१९७५ मध्ये सांगलीतल्या कुटूंबात घडलेल्या सत्यघटनेवर आधारीत असणारा, अष्टविनायक सिनेमा.

काही गाणी कानावर पडताच एक प्रसन्नता आणि सणाचा फील घेऊन येतात.. अशीच प्रसन्न करणारी गाणी म्हणजे “प्रथम तुला वंदितो..!”किंवा मग “अष्टविनायका तुझा महिमा कसा!” अष्टविनायक या सिनेमातील हि गाणी.

इतकी वर्षे झाली तरी अजूनही तितकीच श्रवणीय व गणेशोत्सवाला अधिक साजिरी करणारी गाणी!

दरवर्षीच्या गणेशाच्या आगमनाप्रमाणे व याच काळात टीव्हीवर “अष्टविनायक” हा सिनेमाही न चुकता पाहायला मिळतो व इतकी वर्षे नित्यनेमाने हा सिनेमा पाहूनही आमच्या घरांत तो पुन्हा नव्याने पाहिला जातो,अगदी आवडीने!

प्रत्येक सीनच्या पुढे काय असेल..गाण्याचं पुढचं कडवं काय असेल,शेवट काय असेल. हे सारं माहित असतानाही पुन्हा-पुन्हा,दरवर्षी आम्ही हा सिनेमा पाहतोच!

सगळ्या बाबतीत एक जुळून आलेला सिनेमा आहे.

साधारण १९७५ मध्ये सांगलीमध्ये एका कुटुंबांमध्ये घडलेल्या सत्यघटनेवर आधारित हा सिनेमा (सुरुवातीलाच श्रेयनामावलीत तसा उल्लेख आहे व मागे कधीतरी वाचण्यातही आलं होतं!) हा सिनेमा म्हणजे आस्तिक-नास्तिक या दोन वृत्तींच्या मधला एक सुवर्णमध्य म्हणता येईल!

कारखानदार(मिलमालक) चंद्रकांत यांचा परदेशातून शिकून आलेला बाळ(बाळासाहेब इनामदार/सचिन)हा एकुलता एक मुलगा..मनाने नितळ,पण नियम व धोरणांबाबत कठोर,आईच्या अकाली निधनामुळे (व देवाने यांत अजिबातच दया न दाखवल्यामुळे!)वृत्तीने नास्तिक असलेला. वडील मिलचा कारभार याच्यावर सोपवतात. नवीन कार्यपद्धतीनुसार हा मिलमधील वर्षोनुवर्षे चालत आलेला गणेशोत्सव बंद करतो. परिणामी कामगार नाराज. त्यातच वडिलांचे निधन होते.

एका कामांनिम्मित बाहेरगावी गेलेल्या व पावसात अडकलेल्या बाळची भेट होते वीणाशी(वंदना पंडित) वीणा. पूर्ण देवभक्त,आस्तिक,गुणी,सालस व स्वतःच्या वडलांसारखीच(डॉ वसंतराव देशपांडे) सुंदर सुरेल गात्या गळ्याची मुलगी. बाळ अर्थातच तिच्या प्रेमात पडतो व वडिलांच्या जिवलग मित्राच्या साठे काकांच्या(शरद तळवळकर)मदतीने हे लग्न घडवूनही आणतो. सुरु होतो सुखाचा संसार,नवलाईचे दिवस अन त्याचबरोबर मिलमध्येही नव्याने काही बदल.

विस्तारीकरणासाठी कैक वर्षापासून उभारलेले व कामगारांचे श्रद्धास्थान असलेले गणेशमंदिर मुळापासून हलवले जाते व नवऱ्याला यासाठी प्रथमच कडाडून विरोध करणारी व प्रसंगी त्याच्या विरोधात जाणारी वीणादेखील उन्मळून पडते तुटते. दोघांच्याही या आस्तिक-नास्तिकच्या लढ्यामध्ये,दोघांमध्ये दुरावा व अबोला येतो. त्यातच तिचं miscarriage हि होते. मरणासन्न अवस्था होते. इकडे मिलमध्ये आर्थिक तोटे येतात,मिलला आग लागते. संकटं जणू सर्वबाजूनी चाल करून येतात. इथे साठेकाका विणाला आठवण करून देतात,तिच्या अपूर्ण राहिलेल्या नवसाची. अष्टविनायक यात्रेची,तेही नवऱ्यासोबत करण्याची!

विणाच्या आर्जवी विनंतीला मान देऊन,फक्त तिच्या इच्छेखातर बाळ तिच्यासोबत हि यात्रा पूर्ण करतो…व यात्रेच्या शेवटी अर्थातच गेलेलं सर्व वैभव पुनर्प्राप्तीचा सुखद अनुभवही घेतो!

देव मानावा अथवा न मानावा,हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण त्या अलौकिक शक्तीवर विश्वास मात्र जरूर ठेवावा आणि या गोष्टीचा हा सिनेमा म्हणजे एक सुखद अनुभव आपल्यासाठीही आहे. यातली सगळीच गाणी अतिशय सुरेल आहेत,मनाजवळ जाणारी आहेत.

लग्न ठरल्यानंतर भावी सुखी संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या विणाचं “दिसते मजला सुख चित्र नवे..”किंवा
“आली माझ्या घरी हि दिवाळी!” हे गाणं पाहताना त्या दोघांचा पहिला दिवाळ-सण खूप जाणवून जातो.
लेकीच्या पाठवणीसाठी पंडितजींनी म्हणजेच डॉ वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं व अजरामर झालेलं.. व प्रत्येक बाप-लेकीला जणू आपल्याच या भावना,असं वाटायला लावणारं गाणं..”दाटून कंठ येतो…!”अगदीच हळवं!

“प्रथम तुला वंदितो..”हे गाणं पाहताना व ऐकताना आपणही मंदिरामध्ये उभं असल्याचा फील येतो व सगळ्यात अगदी अप्रतिम ठरलेलं गाणं “अष्टविनायका तुझा महिमा कसा..”

दिग्दर्शन अभिनय,संगीत, सगळयाचबाबतीत अतिशय सर्वोत्तम! या गाण्यामध्ये असलेली त्या काळच्या “वरच्या फळीतील कलाकारांची” उपस्थिती म्हणजे एक वेगळाच व आंनददायक प्रयोग असावा! 

वीणा-बाळ यांच्या संसारात काही ना काही काळंबेरं करण्याचं “मौलिक”काम बाळची सावत्र आई (पदमा चव्हाण)यथासांग पार पाडते..उत्तम भूमिका,उत्तम अभिनय व आईच्या भूमिकेत जरी असल्या तरी त्या कमालीच्या देखण्या दिसल्यात !!राजा गोसावी यांनी साकारलेली “नारू मामा”हि इरसाल,लोचट आणि ऐतखाऊ मामाची भूमिका..भारीच!(या पात्राला हेच नाव देण्याचं कुणाला बरं सुचलं असेल?परफेक्ट आहे एकदम!)

या सिनेमामधलं एक दृश्य माझ्या कायम आवडीचं राहिलं आहे. कामगारांनी संप पुकारला आहे. मिल बंद आहे,त्यात घरचा माणूस नारुमामा त्यांना अधिक चिथाऊन देतोय. बाळ अगदी हतबल आणि यातून मार्ग काढण्यासाठी साठेकाका तिथे आलेत. कामगारांना पूर्वीचा दाखला देत,नानांनी म्हणजेच बाळच्या वडलांनी त्यांच्यासाठी वेळोवेळी केलेल्या मदतीची आठवण करून देतात. कामगार जरा सद्गदित. नारुमामा साठेकाकांना हाकलून लावतोय अन या गडबडीत त्यांच्या हातातला दागिन्यांचा डबा खाली पडतो.

“हे ठेवा,तुमच्या काकूचे आहेत..उपयोगी येतील..पण नानाची हि मिल बंद ठेवू नका!”

कामगारांच्या डोळ्यात पाणी अन हि मिल जरूर चालू राहील काका,हे दागिने ठेवा.. असं आश्वासकपणे म्हणत सगळे परत कामावर रवाना हे दृश्य लांबून पाहणाऱ्या बाळच्याही डोळ्यात कृतज्ञतेचे पाणी…

हयात नसलेल्या आपल्या मित्राच्या मिलसाठी व अडचणीत असलेल्या त्याच्या मुलासाठी एका निष्ठावान सहकाऱ्याने व जिवलग मित्राने केलेलं हे योगदान आता पाहायला मिळेल? मालकाबरोबरची हि बांधिलकी आता दिसणार देखील नाही.

परदेशातून आपल्या देशात आलेल्या MNC मध्ये कितीही मोठा पाच आकडी पगार मिळो पण प्रोजेक्ट्स, अँप्रझेल्स, डेडलाईन्स यांमध्ये कुठे आला हा भावनिक ओलावा? कालाय तस्मे नमः हेच खरं!

या सिनेमाविषयी दोन काहीश्या गंमतीशीर गोष्टी वाचण्यात आल्या होत्या.

अष्टविनायकावरचं गाणं जगदीश खेबुडकरांनी उत्कृष्टच लिहिलं आहे,पण त्यातील एकही गणपती प्रत्यक्ष न पाहता. शरद पिळगावकर यांनी दिलेल्या एका पुस्तकाच्या आधारे त्यांनी इतकी अनुपम रचना रचली. धन्य तो कवी!

सिनेमांमध्ये वीणा पूर्ण आस्तिक तर बाळ अगदीच नास्तिक. पण प्रत्यक्षात वंदना पंडित या कमालीच्या नास्तिक होत्या व सचिन हे पूर्ण गणेशभक्त आस्तिक! कमालच ना! (हे एकदा वाचण्यात आलं होतं!)

आज रविवार लागेलच हा सिनेमा टीव्हीवर. परत पाहिनच. तोवर “अष्टविनायका तुझा महिमा कसा!”म्हणत गणपतीची तयारी करूयात !

  • डॉ.विद्या निकाळजे

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. मराठी चित्रपट जगतात अजरामर ठरावा असाच हा सिनेमा आहे, नुकताच ABP माझा व सचिन यांच्या सोबत काही भाग दाखवले, हा सिनेमा मी खूप वेळा पाहिला आहे. जय गणेश.

Leave A Reply

Your email address will not be published.