आपल्या पानपट्टीवर आलेला तो म्हातारा अंतराळवीर राकेश शर्मा आहे म्हणल्यानंतर त्यांना पटलं नाही

अहमदाबाद शहरात एक पानवाला आहे. 2010 साली तो पानवाला चर्चेत आला होता. त्याच कारण काय तर भारताचे अंतराळवीर म्हणून ज्यांचा गौरव करण्यात येतो ते राकेश शर्मा खास त्याला भेटण्यासाठी अहमदाबादला आले होते. कुठे अंतराळवीर राकेश शर्मा आणि कुठे अहमदाबादमधल्या एका गल्लीत राहणारा साधा पानवाला. माध्यमांच्या दृष्टीकोनातून ही मोठी बातमी होती. माध्यमांनी तात्काळ त्यांची माहिती घेतली. सुरवातीला वाटलं कोणत्यातरी काळात किंवा कधीतरी हे दोघे मित्र देखील असतील पण माध्यमांनी जेव्हा त्याच्याशी संवाद साधला तेव्हा एका अनोख्या नात्याची ओळख सर्वांना झाली.

त्याच नाव किशन सिंग चौहान. भारतामार्फत पहिल्यांदा अतंराळात जाण्याचा मान राकेश शर्मा यांना मिळाला होता. राकेश शर्मांना इंदिरा गांधीनी विचारलं होतं की अंतराळातून भारत कसा दिसतो. तेव्हा राकेश शर्मा म्हणाले होते.

सारे जहां से अच्छा हिंदूस्ता हमारा. 

त्यांच्या या कर्तृत्वाची मोहोर साऱ्याच भारतीयांवर उमटली होती. प्रत्येक भारतीयाला त्यांच्याबद्दल अभिमान वाटत होता. असाच अभिमान अहमदाबादच्या किशन सिंग चौहान यांना देखील वाटलां. 

ते राकेश शर्मांचे फॅन झाले होते. आपलं प्रेम राकेश शर्मांना कसं कळेल याच्या विचारातच ते असायचे. त्यांच्यासोबत संपर्क करण्याचं कोणतच माध्यम पानवाल्याकडे असण्याची शक्यता नव्हती. शेवटी धाडस करुन त्यांनी राकेश शर्मा यांच्या नावावर एक पत्र लिहलं. पण मुख्य प्रश्न हा होता की, ते पत्र कोणत्या पत्त्यावर पाठवायचं.

पत्ता न मिळाल्याने किशनसिंग चौहान यांनी ते पत्र थेट भारतीय वायु सेनेच्या मुख्य कार्यालयाच्या पत्यावर पाठवलं. राकेश शर्मांसाठी असा उल्लेख त्या पत्यावर करण्यात आला होता. भारतीय वायु सेनेच्या मुख्य कार्यालयात आलेले ते पत्र अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे राकेश शर्मांपर्यन्त पोहचलं.

त्यात लिहलं होतं की त्याची देखील वैमानिक होण्याची इच्छा होती पण घरच्या परिस्थितीमुळे त्याला वैमानिक होता आलं नाही. पण राकेश शर्मांच्या कामगिरीमुळे त्याला स्वत:ला वैमानिक झाल्याचा आनंद मिळाला होता.

राकेश शर्मांनी ते पत्र वाचलं आणि वेळ न घालवता लगेच त्याला पत्र लिहलं. त्यानंतर पत्र आणि त्यांना उत्तर असा सिलसिला सुरू झाला. 

ते राकेश शर्मांना वर्षातून तीन पत्र पाठवू लागले. पहिलं पत्र नविन वर्षाच्या शुभेच्छा देणारं, दूसरं पत्र राकेश शर्मां अंतराळात गेले होते त्या दिवशी आणि तिसरं पत्र त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने.

हा सिलसिला गेली कित्येक वर्ष असाच सुरू राहिला. आणि अचानक एके दिवशी एका पानवाल्याची चौकशी करत एक वृद्धगृहस्थ पानवाल्यासमोर उभा राहिले. ते राकेश शर्मा होते. पानवालाने त्यांना पाहताच ओळखलं. इतका मोठा माणूस पत्ता शोधत घरी आलेला पाहून त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.

पत्रकारांसाठी देखील ही विशेष गोष्ट होती. पत्रकारांनी जेव्हा राकेश शर्मांना या गोष्टीबाबत विचारलं होतं तेव्हा ते म्हणाले होते, 

“और किसी को मेरे अंतरिक्ष यात्रा से आने की तारीख़ याद रहे न रहे, पर मुझे पता है कि यह दिन मुझे और किशन को हमेशा याद रहता है।”

त्या पहिल्या पत्रापासून ते २०१० साली झालेल्या पहिल्या भेटीपर्यन्त ते पुढे आजतागायत एक पानवाला आणि भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यातला संवाद असाच चालू आहे. म्हणूनच आपण अंतराळातून न पहाता देखील गर्वाने म्हणून शकतो, सारे जहां से अच्छा हिंदूस्ता हमारा.

हे ही वाचा भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.