२००८ सालच्या ‘राजस्थान’ फॉर्मुल्याने, ‘मध्य प्रदेश’चा मुख्यमंत्री ठरणार…?

आज जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालात तेलंगाना, मिझोरम आणि छत्तीसगड याराज्यात अनुक्रमे टीआरएस, मिझो नॅशनल फ्रंट आणि काँग्रेस पक्षाचं सरकार बनणार हे जवळपास स्पष्ट झालंय. तिन्हीही राज्यात संबंधित पक्षांनी अतिशय मोठे विजय मिळवलेत.

हिंदी बेल्टमधील राजस्थान आणि मध्य प्रदेशातील चित्र मात्र गुंतागुंतीचं होताना बघायला मिळतंय. मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर सुरु असतानाच,राजस्थानमध्ये देखील सत्ता स्थापनेसाठीची मॅजिक फिगर स्वबळावर गाठता येईल की नाही,हे आताच खात्रीशीररित्या सांगता येत नाही.

मायावतीयांच्या बहुजन समाजवादी पक्षाच्या आमदारांना मात्र अशा स्थितीत दोन्हीही  राज्यात आता सोन्याचा भाव प्राप्त होणार आहे. शेवटचे निकाल हाती आल्यानंतर राजस्थानमध्ये कदाचित काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेलही, पण मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस असो किंवा भाजप असो दोन्हीही पक्षांना बसपाची मदत घ्यावीच लागेल, असं सध्या तरी दिसतंय. अशा वेळी २००८ सालच्या ‘राजस्थान’ फॉर्मुल्याने मध्य प्रदेशात सरकार स्थापन केलं जाऊ शकतं. मग ते भाजपचं असो किंवा काँग्रेसचं.

काय होता २००८ सालचा फॉर्मुला..?

२००८ सालच्या राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेस ९६ सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. भाजपला त्यावेळी ७६ जागा मिळाल्या होत्या. बहुजन समाज पक्षाला ६ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. पण याच ६ जागांनी मायावती ‘किंगमेकर’ बनल्या होत्या.

बसपाने सत्तास्थापनेसाठी काँग्रेसला पाठींबा दिला आणि अशोक गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री झाले, पण त्या बदल्यात अशोक गेहलोत यांना बसपाच्या सहाची सहा आमदारांना आपल्या मंत्रिमंडळात सामावून घ्यावं लागलं होतं.

सध्याचे हाती आलेले निकाल आणि वेगवेगळ्या जागांवरील आघाडीचे आकडे लक्षात घेता यावेळी देखील ‘बसपा’ सत्ता स्थापनेतील महत्वाचा फॅक्टर ठरणार हे जवळपास निश्चित. त्यामुळे यावेळी देखील मध्य प्रदेशात ‘बसपा’ आमदारांची लॉटरी लागण्याची शक्यता नाकारता येतनाही.

Leave A Reply

Your email address will not be published.