जुनी चाल विसरली पण ऑन द स्पॉट आभाळमाया सारखा अजरामर सिरीयल ट्रॅक बनवला…

मराठीमध्ये सिरीयल कितीही दिवस चालो किंवा एक दोन महिन्यात ती डब्यात जाओ पण त्याची टायटल ट्रॅक एकदम बाप असतात. मालिका पाहणारेच नाही तर न पाहणारे लोकसुद्धा हे सिरियलची शीर्षक गीतं लक्ष देऊन ऐकतात. अशाच सिरीयल पैकी एक सिरीयल होती आभाळमाया. आभाळमाया या सिरीयलचं शीर्षक गीत तयार केलं होतं संगीतकार अशोक पत्की यांनी. या गाण्याच्या मेकिंगचा हा किस्सा.

मंगेश कुलकर्णी यांनी आभाळमाया हे गीत लिहिलं आणि अशोक पत्कीना सांगितलं कि गाण्याची रेकॉर्डिंग दुपारी दोन वाजता असेल आणि या गाण्याच्या गायिका देवकी पंडित यांना बोलावून घ्या. हे गाणं ज्यावेळी मंगेश कुलकर्णींनी लिहून अशोक पत्कीना दिला तेव्हा पत्की म्हणाले हे असे कसे शब्द लिहिलेत यावर गाणं कस होईल. 

या गाण्याचे शब्द होते जडतो तो जीव, लागते ती आस, बुडतो तो सूर्य, उरे तो आभास अशा प्रकारचं ते गीतलेखन होतं. आदल्या दिवशी पत्कीना हे गाणं मिळालं तेव्हा त्यांनी अगोदर एक चाल लावली. स्टुडिओवरून घरी जायच्या अगोदर पहिली चाल पटली नाही म्हणून त्यांनी अजून एक चाल लावली. घरी झोपायच्या अगोदरसुद्धा तिसरी चाल लावली. उद्या सकाळच्या तयारीनिशी ते झोपले.

पण झोपेतही याच गाण्याचे विचार डोक्यात सुरु होते तेव्हा अधिक पत्की मध्यरात्री ३ वाजता उठले आणि हॉलमध्ये हार्मोनियम घेऊन बसले आणि अजून एक चाल त्यांनी लावली. स्टुडिओला जायच्या अगोदर परत एक चाल लावली. स्टुडिओला पोहचल्यावर अशोक पत्कींनी त्यांचं अगोदरच रेकॉर्डिंग आटोपलं आणि बरोबर दोन वाजता देवकी पंडित आल्या. 

आता ऐन रेकॉर्डिंगची वेळ आलेली पण अशोक पत्कींना गाण्याला लावलेली चालही आठवेना आणि आधी कुठल्या चाली लावल्या होत्या त्याही आठवेना. त्यांना अजूनही हवी तशी चाल मिळाली नव्हती. अचानक रेकॉर्डिंगला सुरवात झाली आणि ऑन द स्पॉट अशोक पत्कींनी गाण्याला चाल लावली. हे गाणं रेकॉर्डिंग झाल्यावर सगळ्यांना छान वाटलं होतं.

प्रोड्युसरला गाण्याची चाल अजिबात आवडली नाही आणि ते अशोक पत्कींना काहीतरी बोलून मोकळे झाले आणि निघून गेले. सिरियलमधल्या विनय आपटेंनी अशोक पत्कीना गाण्याची सिच्युएशन सांगितली होती. त्यानुसार हे गाणं झालं. प्रोड्युसरने जाऊन विनय आपटेंना हा प्रकार सांगितला.

विनय आपटेंनी पुन्हा अशोक पत्कींना फोन केला आणि सांगितलं कि तुम्हाला कस वाटतंय गाणं, पत्की म्हणाले गाणं चांगलंच झालंय. पुढे हे गाणं अजरामर शीर्षक गीत म्हणून प्रसिद्ध झालं. या गाण्यामुळे सिरीयलला प्रचंड मार्केट आलं. या गाण्याच्या निर्मिती प्रक्रियेतून त्यांची गाण्यावरची निष्ठा दिसून येते.

अशोक पत्कींनी भारताला दिलेलं अजरामर गीत म्हणजे मिले सुर मेरा तुम्हारा. या गाण्याचे संगीतकार म्हणून अशोक पत्की होते. अजय अतुलला सुद्धा प्रारंभीचे काही दिवस अशोक पत्कींनीच ट्रेनींग दिलं होतं. आजवर आपण ९० च्या दशकातील अनेक हिंदी मराठी जाहिराती बघितल्या असतील त्यातल्या हिट झालेल्या जाहिरातींना म्युझिक अशोक पत्कीनी दिलेलं आहे. 

१५० पेक्षा जास्त सिनेमे, ४०० पेक्षा जास्त नाटकं आणि तब्बल ५ हजार जिंगल अशोक पत्कीनी कंपोज केले. मराठीमध्ये सुंदर सुंदर भावगीते अशोक पत्कींनी संगीतबद्ध केली. राधा हि बावरी सारखं गोड गाणं अशोक पत्कीनी लिहिलं होतं. मराठी भावगीतातले सर्वोत्कृष्ठ संगीतकार म्हणून अशोक पत्कींचं नाव घेतलं जातं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.