देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी एका स्वातंत्र्यसैनिकाने अशोक लिलँडची निर्मिती केली

गोष्ट आहे स्वातंत्र्यप्राप्ती नंतरची. गेली दीडशे वर्ष भारतावर ब्रिटिशांनी राज्य केलं होतं. या गुलामगिरीच्या काळात भारतात कोणतेही उद्योगधंदे उभे राहू शकले नाहीत.

इंग्लंडमधील आयातीवरच भारतीयांनी अवलंबून राहावे हीच ब्रिटिशांची नीती होती. भारतातले कारखाने बंद पाडले, इथला कच्चा माल स्वस्तात घेतला आणि युरोपात तयार होणारा पक्का माल महागड्या किंमतीत विकला.

या सगळ्या मुळे भारत हजारो वर्षांनी मागे पडला.

स्वातंत्र्यलढ्यातही लोकमान्य टिळकांच्या पासून स्वदेशी वस्तुंचा आग्रह सुरू होता पण कित्येक गोष्टींची निर्मिती भारतात होऊ शकत नसल्यामूळे अनेकांना मनात असूनही स्वदेशीचे सूत्र पाळता येत नव्हते.

१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्य रात्री भारत देश स्वतंत्र झाला. गुलामगिरीच्या साखळदंडातून आपली मुक्तता झाली. सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू अशा दूरदृष्टीच्या नेत्यांकडे कारभार आला. महात्मा गांधींच्या स्वप्नातला आत्मनिर्भर भारत बनवणे त्यांचं स्वप्न होत.

त्यानुसार अगदी सुईपासून ते अंतराळ यानापर्यंत प्रत्येक गोष्टीची निर्मिती भारतातच झाली पाहिजे या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अनेक उद्योगांची पायाभरणी केली. हे उद्योग सुरू करताना जास्तीतजास्त स्वातंत्र्यसैनिकांना संधी देण्याचं धोरण त्यांनी राबवल होत.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी कित्येक जणांनी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र सोडलं होत. शिक्षण, नोकरी, उद्योग या कडे दुर्लक्ष करून देशसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले होते.

यातच होते पंजाबचे रघुनंदन सरण.

गांधीजींच्या अनेक सत्याग्रह आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. यासाठी त्यांना जेलही झाली होती. नेहरू पटेलांचे ते विश्वासु सहकारी होते. त्यांची प्रामाणिकता व सचोटी या नेत्यांनी पाहिली होती.

भारतात वाहन उद्योग निर्मितीचे प्रयत्न सुरू होते. नेहरूंनी रघुनन्दन सरण यांना बोलावून घेतलं आणि मद्रासला मोटार कारखाना उभा करण्याची जबाबदारी घ्यायला सांगितली.

नेहरूंचा आदेश शिरसंवाद्य मानून रघुनंदन सरण मद्रासला शिफ्ट झाले.

त्यांनी तिथे आपल्या एकुलत्या एक मुलाच्या नावावरून अशोक मोटर्स ही कंपनी सुरू केली.

साल होत १९४८.

सुरवातीला ऑस्टिन या40 या प्रवासी गाड्यांच्या असेंम्बली आणि वितरणाच काम त्यांनी केलं. सोबतच स्वतःचे ट्रक बनवण्याचे संशोधनाचे काम सुरू होते.

इतर गाड्या परदेशातून मागवाव्या लागल्या तरी एखाद्यावेळेस चालू शकते मात्र ट्रक,बस या अत्यावश्यक सेवा आहेत, गरिबांच रोजच जीवन याच्याशी जोडलेल असते.

या वाहनांच्या निर्मितीत आत्मनिर्भर असावेच लागेल हा विचार या कारखान्याच्या उभारणी मागे होता.

त्याकाळात भारतीय मार्केट काबीज करण्यासाठी ब्रिटिश लिलँड कंपनी भारतात येऊ पाहत होती. पण परदेशी कंपन्याना भारतात उद्योग सुरू करण्यास अनेक बंधने घातली गेली होती.

लिलँड कंपनीने अशोक मोटर्सशी संपर्क केला. ते देखील स्वतःचा ट्रक निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते.

दोन्ही कंपन्यांनी कोलॅबरेशन केलं आणि सुप्रसिद्ध अशोक लिलँडची निर्मिती झाली.

ट्रक, बसेस अशा अवजड वाहनांची निर्मिती भारतात होऊ लागली. याच काळात टाटाने मर्सिडीज कंपनीशी करार करून ट्रक बनवला होता. या दोन्ही कंपन्यानी भारताला स्वयंपूर्ण बनवलं.

पुढे इंग्लंडमधल्या सुप्रसिद्ध भारतीय उद्योगसमूह हिंदुजा यांच्या कडे या कंपनीची मालकी गेली.

आज ही हजारो कोटींची कंपनी बनली आहे. एकेकाळी आपल्याला परदेशातून गाड्या आयात कराव्या लागत होत्या आता आपण बाहेरच्या देशांना आपले ट्रक व इतर वाहने निर्यात करतो.

अर्थव्यवस्था खुली झाल्यावर इतर वाहनांना स्पर्धा निर्माण झाली

पण अशोक लिलँडच भारताच्या कानाकोपर्यातील रस्त्यावर एसटी बस पासून ते टँकर, ट्रकच्या रुपातल साम्राज्य अबाधित राहील.

आजही मिलिटरी असो वा इतर अत्यावश्यक सेवा, अशोक लिलँडशिवाय पर्याय नाहीत. मात्र इतके असूनही एका स्वातंत्र्यसैनिकाने सुरू केलेल्या या कंपनीने सच्च्या इमानदारीचा वारसा टिकवून ठेवलेला आहे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.