यांना दुबईच्या सुप्रसिद्ध एमिरात एअरलाइन्सने अल्‌ अकाह बीच रिसॉर्टच्या आराखड्याचे काम दिले. तोपर्यंत अशोक कोरगावकर यांनी हॉटेलचा आराखडा कधीच तयार केलेला नव्हता. पण प्रत्येक गोष्टीची सुरवात शिकण्यातून होत असते या नियमाला धरून कोरगावकर यांनी हे आव्हान स्विकारल. फक्त स्विकारलच नाही तर विक्रमी वेळेत ते पूर्ण देखील करून दाखवल.

अल अकाह बीच रिसोर्ट आर्चग्रुप कन्सल्टन्ट ग्रुपच्या यशाचं पहिलं पाउल होतं. तिथून त्यांनी मागे वळून बघण्याची वेळच आली नाही.

दुबईच्या शेखांची गुंतवणूक असलेल्या एमिरात एयरलाईन्सने एका भारतीय फर्मवर विश्वास टाकला हे बघून त्यांना आणखी मोठी मोठी कामे मिळू लागली. कोरगावकर यांच्या यशाची कमान चढती राहिली. अगदी शिस्तबद्धरित्या बनलेले आकर्षक डिझाईन वेळेत देणे ही कोरगावकर यांची खासियत दुबईमध्ये ओळख बनून गेली.

पुढे २००७ मध्ये याच एमिरात एअरलाइन्सने त्यांना दुबईतील जेडब्ल्यू मॅरिएटच्या हॉटेलचा आराखडा तयार करण्याचे काम दिले.

दोन जुळ्या टॉवरचा समावेश असलेले हे आराखड्याचे गुंतागुंतीच काम अशोक-आरती यांच्यासाठी आव्हानात्मक होते. अनेक मोठेमोठे अनुभवी आर्किटेक्ट पण या कामासाठी  उत्सुक नव्हते. पण अशोक कोरगावकर यांनी लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार होती. त्यांनी हे काम घेतलं.

अवघ्या वर्षभरात ते पूर्ण देखील करून दाखवल.

३५५ मीटर उंचीचा दुबईतील जेडब्ल्यू मॅरिएट टॉवर तेव्हा जगातील सर्वात उंच हॉटेल म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाला. त्याचा विस्तृत आराखडा व आखणी केल्याबद्दल अशोक कोरगावकर यांच्या नावे या विक्रमाची नोंद झाली.

Ashok Korgaonkara

एकेकाळी चाळीत राहणाऱ्या या मराठी माणसाने फक्त स्वतःचच स्वप्न पूर्ण केलं अस नाही तर करोडो भारतीयांची कॉलर अभिमानाने ताठ केली .

हे ही वाच भिडू.

 

2 Comments
  1. Rajiv Dattatray Kalyankar says

    Marathi paul padhte pudhe

  2. Col JRF D'Souza says

    Very Encouraging profile of a middle-class family member to managed to reach Top of The World of Architects that too in a Competitive Giants of renowned fame. My SALUTES to this young man.

Leave A Reply

Your email address will not be published.