‘हम पांच’ पाहता यावी म्हणून लोकांनी आपल्या जेवणाच्या वेळा सुद्धा बदलल्या होत्या…

मराठी सिनेमाचा सुवर्ण काळ सोनेरी वाटला तो लक्षा, अशोक आणि महेश या त्रिकूटामुळे. मराठी सिनेसृष्टीला या त्रिकूटाने एक स्थान कमवून दिलं, नाव कमवून दिलं. आणि फक्त इंडस्ट्रीचं नाव मोठं केलं नाही तर स्वतःलाही भक्कम पद्धतीने सिद्ध केलं.

आता अशोक मामांचच बघा.. अशोक सराफ हे नाव महाराष्ट्रातल्या कुठल्या लहान पोराला जरी विचारलं तरी ठाऊक असतंय. सिनेमा म्हणू नका, नाटक म्हणू नका की टेलिविजन. अशोक मामांनी मनोरंजनाचं प्रत्येक माध्यम वाजवलं आणि गाजवलंही.

अशोक मामांच्या सिनेमातल्या कारकिर्दीविषयी आपण नेहमीच चर्चा करत असतो.

पण आज आपण अशोक मामांच्या टेलिविजनवरच्या कारकीर्दीविषयी बोलणार आहोत, निमित आहे ते म्हणजे, आजच्या कोण होणार करोडपतीच्या कर्मवीर या विशेष भागात अशोक मामांची विशेष उपस्थिती प्रेक्षकांना अनुभवता येणारे..

 

अशोक मामा टीव्हीवर येऊन आपल्याशी गप्पा मारणार आहेत, आपलं मनोगत मांडणार आहेत पण टेलिविजन या माध्यमाशी त्यांचा संबंध फार जुना आहे. आज त्यांचा टेलिविजनवरचा प्रवास पाहूया.

अशोक मामांची पांडू हवालदार नंतर जी गाडी सुसाट पाळायला लागली ती कधी थांबलीच नाही. त्यांचे सिनेमेच इतके हिट होत होते की नाटकांचे प्रयोगही चालू ठेवणं त्यांना शक्य होत नव्हतं. सिनेमा गाजत असताना आपण आता एखादी सिरियल करावी असं अशोक मामांना कधी वाटलं नव्हतं. अशोक मामा सांगतात, की तसं वाटायला, तेवढा पुरेसा वेळही त्याकाळी त्यांच्याकडे नसायचाच. पण योग असतात, गोष्टी घडतात. तसंच झालं. आणि अशोक मामा मोठ्या पडद्यावरून छोट्या पडद्याकडे वळले.

त्यावेळी टीव्ही सिरियल्सचं फार काही फॅड नव्हतं. बऱ्याच जणांना सिरियल म्हणजे काय हे सुद्धा माहीत नसायचं. आता आपण जशा रोज मालिका बघतो तशा रोज त्या लागायच्या नाहीत. तेव्हा सगळ्या मालिका ह्या आठवड्यातून एकदा दाखवल्या जायच्या. आणि प्रत्येक मालिका ही तेरा एपिसोड्सची असायची.

त्यावेळी अशोक मामांनी ‘नटखट नारद’ नावाची पहिली मालिका केली. त्यांच्या मालिका करण्याचं डोक्यात नव्हतं पण या मालिकेतला रोल त्यांना आवडला होता. या मालिकेत अशोक सराफ यांची भूमिका एका गुंडाची असणार होती. या मालिकेला नंतर पुढे चांगलं यश आलं.

लोकांमधली टीव्हीची क्रेझ सुद्धा हळू हळू वाढायला लागली होती. घर बसल्या मिळणारं मनोरंजन लोकांना भलतंच आवडायला लागलं होतं.

अशातच अशोक मामांनी दुसरी मालिका साइन केली ती होती छोटी बडी बाते. मालिका दिग्दर्शित केली होती भीमसेन यांनी. ही मालिका सुद्धा तेरा भागांची होती पण पुढे ती इतकी लोकप्रिय झाली की मालिकेला आणखीन सहा भागांचं एक्सटेंशन मिळालं. आणि हे असं एक्सटेंशन मिळणं म्हणजे त्याकाळी खूप मोठी गोष्ट होती. असं म्हणतात की ही मालिका प्रसारित व्हायची तेव्हा रस्ते सुन्न पडायचे.

‘नटखट नारद’ आणि छोटी बडी बाते या मालिकांच्या यशानंतर हेही माध्यम उत्तम आहे असं अशोक मामांना जाणवायला लागलं. आणि त्यांनी पुढची एक मराठी मालिका साइन केली ‘झोपी गेलेला जागा झाला’. या मालिकेच्या निमित्तानं दिलीप प्रभावळकर आणि अशोक सराफ हे दोन दिग्गज पहिल्यांदाच एकत्र असे प्रेक्षकांच्या भेटीला येणार होते. आणि त्यामुळे या मालिकेने आधीच हवा केलेली.

मराठी मालिकांमुळे अशोक मामा महाराष्ट्रातल्या घरात घरात पोहोचले, हिंदी मालिकांमुळे, देशभरात पोहोचले आणि ‘हम पांच’ या मालिकेमुळे अशोक मामा अख्ख्या जगात पोहोचले. अशोक मामांचं कुठल्या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने नाव झालं असेल तर ते ‘हम पांच’ या मालिकेमुळे.

हम पांच या मालिकेचा पहिला सीझन आला होता १९९५ साली. पहिल्या सीझनमध्ये सलग पाच वर्ष ही मालिका तूफान चालली. नंतर तब्बल दहा वर्षांनी म्हणजेच २००६ साली या मालिकेचा दूसरा सीझन आला, तेव्हा सुद्धा ती एक ते दीड वर्ष चालली.

पाच मुली, त्यांचा बाप, बापाची स्वर्गवासी झालेली फोटोतली बायको आणि प्रत्यक्षातली दुसरी बायको. अशा धमाल नातेसंबंधांत गुंतलेली ही सिरियल म्हणजे हिट विषय होती. एक पुरुष सात बायकांना तोंड देतोय ही कल्पना अशोक मामांना भारी आवडली होती.

त्यात त्या मालिकेत असणाऱ्या पोरी नवशिख्या होत्या, त्यांना कॉमेडी किंवा टाइमिंग या गोष्टींचं ज्ञान नव्हतं. तेव्हा दिग्दर्शकांच्या मदतीने अशोक सराफ यांनी त्या मुलींना अभिनयात ट्रेन केलं, छोट्यात छोटी गोष्ट शिकवली, सांगितली आणि त्यांच्यामध्ये खरोखरच एखादं कुटुंब असल्यासारखं बॉंडिंग तयार झालं. आणि मालिकेतल्या सगळ्या मुली अशोक मामांवर बापासारख्या प्रेम करायला लागल्या.

काही काळानंतर त्या मुलींमधल्या राधिका या पात्राची भूमिका विद्या बालन साकारत होती. विद्या बालन ही अभिनेत्री मुळातच हुशार आणि टॅलेंटेड असल्याने तिने ही भूमिका तर उत्तम साकारलेलीच पण नंतर ती बॉलीवुडमध्ये सुद्धा एक चांगली आणि मुरलेली अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली.

ती बॉलीवुडमध्ये फेमस झाल्यानंतर एकदा अशोक मामांची तिच्याशी गाठ पडलेली, तेव्हा तिने स्वतः येऊन अशोक मामांना ‘डॅड, कसे आहात’ असंच विचारलं होतं. हम पांच च्या सगळ्या पोरींसाठी अशोक मामा महणजे ‘डॅड’ झाले होते.

या मालिकेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही अख्खी मालिका सिंगल कॅमेरावर शूट झाली होती. या गोष्टीसाठी मालिकेवर टिका सुद्धा झाली. पण एका कॅमेऱ्यावर अशोक मामांचा संवाद शूट होतो आणि समोरची व्यक्ती दुसऱ्या कॅमेरात पाहून जेव्हा रिएक्शन देते तेव्हा ती कृत्रिम वाटू शकते आणि हे होणं टाळण्यासाठी ही मालिका सिंगल फ्रेमवर शूट केली गेली होती.

या मालिकेनं खरोखर टेलिविजन विश्वात यशाचा पाया रचला होता.

एक सिरियल सलग पाच वर्ष यशाच्या शिखरावर राहणं ही खरोखर मोठी गोष्ट होती. अशोक सराफ सांगतात, ‘हम पांच’ ही सिरियल पाहता यावी म्हणून लोकांनी आपल्या जेवणाच्या वेळा सुद्धा बदलल्या होत्या.

हम पांच नंतर अशोक सराफ यांच्याकडे मालिकांच्या ओफर्सची रांगच लागली होती. ते म्हणतात, की हम पांच नंतर त्यांच्याकडे जवळ जवळ शंभर एक मालिका आल्या असतील. पण त्यांनी या ओफर्स स्वीकारल्या नाहीत, कारण त्यांना कामातला तोच तोचपणा टाळायचा होता. पण हम पांच आणि एकंदरीतच त्यांच्या टेलिविजनमधल्या कामाने त्यांना एक वेगळी आणि मोठी ओळख मिळवून दिली हे नक्की

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.