शहाण्यांचं वेड !

काही माणसं आपल्याला फक्त आवडतात. पण फार कमी माणसं अशी असतात ज्यांचं आपल्याला वेडच लागतं. अमुक विषयावर ते अमुक बोलले किंवा अमक्या विषयावर ते नेमकं काय बोलले असते असं आपलं सुरु असतं. वाचल्यावर ज्यांचं वेड लागलं पाहिजे असे अशोक शहाणे. खरं तर पुस्तक एकच. नपेक्षा. पण मराठीत कायम ज्यांच्याकडून आणखी काही लिहून व्हावं अशी अपेक्षा असते असे लेखक म्हणजे अशोक शहाणे. त्यांचं नाव सम्राटाचं आहे. पण त्यांचा विजय कुठला आहे? अशोक शहाण्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्यासाठी केलीय ती आपल्या पराभवाची, आपल्या मर्यादांची फार स्वच्छ जाणीव त्यांनी नपेक्षा या पुस्तकात करून दिलीय. १९६३ साली आजकालच्या मराठी वाड्मयावर क्ष किरण या लेखात त्यांनी मराठी लेखक आणि लेखनाची जोरदार हजेरी घेतलीय. कलावंत म्हणजे समाजाचे ज्ञानेंद्रिय ही पाउंडने सांगितलेली कसोटी ते मांडतात. त्यावर आपण टिकतो का? आता यावर आत्मपरीक्षण करण्यापलीकडे आजही काय करू शकतो आपण?    

आपण आपल्या संस्कृतीला थोर समजणारी माणसं. जुनं ते सोनं हे आपलं ठरलेलं. पण या गोष्टींकडे तटस्थपणे बघायची सवय लावून घ्यायची असेल तर शहाणे वाचलेच पाहिजेत. अर्थात आपलं ते सगळं थोर अशी घट्ट समजूत असेल तर शहाणेंच्या लिखाणाने भोवळ यायची शक्यता जास्त आहे. अगदी साधे प्रश्न विचारून शहाणे आपल्याला निरुत्तर करतात. ते लिहितात, मराठीतलं अख्ख संतवाड्मय धुंडाळून पाहिलं तरी तेंव्हाच्या खायच्या पदार्थांची फारशी मोठी यादी हाताला लागत नाही. मग ते पोषाखावर लिहितात. त्याच्यासुद्धा नोंदी नाहीत. आपल्याला हे प्रश्न पडत नाहीत. खरंतर खूप कमी लोकांना हे प्रश्न पडले असतील. हे शहाणेंचं वैशिष्ट्य. त्यांचा विचार वेगळा असतो. चौकटीबाहेरचा. आपण आपल्या पूर्वजांचा पोशाख,त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी याविषयी किती जाणून आहोत? गौतम बुद्धाविषयीसुद्धा सविस्तर माहिती आपल्याला इंग्रजांनी शोधून दिली याचीसुद्धा जाणीव शहाणे करून देतात.  

अशोक शहाणे काय रसायन आहे हे समजून घ्यायचं असेल तर त्यांनी ज्ञानेश्वरांवर लिहिलेल्या या ओळी वाचाव्यात. त्यानंतर त्यांच्याबद्दल फार काही लिहायची गरज उरत नाही.

‘ संन्याशाचा पोर म्हणून हिणवता ना? तुझा बाप कोण? म्हणून विचारता ना? तर हे घ्या त्या प्रश्नाचं उत्तर. रखमादेवीचा तो नवरा माझा बाप! ‘रखमा’सुद्धा ‘बाई’ नाही. देवी. अन बाप म्हणजे सरळसोट बापच. वडील किंवा पिताबिता नाही. निव्वळ बाप! काय बिशात मऱ्हाटा बोल अमृताशी पैज जिंकत नाही!’

विनोदावर शहाणे काय लिहितात बघा, ‘रामदासांनी मराठी मन अचूक हेरूनच का काय, पण टवाळा आवडे विनोद असं म्हणून टाकल्यावर नंतरच्या मराठी लोकांनी नेमकं तेच खर मानलं अन इथले लोक टवाळकीला विनोद समजायला लागले.’

अशोक शहाणे वाचायला हवेतच. पण ऐकायलाही हवेत. काय काय एक एक भन्नाट गोष्टी सांगून जातात सहज. एका लेखात त्यांनी लिहिलंय, ‘अल्बेरुनी असो की इब्ने बतुता, सगळे प्रवासी परदेशीच कसे? त्यांनी काही टिपून ठेवलंय म्हणून आपल्याला आपले बापजादे कसे राहात होते ते कळावं? एरवी सगळा आनंदी आनंदच असावा? इतका आनंदसुद्धा बरा नव्हे बहुतेक.’

खरं आहे ना? इतका आनंदसुद्धा बरा नव्हे. दुखः वाटून घ्यायची गरज नाही. पण काय चुकलंय? काय चुकायला नको? हे कळण्यासाठी तरी अशी माणसं वाचली पाहिजेत. ऐकली पाहिजेत.म्हणजे त्यांचं जग, त्यांचा काळ, त्यांनी केलेलं काम समजून घेता येईल. अशोक शहाणे यांच्याबद्दल त्र्यं. वि. सरदेशमुख यांनी ‘भंजन रचनेसाठीह्या लेखातील ओळी आवर्जून वाचायला हव्यात.

“एका विख्यात नगरीच्या एका प्रतिष्ठित साहित्य (व्यापार) संस्थेच्या दफ्तरी संस्था गांडू आहेअसे उघड्या कार्डाने कळवणारे एक प्रशस्तिपत्रक त्याच सुमारास दाखल झाल्याचे ऐकिवात आहे. आगेमागे पिल्लू पत्रिकांचा (लिट्‍ल मॅगझिन्सचा) अवतार आपल्या येथे झाला आणि त्यातल्या पहिल्या पहिल्या उद्रेकात तरुण पिढी स्वतःला अत्यंत कठोरपणे निखंदून घेत असल्याचे दिसून आले. तिचा कशावर आणि कोणावर विश्वास उरला नाही. कशाची आणि कोणाची श्रद्धा तिला राहिली नाही. बोलणारा तसा चालणारा कोणी आसपास दिसेना. मग तिने पाय कोणाचे वंदावे? घरीदारी, रस्त्यात, कचेर्‍यांत, शाळा-कॉलेजांत नुसता विसविशीतपणा, नुसती ढकलबाजी आणि भोंदुगिरी तिला जाणवू लागली. स्वतःच्या सामर्थ्याची नस सापडेना तेव्हा ही तरुण मुले स्वतःला गांडूम्हणवून घेऊ लागली. आपल्याला गांडूगिरीशिवाय काही साधत नाही, असे फिदीफिदी सांगू लागली. या दहा वर्षांत हा शब्द इतका सर्रास चलनी झाला आहे की, सध्या शाळा-कॉलेजांतील तरुण मुले एकमेकांना एरवीची किंवा लाडाची हाक मारताना याच शब्दाचा उपयोग करतात. त्यांना त्यात कसला अमंगळपणा, अनुचितपणा, शिवीपणा बिलकुल वाटत नाही. या शब्दातला अभद्रपणा जाऊन तो उदात्त अर्थाचा झाला म्हणावे की वापरणार्‍यांच्या जीवनात अभद्रता हीच अटळपणे स्वीकार्य होऊन बसली आहे? झाले तरी काय?
 मला तर असे जाणवत आले आहे की, ‘गांडूम्हणवून घेणारी ही तरुणांची पिढी फारच म्हणजे अगदी नको तितकी सत्त्वशील निघाली.”

Leave A Reply

Your email address will not be published.