निवडणूक हरुनही छत्तीसगढमध्ये त्याचं कौतुक केलं जातंय !

छत्तीसगडमधील खर्सिया विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अतिशय चर्चेचा विषय ठरली होती. कारण या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेश पटेल यांच्या विरोधात भाजपने जनतेमध्ये अतिशय लोकप्रिय असलेले आयएएस अधिकारी आणि रायपुरचे माजी जिल्हाधिकारी ओम प्रकाश चौधरी यांना निवडणूकीच्या मैदानात उतरवलं होतं. मात्र अधिकारी म्हणून जनतेमध्ये लोकप्रिय असलेल्या चौधरींना, निवडणुकीच्या मैदानात मात्र मतदारांनी नाकारलं. उमेश पटेल यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

ओम प्रकाश चौधरी

ओ.पी.चौधरी हे छत्तीसगडच्या २००५ सालच्या आयएएस कॅडरचे अधिकारी होते. आयएएस अधिकारी म्हणून त्यांचा १२ वर्षांचा कार्यकाळ अतिशय चांगला राहिला होता. राज्यात त्यांनी राबवलेल्या अनेक योजनांचं राष्ट्रीय पातळीवर कौतुक झालं होतं.

नक्सलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी राबवलेल्या ‘प्रयास स्कूल’च्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम राबविण्यातआला होता. या आणि इतरही अनेक लोकोपयोगी कामांसाठी २०११-१२ साली मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान असताना त्यांना उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरविण्यात आलं होतं.

अधिकारी म्हणून इतकी उत्तम कारकीर्द सुरु असताना अचानकपणे ऑगस्ट २०१८ मध्ये निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी निवृत्ती घेत राजकारणात सक्रीय होण्याचा निर्णय घेतला. आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी त्यांनी सत्ताधारी भाजपची निवड केली.

अगसिया समुदायातून येणाऱ्या चौधरी यांना भाजपने खर्सिया मतदारसंघातून तिकीट दिलं.त्यामागे अर्थातच या मतदारसंघातील बहुसंख्य असणाऱ्या अगसिया समुदायाच्या मतांचाच विचार करण्यात आला होता. पण भाजपची ही गणितं फसली आणि छत्तीसगडच्या भाजपच्या बुडालेल्या नौकेत ओ.पी. चौधरी यांना देखील पराभव स्वीकारावा लागला.

पराभूत होऊनही प्रसंगावधान दाखवल्यामुळे हिंसक घटना टळली

निकालसमोर आल्यानंतर ज्यावेळी उमेश पटेल आणि ओ.पी. चौधरी एकमेकांच्या समोर आले त्यावेळी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधी पोलिसांनी कार्यकर्त्यांना नियंत्रित करण्याचे प्रयत्न केले.

त्यानंतर चौधरी यांच्या समर्थकांनी देखील पटेल यांच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. आता वातावरण चिघळणार आणि दोन गटात हिंसक वाद उद्भवणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

अशावेळी अधिकारी म्हणून काम केलेल्या चौधरी यांनी प्रसंगावधान दाखवत पटेल यांना मिठी मारून त्यांचं विजयाबद्दल अभिनंदनकेलं. त्यांच्या या कृतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये जायचा तो संदेश गेला आणि वातावरण तापण्याआधीच थंड झालं. संभाव्य हिंसक घटना टळल्यामुळे पोलिसांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला.  

Leave A Reply

Your email address will not be published.