अशोक कुमार यांची नजर पडली आणि स्टुडिओ बाहेर बसलेला एक मुलगा सुपरस्टार देवानंद झाला

इंडस्ट्रीत गॉडफादर असल्याशिवाय आपण इथे टिकू शकत नाही. किंवा आपल्याला सहजासहजी कामं मिळू शकतात असा एक समज आहे. पण भिडूंनो, मुळात तुमच्याकडे काहीतरी करून दाखवण्याची क्षमता, मेहनत करण्याची तयारी असायला हवी.

नाहीतर आमिर खान सारखा मोठा गॉडफादर असूनही त्याचा भाचा इम्रान खानला कामं मिळेनाशी झालं. आणि आत्ता इम्रान बॉलीवुडपासून दूर अज्ञातवासात असल्यासारखा वावरतोय.

एकूणच मुद्दा हा आहे, तुम्हाला मार्ग दाखवणारे अनेक व्यक्ती असतात पण तो प्रवास तुम्ही यशस्वीरीत्या कसा पार करता, हे सर्वस्वी तुमच्यावर आहे.

बॉलिवुड सुपरस्टार अशोक कुमार अर्थात दादामुनी हे अशाच एका कलाकाराचे गॉडफादर झाले. परंतु नंतर त्या कलाकाराने सुद्धा मिळालेल्या संधीचा योग्य वापर करून दादामुनींनी दाखवलेल्या मार्गावर स्वतःचा प्रवास यशस्वीरित्या सुरू ठेवला..

हा कलाकार होता देवानंद.

हा किस्सा १९४८ सालचा..

तेव्हा दादामुनी म्हणजेच अशोक कुमार हे हिंदी सिनेसृष्टीतील सिनेमांमधील एक मोठं नाव होतं. त्याकाळच्या जवळपास अनेक सिनेमांमध्ये दादामुनींच्या भूमिका गाजत होत्या. याचदरम्यान अशोक कुमार ‘जिद्दी’ या सिनेमाचं शुटिंग करत होते.

शूटिंगच्या मुहूर्ताचा नारळ नुकताच फुटला होता. सिनेमाच्या शूटिंगचा पहिलाच दिवस. शूटिंगला सुरुवात झाली. एक सीन झाल्यावर दुसऱ्या सिनच्या तयारीसाठी वेळ लागणार होता. यामुळे पाय मोकळे करायला दादामुनी जरा स्टुडिओ बाहेर आले.

बाहेर येताच त्यांनी बघितलं की एक तरुण, देखणा, चुणचुणीत मुलगा स्टुडिओबाहेर बसला आहे.

अशोक कुमार त्याच्या जवळ गेले. त्याची विचारपूस करताच अशोक कुमार यांनी त्याला

‘नाव काय तुझं ? , कोणाकडे काम आहे ?’

असे प्रश्न विचारले. तो मुलगा म्हणाला,

“सर, माझं नाव देव आनंद आहे. मी एक सिनेमा केला आहे. पण दुदैवाने तो चालला नाही. सध्या माझ्याकडे काहीच काम नाहीय. तुम्ही मला काम दिलंत तर तुमचे खूप उपकार होतील.”

दादामुनींना त्याच्या बोलण्यात एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास जाणवला.

त्यांना देव आनंदचं देखणं, रुबाबदार व्यक्तिमत्त्व आवडलं होतं. दादामुनी देवानंदला म्हणाले,

“तू चल आत, माझ्यासोबत ये.”

दादामुनी देवानंदला स्टुडिओच्या आत घेऊन आले.

आत असेलल्या सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह उमटलं. दादामुनींनी सिनेमाचे दिग्दर्शक शाहीद लतिफ यांना देवानंदची ओळख करून दिली.

“जी भूमिका या सिनेमात मी करणार होतो ती भूमिका तुम्ही या मुलाला द्या.”

दादामुनी दिग्दर्शकाला म्हणाले. हे ऐकताच दिग्दर्शक शाहीद लतिफ पार उडालेच. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी दादामुनी असं काहीतरी सांगतील याची त्यांनी कल्पना केली नव्हती.

दिग्दर्शक आणि सिनेमाच्या निर्मात्यांनी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला.

यांच्याकडून नकार येणार हे दादामुनी यांना अपेक्षित होतं. परंतु दादामुनींना देव आनंद वर संपूर्ण विश्वास जडला होता. हा मुलगा नक्कीच चांगलं काम करेल, याची त्यांना खात्री होती.

दादामुनींनी हरतऱ्हेने प्रयत्न करून दिग्दर्शक आणि निर्मात्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर विनंती करून दादामुनी म्हणाले,

“हे बघा, मी तुमच्या भावना समजू शकतो. पण या मुलाला एक संधी देऊन तर बघा. तसंही आज शूटिंगचा पहिला दिवस आहे. इतकं नुकसान होणार नाही. आणि जर या मुलाला काम करणं जमलं नाही तर मी आहेच की. तुम्ही मला घेऊन पुन्हा शूटिंगला सुरुवात करा. पण कृपया या मुलाला एक संधी द्या.”

अशोक कुमार तेव्हाचे मोठे स्टार होते. त्यामुळे त्यांच्या या म्हणण्याला निर्मात्यांनी दुजोरा दिला.

अखेर ‘जिद्दी’ सिनेमात अशोक कुमार जी भूमिका करणार होते, ती देवानंदला देण्यात आली.

शूटिंगला नव्याने सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी देवानंदने एका शॉट साठी ८ टेक दिले. इतक्या रिटेकमुळे शुटिंग लांबत चाललं होतं. त्यामुळे दिग्दर्शकांनी काहीशा त्रासिक स्वरात अशोक कुमार यांना ही गोष्ट सांगितली.

“या मुलाच्या आतमध्ये कशाची तरी कमतरता जाणवत आहे. एका शॉटसाठी हा इतके रिटेक देणार असेल तर चालणार नाही. तुम्ही पुन्हा सिनेमात काम करण्यासाठी तयार व्हा.”

असं दिग्दर्शक अशोक कुमार यांना म्हणाले.

असं सर्व झालं तरीही दादामुनींना देवानंदच्या क्षमतेवर विश्वास होता. ते देवानंदजवळ गेले आणि विचारलं,

“काय होतंय नेमकं? कसली अडचण होतेय? स्वतःचा आत्मविश्वास कशाला खाली पाडत आहेस.”

देव आनंद देत असलेल्या उत्तरांमधून अशोक कुमार यांना कळालं की, दिग्दर्शक शाहीद लतिफ हे देव आनंदला सीन नीट समजावून सांगत नव्हते.

देव आनंदकडे फक्त एकाच कामाचा अनुभव होता. त्यामुळे कॅमेरा समोर सीन नीट न समजल्यामुळे मनात असलेल्या गोंधळामुळे तो अभिनय करताना गडबडायचा.

दादामुनींनी कोणालाही दोष न देता कॅमेरा रोल व्हायच्या आधी देव आनंदला प्रत्येक सीन विस्तारपूर्वक समजवायला सुरुवात केली. यामुळे कॅमेरा समोर अभिनय करण्यासाठी देव आनंद तयार झाला. पुढचे सीन एका टेकमध्ये शूट होऊ लागले.

आणि अशाप्रकारे ‘जिद्दी’ सिनेमाच्या माध्यमातून देव आनंदला हिरो म्हणून भरपूर लोकप्रियता मिळाली. हा सिनेमा सुद्धा हिट झाला.

देव आनंदने अशोक कुमार यांनी त्याच्यावर दाखवलेला विश्वास खरा ठरवला.

‘जिद्दी’ नंतर त्याच्या करियरची गाडी सुद्धा रुळावर आली. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये देव आनंदने अभिनय करून भारतीय सिनेसृष्टीत स्वतःची ओळख प्रस्थापित केली.

हल्ली कोणी कलाकार स्वतःची भूमिका सोडाच, पण खुल्या दिलाने एकमेकांच्या कामाचं कौतुक सुद्धा करत नाहीत. त्यावेळी अशोक कुमार सारख्या मोठ्या नटाने कोणताही स्वार्थी भाव मनात न ठेवता स्वतःची भूमिका खुल्या दिलानं देव आनंदला दिली‌‌.  त्यानेसुद्धा मिळालेल्या संधीचं सोनं केलं.

“दादामुनींनी त्यावेळी हात दिला नसता तर माझ्या करियरची नौका अजूनही हेलकावे खात राहिली असती.”

असं बोलून प्रत्येक मुलाखतीत देव आनंद अशोक कुमार यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायचा.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.