जास्त दिवसांचं अधिवेशन घेणं केंद्राला जमतं पण महाराष्ट्रात कोरोनाचं कारण दिलं जातं…

अधिवेशन… मग भले ते संसदेचे असो वा विधिमंडळाचे… लोकशाहीतील एक प्रमुख हत्यार म्हणून त्याकडे बघितले जातं. यात आमदार-खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न मांडण्याची संधी मिळत असते. तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विशेष उल्लेख, औचित्याचा मुद्दा, अर्धा तास चर्चा, विरोधी पक्षाचे प्रस्ताव यातून सरकारला प्रश्न विचारता येऊ शकतात. यातून जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळत असतो. सरकारवर नियंत्रण ठेवता येत असते, त्यांना जाब विचारता येतो.

मात्र कोरोनाच्या काळात या अधिवेशनांवर काहीशा मर्यादा आल्या आहेत. त्यातही राज्याच्या अधिवेशनावर जास्त मर्यादा आणल्याचं आपल्याला पहायला मिळालं. यंदाचे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन २ दिवसांचे पार पडले तर त्याचवेळी आता संसदेचे अधिवेशन २३ दिवस चालणार आहे.

यावरुनच विरोधी पक्षांकडून राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टिका देखील करण्यात आली. सोबतचं जास्त दिवसांचं अधिवेशन घेण्याचं जे केंद्राला जमतं ते महाराष्ट्राला का नाही असा सवाल देखील विचारला जात आहे. याआधी देखील अशी तुलना आणि टिका करण्यात आली होती.

त्यामुळेच एकूणच संपुर्ण कोरोना काळात संसदेचे आणि विधिमंडळाचे अधिवेशन किती दिवस चालले आणि यात प्रामुख्यानं काय कामकाज झाले याचा तुलनात्मक आढावा घेणं गरजेचं आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन – २०२०

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन – २०२०

२०२० मधील संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीला सुरु झालं होतं. जे ३ एप्रिलपर्यंत दोन टप्प्यामध्ये नियोजित होतं. या दरम्यान १२ फेब्रुवारी ते १ मार्च या दरम्यान स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर २ मार्च ते २३ मार्च पर्यंत कामकाज चालवण्यात आले.

मात्र ३ एप्रिलपर्यंत नियोजीत असलेले अधिवेशन कोरोनामुळे १० दिवस आधीच गुंडाळण्यात आले. म्हणजे जवळपास ३५ दिवसांचे कामकाज झाले होते. या काळात संसदेमध्ये देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला तर एकूण १२ वेगवेगळी विधेयक संमत करण्यात आली. सोबतच १० विधेयक सादर करण्यात आली होती.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन – २०२०

२०२० सालाचं राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रूवारी पासून सुरु झालं होतं. या काळात ९ मार्च रोजी पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर हळू हळू राज्यात संख्या वाढत गेली. त्यामुळे १४ मार्च रोजी अधिवेशन स्थगित करण्यात आलं. म्हणजे २० दिवसांचं कामकाज झालं.

या काळात अधिवेशनात १८ विधेयके मंजूर झाली होती. यात शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा कायदा, औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा ठराव, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नाव बदलून नाना शंकरशेठ मुंबई सेंट्रल टर्मिनस नामकरण करण्याचा ठराव संमत करण्यात आला होता.

सोबतच अधिवेशनात एक पूर्ण दिवस महिलांच्या प्रश्नांवर चर्चा झाली होती. तर शेवटच्या दिवशी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांपैकी १८ गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय झाला होता. सोबतच शिवडी ते न्हावा-शेवा बंदरच्या शेवटच्या टोकापर्यंतच्या चिर्ले गावापासून ते महाराष्ट्र –गोवा सीमेवरील पात्रादेवीपर्यंत ५०० किलोमिटर महामार्गाची घोषणा करण्यात आली होती.

म्हणजे त्यावेळी २१ मार्च रोजी देशभरात ३३२ रुग्ण सापडले होते. तर महाराष्ट्रामध्ये २६ रुग्ण होते. या कालावधीमध्ये संसदेचे अधिवेशन ३५ दिवस चालले तर विधीमंडळाचे अधिवेशन २० दिवसात गुंडाळण्यात आले.

पावसाळी अधिवेशन – २०२०

संसदेचे पावसाळी अधिवेशन – २०२०

संसदेचे पावसाळी अधिवेशन १४ सप्टेंबर २०२० पासून सुरू झाले होते. पुढे ते १ ऑक्टोबर २०२० रोजी संपणार होते, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक कामकाज पार पडल्यानंतर  लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज २३ सप्टेंबर २०२० रोजी स्थगित करण्यात आलं होतं. या १० दिवसांच्या काळात एकूण १० बैठका झाल्या होत्या.

सोबतच अधिवेशनादरम्यान २२ विधेयके सादर करण्यात आली होती. तर लोकसभा आणि राज्यसभेने स्वतंत्रपणे प्रत्येकी २५ विधेयके मंजूर केली. तर २७ विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केली होती.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन – २०२०

विधिमंडळाचे २०२० मधील पावसाळी अधिवेशन आधी २२ जून रोजी होणार होते. मात्र कोरोनामुळे ते पुढे ढकलून ३ ऑगस्ट रोजी घेण्याचं ठरलं. मात्र त्यावेळी देखील विधीमंडळातील बहुतांश सदस्य कोरोना बाधित असल्यामुळे अधिवेशन पुढे ढकलून ते ७ सप्टेंबर रोजी घेण्याचं ठरलं.

त्यानुसार ७ आणि ८ सप्टेंबर २०२० या दोन दिवसाच्या कालावधीत पावसाळी अधिवेशनात पार पडले. या दोन दिवसाच्या कालावधीत दोन्ही सभागृहांमध्ये एकूण १३ विधेयक संमत होवू शकली होती.

पावसाळी अधिवेशनादरम्यान आपल्याला बघायचं म्हंटलं तर १६ सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर देशात ५४ लाख रुग्णांचा आकडा पार केला होता. दिवसभरात ९० हजारांच्या घरात रुग्ण सापडत होते. तर त्याचवेळी महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा १२ लाखांच्या घरात पोहचला होता. या परिस्थितीमध्ये संसदेचे अधिवेशन १० दिवस चालले तर विधीमंडळाचे २ दिवस.

हिवाळी अधिवेशन – २०२०

३. संसदेचे हिवाळी अधिवेशन – २०२०

कोरोनाच्या कारणास्तव संसदेच विधीमंडळ अधिवेशन रद्द करण्यात आले होते. त्या ऐवजी अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकर आणि जास्त दिवसांचं घेण्याचं ठरले होते.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन – २०२०

विधिमंडळाचे २०२० मधील हिवाळी अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर या दोन दिवसांमध्ये पार पडले होते. या दोन दिवसांच्या अधिवेशन काळात एकूण ९ विधेयक दोन्ही सभागृहात संमत झाली होती. तर १ विधेयक विधान सभेत प्रलंबित राहिले. सोबतच एक विधेयक संयुक्त समितीकडे पाठवले होते. म्हणजेच दोन दिवसांच्या काळात एकूण ११ विधेयकांवर काम करण्यात आलं होते.

हिवाळी अधिवेशाच्या बाबातीत संसदेचे रद्द झालेले तर महाराष्ट्राने पुन्हा दोन दिवसांच अधिवेशन बोलवले. या काळात ११ डिसेंबर रोजीची जर आपण आकडेवारी बघितली तर देशात ९७ लाखांचा आकडा गाठला होता तर महाराष्ट्रात १८ लाखांचा आकडा पार केला होता.

अर्थसंकल्पीय अधिवेशन – २०२१

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२१

संसदेचं यंदाच्या वर्षीचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारी २०२१ रोजी सुरु झाले होते. जे ८ एप्रिलपर्यंत नियोजित होते. या कालावधीत १२ फेब्रुवारीला राज्यसभेचे आणि १३ फेब्रुवारीला लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं होतं. पुढे ८ मार्च रोजी ते पुन्हा सुरु झाले. त्यानंतर मात्र २५ मार्च २०२१ ला अनिश्चित काळासाठी अधिवेशन तहकूब करण्यात आलं होते.

एकूणच जवळपास ३० दिवस अधिवेशनाचं कामकाज चालू राहिले. यात लोकसभेच्या २४ आणि राज्यसभेच्या २३ बैठका झाल्या. यापैकी अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात लोकसभेच्या १२ आणि राज्यसभेच्या ११ बैठका झाल्या तर द्वितीय सत्रात लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या प्रत्येकी १२ बैठका झाल्या.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन – २०२१

१ मार्च ते १० मार्च असे एकूण १० दिवसांच यंदाच्या वर्षीच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले होते. या १० दिवसांच्या काळात ८ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. सोबतच एकूण ६ विधेयक सभागृहामध्ये संमत करण्यात आली होती.

यात मुद्रांक शुल्काच्या दरामध्ये एकसमानता, गुंठेवारी नियमाधीन करणे व त्याची श्रेणी वाढ करणे, महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, नागरी स्थानिक संस्थामधील प्रशासकांच्या नियुक्तीचा कालावधी वाढवणे, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ विधेयक या सहा विधेयकांचा समावेश होता.

सोबतचं हे अधिवेशन मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेण हत्या प्रकरणावरुन चांगलचं गाजलं होते. यात तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची देखील मागणी विरोधकांनी लावून धरली होती.

इथे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधी विधीमंडळापेक्षा संसदेचा जास्त दिसून आला. म्हणजे संसदेचे ३० दिवस तर विधीमंडळाचे अधिवेशन १० दिवसच बोलावले होते. यावेळीपर्यंत देशात १ कोटी रुग्ण सापडले होते तर महाराष्ट्रात ३० लाख रुग्णांचा आकडा पार केला होता.

पावसाळी अधिवेशन – २०२१

संसदेचे पावसाळी अधिवेशन – २०२१

संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या १९ जुलै पासून होणार आहे. त्यानंतर पुढचे जवळपास २३ दिवस हे अधिवेशन चालणार आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन – २०२१

विधीमंडळाच नुकतचं पार पडलेलं पावसाळी अधिवेशन देखील ५ आणि ६ जुलै या दरम्यान केवळ दोनचं दिवसांच पार पडलं होतं. या अधिवेशनात सविस्तर पणे काय झालं यावर बोल भिडूमध्ये यापुर्वीच आढावा घेण्तात आला आहे.

या लिंकवरती क्लिक करुन तो आपण वाचू शकता. पण हे अधिवेशन भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनामुळे बरचं गाजलं. सोबतचं दोन दिवसात ४ ठराव आणि ९ विधेयक संमत करण्यात आली.

पावसाळी अधिवेशन कालावधीमध्ये देखील केंद्राने जवळपास २३ दिवसांचे अधिवेशन बोलावले तर महाराष्ट्राने वर्षभराच्या कालावधीमधील तिसरे अधिवेशन केवळ २ दिवसांचं बोलावले. विषेश म्हणजे या काळात आपल्याला दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळाल्याचं बघायला मिळत आहे. याची कबुली खुद्द आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. मग तरीही २ दिवसांचं अधिवेशन का असा सवाल विचारला जात होता.

आता दिवसांची आणि कामांची तुलना केल्यानंतर प्रश्न उरतो तो खर्चाचा.

संसदेचं अधिवेशन जेवढ्या दिवसांसाठी बोलवण्यात येईल त्यात प्रत्येक दिवसाचा सर्व खर्च मिळून तो साधारण १.५ कोटी रुपये प्रत्येक दिवसाचा असतो. जर नियोजनानुसार कामकाज झाले तर सकाळी ११ ते ६ असे कामकाज चालते. मात्र कधी कधी ६ नंतर देखील कामकाज सुरु असते. मग ते कधी रात्री उशिरा पर्यंत देखील सुरूच असते.

तर विधीमंडळ अधिवेशन जेवढ्या दिवसांसाठी बोलवण्यात येईल त्यात एका दिवसाचा सर्व खर्च मिळून तो १६ कोटींच्या घरात असतो. इथं देखील संसदेप्रमाणेच जर नियोजनानुसार कामकाज झाले तर सकाळी ११ ते ६ असे कामकाज चालते. मात्र कधी कधी ६ नंतर देखील कामकाज सुरु असते. मग ते कधी रात्री उशिरा पर्यंत देखील सुरूच असते.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.