हेच ते डॉक्टर होते जे पेपरमध्ये सेक्सबद्दल उत्तरं द्यायचे आणि पोरांची डोकी आऊट व्हायची..

आमची शाळा तशी पुढारलेली होती, म्हणजे कसं पोरं-पोरी एका बेंचवर बसू शकायची. एकत्र डबा खाऊ शकायची, पण त्याही पेक्षा भारी गोष्ट होती आमच्या शाळेत इंग्लिश पेपर यायचे. आता त्या वयात कामचलाऊ बोलता आलं आणि पास होऊ इतकं लिहिता आलं म्हणजे लई झालं असं वाटायचं.

पण आमच्या शाळेला वाटायचं पोरं एकदम एक्सपर्ट झाली पाहिजे, म्हणून शाळेत यायला लागले इंग्लिश पेपर्स. पहिल्यांदा आम्ही इग्नोर मारलं, मग नंतर एकदिवस एका गड्यानं टाईमपासमध्ये पेपरचं मागचं पान उघडलं आणि आमच्या मनानं उठाव केला, मेंदू गदागदा हलला कारण समोरची चित्रं फ्युजा उडवणारं होतं.

डायरेक्ट हॉलिवूडची हिरॉईन आणि तेही तंग कपड्यात

यात असले वाढीव फोटोज येतात म्हणल्यावर आमच्या लायब्ररीच्या फेऱ्या वाढल्या. इंग्लिशमध्ये चार वाक्य बोला म्हणल्यावर आम्ही अडखळलो असतो पण १० हिरॉईनची नावं त्यांच्या ड्रेसच्या रंगासकट सांगितली असती.

एकदा आमच्या सरांनी सांगितलं वाचलेलं जास्त लवकर समजतं आणि योगायोग म्हणून त्याच दिवशी आम्हाला समृद्ध करणारा खजिना घावला, त्यात एकही फोटो नव्हता, पण लय खतरनाक शब्द होते. त्याच्यात कसलीच स्टोरी नव्हती, पण आपले वाटतील असे प्रश्न होते.

या खजिन्याला जागा केवढी होती, तर एक कॉलम आणि ज्ञान किती तर सगळ्या पेपरपेक्षा जास्त.

या कॉलमचं नाव होतं, Ask the Sexpert.

यात काय असायचं?

आपल्यासारखी ज्ञानपिपासू लोकं आजूबाजूला लय असायची, मग त्यांना सेक्स या विषयाबद्दल अनेक प्रश्न पडायचे. मग ते विचारायचे कुणाला? कारण पारावरच्या दोस्ताला विचारलं तर त्याला अनुभव नसला तरी तो फिक्स रान हाणणार. घरच्यांना विचारायचं हा विचार सुद्धा डोक्यात यायचा नाही आणि डॉक्टरकडं जाणं म्हणजे आपण बाद आहोत असा मेसेज गावात फिरणार याची भीती.

या समस्त चूकभूल देणे घेणे मित्र परिवारासाठी हा कॉलम धाऊन आला. लोकांच्या कितीही विचित्र प्रश्नाला इथं उत्तर मिळायचं आणि बाकी काही शांत नाही झालं, तरी ज्ञानाची भूक तेवढी शांत व्हायचीच.

हे असलं वाढीव ज्ञान देणारा माणूस कोण होता?

कॉलमचं नावच ‘आस्क द सेक्सपर्ट’ होतं. म्हणजे असा माणूस जो सेक्समध्ये एक्स्पर्ट आहे. अय्योव, एक्स्पर्ट माणूस तेही सेक्समध्ये. आम्हाला त्याची इमेज इमॅजिन झाली होती, ६.५ फूट उंची असेल, सिक्स पॅक्स असतील, याला किमान तीनेक गर्लफ्रेंड असतील. तेव्हा मिर्झापूर असतं, तर डायलॉग हाणता आला असता, जिंदगी हो तो ऐसी हो, वरना जिंदा तो…

पण हा माणूस होता, डॉ. महिंद्र वत्स. २००४ मध्ये जेव्हा हा कॉलम आला तेव्हा त्यांचं वय होतं ८० वर्ष. हाय का आता, म्हणजे ८० वर्षांचा हा भिडू लोकांचा दोस्त बनून त्यांचे बेडरुममधले प्रॉब्लेम सोडवत होता.

आता वत्स काकांबद्दल आपण बोलूच, पण आधी जरा त्यांची प्रश्नोत्तरं बघू.

प्रश्न –  मी आणि माझ्या गर्लफ्रेंडनं एकाच वेळी सेक्सचा विचार करत हस्तमैथुन केलं, तर त्यामुळं ती प्रेग्नंन्ट होऊ शकेल का ?

उत्तर – ज्या व्यक्तीची स्वप्न पाहत आहात, तिच्यापर्यंत तुमचे स्पर्म इकडून तिकडून नेण्यासाठी कुठलीच परी येत नाही.

इमॅजिनेशन तुम्हाला मजा देऊ शकतं, त्या पुढं काही नाही.

काही दिवसांपूर्वीच आपण घोरपडीवर बलात्कार झाल्याची दुर्दैवी घटना ऐकली होती, तसाच प्रश्न एकदा वत्स काकांना विचारण्यात आला होता.

प्रश्न – मी कर्जतचा आहे, माझं वय ३२ असून लग्न होऊन खुश आहे. नुकतंच मला माझ्या बायकोशी प्रतारणा (चीटिंग ओ) करण्याची इच्छा होतीये, माझ्याकडे एक रमीला नावाची बकरी आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मला तिच्यावर प्रेम करावं वाटतंय. जर मी तिच्याशी संबंध ठेवले, तर ते नॉर्मल असेल काय? मला एसटीडी सारखा आजार होऊ शकतोय का?

उत्तर – एकदा रमीलाला विचारा, तिला आवडेल का! (उपरोध ए ओ) असं काहीही करणं हे बेकायदेशीर आहेच, पण नॉर्मलही नाही.

उत्तरं वाचून वाटलं असणार काका पुणेरी असतील, पण नाही काका पुणेकरांपेक्षा खतरनाक आहेत.

काका मुळचे पंजाबी, पण शिकले, वाढले मुंबईमध्ये. त्यानंतर नोकरीसाठी ते लंडनमध्ये गेले. तिथंच करिअर करणार होते, मात्र आर्मीत डॉक्टर असणारे त्यांचे पप्पा आजारी पडले आणि वत्स काका भारतात आले. इथं त्यांनी गायनॅक म्हणून काम करायला सुरुवात केली.

त्यांनी भारतात सेक्स एज्युकेशन बाबतही भरपूर काम केलं. १९६० च्या दशकात त्यांना एका महिलांसाठीच्या मॅगझीनसाठी सेक्स या विषयावर कॉलम लिहायला सांगितलं आणि त्यांनी तो लिहिलाही. अनेक महिला त्यांना वेगवेगळे खासगी प्रश्न विचारायच्या, तेही उत्तर द्यायचे. विशेष म्हणजे या महिलांचं नाव गुपित राहायचं.

१९८० पर्यंत त्यांनी काम सांभाळत हे कॉलम लिहिले, नंतर मात्र पूर्णवेळ काऊन्सलर म्हणून काम करायला सुरुवात केली. 

एकदा महिलांसाठीच्या मॅगझीनच्या संपादकानं त्यांना एका प्रश्नावर सेन्सॉर लावायला सांगितला, म्हणून त्यांनी तिकडं लिहिणं थांबवलं. २००४ पासून जेव्हा त्यांचा कॉलम ‘मिरर’मध्ये यायला लागला तेव्हा तो तुफान चालला.

भाषेचं आणि विषयाचं बंधन नसल्यानं राडे झाले, पण वत्स काकांनी कधी कान उघडणारी, तर कधी हसवणारी उत्तरं देत कॉलम सुपरहिट केला.

१४ ते १८ वर्षांच्या वयात वत्स काका सुपरह्युमन वाटायचे. आपल्याला जे प्रश्न पडायचे, ज्या शंका वाटायच्या त्यांचं उत्तर त्यांच्याकडं असायचं. विज्ञानाच्या धड्यात जेवढी माहिती मिळाली नाही, तेवढी पेपरचं पान वाचून मिळाली… आणि जरा लयच पर्सनल सांगायचं झालं, तर सायबर कॅफेत कोपऱ्यातला कॉम्प्युटर मिळाला की, काय सर्च करायचं हे सुद्धा त्यांच्यामुळंच समजलं.

आपल्या करिअरमध्ये ३५ हजारपेक्षा जास्त प्रश्नांची उत्तर देणाऱ्या डॉक्टर वत्स यांचं २०२० मध्ये निधन झालं,

मात्र ते अजूनही आपल्यातच असावेत, पेपरच्या चिठोऱ्यांमध्ये आणि आपला मेंदू हलवणारं ज्ञान दिल्याबद्दल आठवणीत.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.