रेल्वेमध्ये एका प्रवाशाने केलेला अपमान अशोक सराफ यांच्या जिव्हारी लागला..

आपल्या मराठी इंडस्ट्रीत कलाकारांना फार आपलेपणा मिळतो. मराठी प्रेक्षक इतका प्रेमळ आहे, की एखादा कलाकार आवडला की त्या कलाकाराच्या नावाची फोड करून त्याला संबोधण्यात येतं. उदाहरणार्थ लक्ष्मीकांत बेर्डे यांना लक्ष्या म्हटलं जातं. प्रभाकर पणशीकर यांना पंत. तसंच अशोक सराफ म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके अशोक मामा.

गेली अनेक दशकं अशोकमामा आपल्याला कधी खळखळून हसवतात, तर कधी ‘कळत नकळत’ आपल्या डोळ्यातून पाणी काढून ‘शेंटीमेंटल’ करतात. आपल्या अभिनयातून लोकांच्या मनावर राज्य करणारा अशोक मामांचा मात्र एका अनोळखी व्यक्तीने तोंडावर अपमान केला होता. काय होता तो किस्सा ? चला पाहू..

अशोक मामा कोल्हापूरला सिनेमाच्या शूटिंगला जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करत होते.

मराठी सिनेमाचं बजेट खूप कमी असतं. त्यामुळे उगाच निर्मात्याला गाडीचा किंवा विमानाचा अतिरिक्त खर्च नको, म्हणून अशोक मामा यांनी आनंदात रेल्वेने प्रवास करण्याचं मान्य केलं. या प्रवासात सिनेमातील इतर कलाकार सुद्धा होते. त्यामुळे सगळे एकत्र असल्यावर गप्पा टप्पा मारत, मजा – मस्ती करत प्रवास कंटाळवाणा होणार नाही, असा अशोक मामांचा यामागे हेतू होता.

मुंबईहून रात्रीची गाडी होती. रेल्वेमध्ये असणारी 3 टायर बोगी होती. प्रवास सुरू झाला. अशोक मामा सर्वांसोबत गप्पांचा आनंद लुटत एन्जॉय करत होते. अशोक मामा ज्या डब्यात बसले होते तिथेच दोन माणसं सुद्धा प्रवास करत होती. ती अनोळखी माणसं अशोक मामांकडे एकटक बघत होती. मामा त्या दोघांची गंमत बघत होते.

अशोक मामांना बघून त्या दोन माणसांपैकी एक माणूस दुसऱ्याला म्हणाला,

“अरे ओळखलं का त्यांना?”

दुसऱ्याने एका वेगळ्या तोऱ्यात अशोक मामांकडे पाहून तोंड फिरवलं. पहिला मात्र खूप उत्साही झाला होता. कारण खुद्द अशोक सराफ त्यांच्यासोबत ट्रेनने प्रवास करत होते. पहिल्या माणसाला वाटलं दुसऱ्याने ओळखलं नाही. म्हणून त्याने पुन्हा एकदा दुसऱ्याला सांगितलं,

“अरे ते, अशोक सराफ आहेत.”

दुसऱ्याने अशोक मामांकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि म्हणाला,”मी तर केव्हाच ओळखलं होतं. पण हा माणूस थर्ड क्लासने प्रवास करेल असं वाटलं नव्हतं.” एका वेगळ्याच माजात आणि काहीशा तुच्छतेने तो दुसरा माणूस म्हणाला.

रेल्वेमध्ये असलेली 3 टायर बोगी ही सामान्य बोगी सारखीच असते. फक्त त्यामध्ये AC असतो. इतका मोठा कलाकार जेव्हा अशा बोगी तून प्रवास करतोय म्हटल्यावर त्या अनोळखी माणसाला अशोक मामांचा पाणउतारा करण्याची चांगली संधी मिळाली. आणि म्हणून तो माणूस असं बोलून गेला.

अशोक मामांनी त्या माणसाचं हे सर्व बोलणं ऐकलं. त्यांना वाईट वाटलं पण ते काही बोलले नाहीत.

त्यांनी एका कानाने ऐकलं आणि दुसऱ्या कानाने सोडून दिलं. अशोक मामांनी समोरच्या माणसाची शेरेबाजी ऐकुन उत्तर दिलं सुद्धा असतं. परंतु उगाच शब्दाला शब्द वाढण्यापेक्षा त्यांनी दुर्लक्ष करणं पसंत केलं. तसा हा किस्सा छोटासा. परंतु तो अशोक मामांना खूप काही सांगून गेला. निर्मात्याचे पैसे वाचावेत म्हणून अशोक मामांनी स्वतःहून रेल्वेचा प्रवास निवडला होता. या प्रसंगावर प्रतिक्रिया देताना अशोक सराफ म्हणाले,

“माझी सुरुवात अत्यंत कमी पैशातून झाली आहे. मला पहिलं पाकीट मिळालं होतं ५०० रुपयाचं. त्यानंतर निर्विवाद मानधनाची रक्कम वाढत गेली. परंतु पैशाचं महत्त्व खूप होतं. त्यामुळे आज जेव्हा करोडोंची उलाढाल सुरू असते. तेव्हा आम्ही मात्र अजूनही लाखातच बोलतो.”

नट आहोत म्हणून वाट्टेल ती रक्कम बोलून निर्मात्याला अडचणीत टाकण्याचा अशोक मामांचा स्वभाव नाही, हेच यावरून कळून येतं. म्हणूनच अजूनही अशोक सराफ यांना मराठी तसेच हिंदी इंडस्ट्रीत प्रेम आणि आदर मिळतो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.