अटलजींनी आपली पहिली निवडणूक थेट नेहरू गांधी घराण्याविरुद्ध लढवली होती
अटल बिहारी वाजपेयी. भारतीय राजकारणातील मात्तबर नेते. त्याचं नाव म्हंटल कि, समर्थकांबरोबर विरोधकही सहमत असल्याचे. भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार अटलजींच्या शिकवणीने आजही भाजप पक्ष काम करत आहे.
आता त्यांच्या आयुष्याचे, राजकारणाचे, निवडणुकांचे अनेक किस्से आपण पहिले आहेत. असाच एक किस्सा त्यांचा नेहरूंविरुद्धच्या निवडणुकीचा.
डोग्रा अध्यक्ष असतानाच अचानक एका लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली, ही प्रतिष्ठित निवडणूक होणार होती, उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये. पंतप्रधान नेहरू यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित या १९५२मध्ये लखनऊमधून लोकसभेवर गेल्या होत्या. पण १९५५ मध्ये नेहरूंनी आपल्या धाकट्या बहिणीला सोव्हिएत युनियनमध्ये भारताच्या राजदूत म्हणून पाठवले.
स्वाभाविकच विजयालक्ष्मींनी खासदारकीचा राजीनामा दिला. लखनऊची जागा रिकामी झाली. निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली.
ही घोषणा होताच पंडित दीनदयाळ यांनी अटलजींना तातडीने बोलावून घेतले. “लखनऊची पोटनिवडणूक आपण लढवायला हवी,” असे दीनदयाळ म्हणाले. ते तेवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी अटलजींना ही निवडणूक लढवण्याचा जणू आदेश दिला. अटलजींना हे पूर्णपणे अनपेक्षित होते.
पक्षात अनेक ज्येष्ठ नेते होते. पण अटलजींसाठी पंडित दीनदयाळांचा आदेश म्हणजे अखेरचा शब्द असे. त्यांनी लगेच अर्ज भरण्याची तसेच प्रचाराची तयारी चालू केली.
अटलजी तेव्हा होते ३१ वर्षांचे. आधी कोणतीही निवडणूक लढवलेली नव्हती. अटलजी पुढे म्हणायचे, “मला पालिका, महापालिका, विधानसभा यांच्या निवडणुकीचा काहीच अनुभव नाही; कारण मी पहिलीच निवडणूक लढवली ती थेट लोकसभेची..” त्यांच्या या सांगण्यात विनय असे. पक्षाच्या नेत्यांनी आणि विशेषतः दीनंदयाळांनी त्यांचे मूल्य बरोबर ओळखले होते. हा मोहरा लोकसभा सोडून इतरछोट्या ठिकाणी पणाला लावायचा नाही. हे त्यांनी ठरवले असावे.
लखनऊच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अटलजींनी उमदेवारी अर्ज सादर केला. पण प्रचारासाठी जवळ पैसा कुठे होता? जिवाला जीव देणारे अनेक साथीदार असले, तरी पक्षाच्या तिजोरीत होता खडखडाट! एरवी पक्षाचे काम करण्यासाठी जिथे मुक्काम असेल, त्या गावात कधीही सायकलवर टांग मारून जाण्याची अटलजींची सवय. धर्मशाळेपासून कोणत्याही स्वयंसेवकाच्या घराच्या ओसरीवर रात्री अंग टाकण्याचा रिवाज.
आणि आता समोरचे आव्हान खुद्द नेहरूच्या घराण्यातून उभे राहणारे होते. राजीनामा दिलेल्या खासदार तर नेहरू कुटुंबातल्या होत्याच; शिवाय पंतप्रधानांनी या पोटनिवडणुकीची उमेदवारी दिली, त्या शिवराजवतीही नेहरू कुटुंबातीलच होत्या. त्या होत्या, मूळ अलीगढच्या. मोतीलाल नेहरू यांचे पुतणे किशनलाल नेहरू यांच्या त्या पत्नी.
स्वातंत्र्य मिळून केवळ आठ वर्षे झाली होती. देशभर घुमणारा काँग्रेसचा अविरत जयकार उणावला असला, तरी संपला नव्हता. त्यात ‘राजघराण्यातील उमेदवार निवडून देणारा कॉँग्रेसचा हा हक्काचा लखनऊ मतदारसंघ. जवाहरलाल नेहरूंचे तर लखनऊवर जा जातीने लक्ष आणि त्यातून विशेष प्रेम. त्यातून वहिनी उमेदवार!
असा सर्वार्थाने विपरीत माहोल असताना ३१ वर्षांचा अटलबिहारी वाजपेयी नावाचा हा तरुण कार्यकर्ता नेत्याने आदेश दिला म्हणून उमेदवारी अर्ज भरायला गेला, बिनधास्त रणांगणात उतरला. अनामत रक्कमही मित्रांनी गोळा केली. ती परत मिळण्यापेक्षा जप्त होण्याची शक्यता अधिक होती. अनामत रक्कमच जर वाचणार नव्हती, तर रोजच्या प्रचाराला पैसा आणि गाडीघोडे पुरवणार तरी कोण? शिवराजवती नेहरू यांच्यासारख्या संपन्न उमेदवारासमोर ओढगस्तीचा राजकीय संसार करणाऱ्यांचा निभाव लागणार तरी कसा?
पण या समस्यांचा बाऊ न करता अटलजी तडक प्रचाराला भिडले. लखनऊ मध्ये कोपऱ्याकोपऱ्यावर सभा घेऊ लागले. या सभा घणाघातांनी गाजवू लागले. जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे पोलीस कोठडीतील संशयास्पद निधन, सरदार वर्लभभाई पटेल यांच्या निधनानंतर नेहरू सरकारने पाकिस्तानशी असलेल्या संबंधांत घेतलेली नरमाईची भूमिका, भारताच्या विरोधाची पर्वा न करता चीनने तिबेट पुरता गिळंकृत करण्यासाठी केलेली घुसखोरी, पहिल्या पंचवार्षिक योजनेतील अनेक त्रुटी… अशा अनेक विषयांचा अभ्यासपूर्ण समाचार घेत अटलजी सरकारवर आणि पंतप्रधान नेहरूंवरही सुसंस्कृत शब्दांत टीकेची झोड उठवत. शिवराजवती यांच्यावर टीका करण्यासारखे तर काही नव्हतेच. त्या निव्वळ एक प्यादे होत्या.
अटलजीच्या या आक्रमक आणि झंझावाती प्रचाराची खबर पंडितजींच्या कानावर गेली. अटलजींनी प्रचाराचा इतका मोठा माहोल उभा केला की, एका महिन्यात त्यांनी दीडशेहन अधिक सभा घेतल्या. एखाद्या सभेत ध्वनिक्षेपकाची सोय नसेल तर शेवटच्या श्रोत्याला ऐकू जावे, यासाठी उंच आवाजात बोलावे लागे. घशाला कोरड पडे. कधी कधीं आवाज बसे, काही सभांमध्ये वक्त्याच्या डोक्यावर छप्परही नसे. उन्हाचा तडाखा झेलत सरकारचा पंचनामा करावा लागे.
समजा, आपला पराभव व्हायचाच असेल, तर जनसंघाच्या प्रचाराची आतही संधी का सोडावी? असा विचार अटलजींनी केला. हाच विचार पंडित दीनदयाळांनीही केला होता. या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने नेहरू सरकारचे अपयश जनतेसमोर मांडता येत होते, हा त्यांच्या दृष्टीने समाधानाचा भाग होता.
अटलजींच्या नेतृत्वाची चुणूक म्हणजे या पहिल्याच निवडणुकीत प्रत्येक भाषणात ते राष्ट्रीय प्रश्नांची चर्चा करीत. सोप्या भाषेत परराष्ट्र धोरणावरील जनसंघाचे आक्षेप समजावून सांगत. त्यांच्या भाषणात जशी व्यक्तिगत टीका नसे, तसा स्थानिक समस्यांचा अतिरेकी बाऊ नसे. आपल्या प्रचाराची पातळी कायम ‘राष्ट्रीय’ ठेवायची, हे अटलजींचे खास वैशिष्ट्य या पहिल्या उमेदवारीतच सर्वांना स्पष्ट दिसले.
अटलजींच्या ओजस्वी भाषणांनी श्रोते मंत्रमुग्ध होत. कडाडून टाळी देत. अटलजींचा ओघ कानामनात साठवावा, असा असे. त्यांची राष्ट्रहिताची तळमळ अनेक सुभग शब्दालंकार लेवून वाणीतून उतरे. पाहता पाहता लखनवी आदब अंगात मुरलेल्या मतदारांना ती मनापासून आवडू लागली. लखनऊ आणि अटलजी यांच्या अनेक दशकांच्या अनोख्या नात्याची ही पायाभरणी होती.
त्यावेळी अटलजींची भाषणे ऐकण्यासाठी त्यांच्या मागोमाग या चौकातून त्या चौकात जाणाऱ्या तरुणांची टोळकी दिसू लागली. तो अटलजींच्या वक्तृत्वाच्या ‘जादूचा प्रयोग’ होता! अटलजी घराणेशाहीचा मुद्दा सडेतोड मांडत. मात्र त्यांच्या आक्रमक भाषणांनी सभ्यतेची सीमा एकदाही ओलांडली नाही. नेहरूंचा व्यक्तिगत अनादर करणारा शब्द त्यांच्या तोंडून निघाला नाही. किंबूहना ते नेहरूंवर टीका करण्यापूर्वी त्यांच्याबद्दलचा व्यक्तिगत आदर प्रसन्नपणे व्यक्त करीत.
अखेर मतदानाचा दिवस आला. मतमोजणी झाली. ‘निकाल’ लागला. शिवराजवती नेहरू यांनी अटलजींचा दणदणीत पराभव केला होता. अटलजींना एकूण मतदानातील केवळ २८ टक्के मते मिळाली. ही दुसऱ्या क्रमाकाची मते होती. तरी अटलजींनी मित्रांकडून जमवलेली अनामत रक्कम सरकारी तिजोरीत जमा झालीच!
हे ही वाचं भिडू :
- एका भाषणामुळे अटल बिहारी वाजपेयी यांच मंदिर बांधण्यात आलं.
- गांधी टोपीवाल्या विखेंना पाहून त्यांना वाटायचं, अटलजींनी हा कसला अर्थमंत्री दिलाय
- मोदी अमेरिकेत इंग्लिशचा कोर्स करायला आलेले. अटलजी म्हणाले,परत चला