वाजपेयी मराठीत म्हणाले, तुम्हीच शिंदे-होळकर तिकडे पाठवले आम्हाला मराठी शिकवायला 

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले होते. पुण्यातल्या सभेची सुरवात त्यांनी मराठीतून केली. नरेंद्र मोदी ज्या राज्यात जातात त्या राज्यात तिथल्या मातृभाषेतून आपल्या भाषणाची सुरवात करतात. मोदींना अस्खलित मराठी भाषेत बोलता येत नसले तरी त्यांना कमीअधिक प्रमाणात मराठी बोलता येत असेल याची जाणिव मात्र अशी भाषणे पाहून होतं असतात. 

पण इथे विषय मोदींचा नाही तर तो आहे अटलबिहारी वाजपेयी यांचा. वाजपेयींना शुद्ध मराठीत बोलता यायचं. मराठी वाचता देखील यायचं. याबद्दलच जेष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांना आलेला अनुभव त्यांनी एका वर्तमानपत्रात मांडला होता. 

त्यांनी लिहलेला तो प्रसंग पुण्याचा होता व तो काळ लोकसभा निवडणूकांचा होता.

लोकसभा निवडणूकांच्या प्रचारासाठी अटलबिहारी वाजपेयी यांचा महाराष्ट्र दौरा ठरलेला. आदल्या दिवशी त्यांची पुण्यात जंगी सभा झाली होती व दूसऱ्या दिवशीच्या सकाळी पुण्यातील काही पत्रकारांसोबत गप्पा मारून त्यांचा धुळे, औरंगाबाद असा दौरा ठरलेला असतो. 

या दौऱ्यात तेव्हा वाजपेयी यांच्यासोबत काही पत्रकार देखील होते. त्यामध्ये प्रकाश अकोलकर आणि कलकत्ता येथील टेलिग्राफच्या उल्का भडकमकर देखील होत्या. हे दोन्हीही पत्रकार वाजपेयी यांच्यासोबत छोट्याश्या विमानातून पुणे-धुळे-औरंगाबाद असा दौरा करणार होते.  

या प्रवासाबद्दल प्रकाश अकोलकर यांनी लिहलेलं आहे की, 

“विमान अगदीच छोटेखानी असतं. अवघ्या सात वा नऊ सीट्‍स असतात. मध्ये एक माणूस जेमतेम जाईल एवढंच अंतर. पलीकडच्या सीटवर साक्षात वाजपेयी. त्यांचा ‘ऑरा’ इतका विलक्षण असतो, ते इतक्या शेजारी असतानाही त्यांना काही विचारावं, याचंही भान राहत नाही. विमान धुळ्याच्या दिशेनं झेप घेतं आणि वाजपेयी पुण्यातली मराठी वर्तमानपत्रं बाहेर काढतात. 

पहिल्याच पानावर साहजिकच त्यांच्या आदल्या रात्रीच्या सभेचा, गर्दीचा वृत्तांत फोटोसह छापून आलेला असतो. वाजपेयी अगदी बारकाईनं सगळे मराठी पेपर तपशिलात वाचत असतात. अगदी शेवटी पान अमुक पहा, असं आलं की त्या पानावरही जाऊन…”

वाजपेयी मराठी वर्तमानपत्रातील इत्यंभूत बातमी वाचत असल्याचं प्रकाश अकोलकर यांच्या नजरेतून सुटलं नाही. पुढे विमान धुळ्यात उतरतं, तिथल्या सभेनंतर औरंगाबाद येथे जातं. औरंगाबाद पासून ५०-६० किलोमीटरवर असणाऱ्या सभेसाठी जात असताना वाजपेयी यांच्यासोबत गाडीतून प्रवास करण्याची संधी प्रकाश अकोलकर आणि उल्का भडकमकर यांना मिळाली. 

आत्ता मुलाखत सुरू करायची होती. साहजिक सकाळी विमानात अगदी लक्षपूर्वक मराठी बातम्या वाचणारे अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमा प्रकाश अकोलकर यांच्या नजरेतून गेली नव्हती. बोलायला सुरवात करायची म्हणून अकोलकर म्हणाले,

तुम्ही सगळी मराठी वर्तमानपत्र अगदी बारकाईनं वाचत होतात.. नेमकं पुढच्या पानावर जात होतात… 

प्रकाश अकोलकर यांनी हिंदीतूनच हा प्रश्न वाजपेयींना विचारलं तेव्हा अटल बिहारी वाजपेयी अगदी अस्खलीत मराठीत म्हणाले,

अहो तुम्हीच ते शिंदे होळकर तिकडे पाठवले नव्हते का आम्हाला मराठी शिकवायला..!!! 

अस बोलून वाजपेयी दिलखुलास हसले…

इतकच नाही तर अकोलकर लिहतात की पुढची तासभराची मुलाखत त्यांनी मराठीतच दिली. ते सांगतात वाजपेयी मुंबईत उतरल्यावर मांटुग्यात गोयल कुटूंबाकडे मुक्काम करायचे या काळात ते बरेच मराठी नाटक पहायचे. सख्खे शेजारी हे नाटक त्यांना प्रचंड आवडायचं तर हमाल दे धमाल हा मराठी पिक्चर पहाताना ते पार रंगून जात असत. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.