वाजपेयींच्या काळात सर्वात मोठी ‘हायवे क्रांती’ झालेली.

जगातील सर्वात लांब महामार्गांपैकी एक म्हणून कोणता महामार्ग ओळखला जातो माहितीये का ?   चतुर्भुज महामार्ग असं त्याचं उत्तर आहे. 

म्हणजेच आज दिल्ली- मुंबई- चेन्नई- आणि कोलकता या मोठं-मोठ्या महानगरांना जोडणारा एक भाव दिव्य प्रकल्प बघितला तर मनात असा विचार येतोच ज्यांनी कुणी मनावर घेऊन हा प्रोजेक्ट पार पडला त्यामुळे सगळंच बदलून गेलं. देशातील उद्योगधंदे आणि लोकांचा सुरळीत अन सहज होणारा प्रवास या सगळ्यांचं श्रेय जातं ते अटलबिहारी वाजपेयी यांना !!

एनडीए सरकारच्या यशांपैकी एक म्हणजे ५८४६ किमीचा गोल्डन चतुर्भुज महामार्ग. हे जगातील सर्वात लांब महामार्गांपैकी एक म्हणून ओळखले जाते. हे मुळात महामार्गांचे जाळे आहे जे देशाच्या चार प्रमुख महानगरांना चार दिशांनी जोडते – दिल्ली (उत्तर), चेन्नई (दक्षिण), कोलकाता (पूर्व) आणि मुंबई (पश्चिम) – ज्यामुळे एक चतुर्भुज तयार होतो आणि म्हणूनच त्याला नाव देखील सुवर्ण चतुर्भुज असे दिले आहे.

१९९८ साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राष्ट्रीय विकास महामार्गाच्या विकासाची योजना हाती घेतली व त्यानुसार ६ जानेवारी, १९९९ रोजी सुवर्ण-चतुष्कोन प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करून ही महत्त्वाकांक्षी योजना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांद्वारे कार्यान्वित करण्यास सुरुवात केली.

१९९० नंतरच्या जागतिकीकरणाच्या काळात जागतिक स्तरावर स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाल्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाची परिमाणं बदलली. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या संधींचा लाभ घेऊन देशाच्या आर्थिक विकासाचा दर उंचावण्याच्या दृष्टीने वीज, पाणी, दळणवळण, दूरसंचार अशा पायाभूत सुविधांचा विकास आवश्यक बनला. 

याच उद्देशाने, १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राष्ट्रीय महामार्गांच्या विकासाची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली. 

या योजनेमध्ये देशातील नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई व कोलकाता या प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या ‘सुवर्ण चतुष्कोन’ प्रकल्पाचा, तसंच देशाच्या उत्तर व दक्षिण आणि पूर्व व पश्चिम भागांना जोडणारे दोन महामार्ग विकसित करण्याच्या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला. याशिवाय, देशातील महत्त्वाच्या बंदरांपर्यंत जलद वाहतुकीच्या सोयीसाठी महामार्गांच्या विकासाचाही या योजनेमध्ये अंतर्भाव करण्यात आला. या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सोपवण्यात आली.

दहा वर्षांत ‘हायवे क्रांती’ नेमकी कशी घडली ??

या प्रकल्पामध्ये देशातील चार प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या एकूण ५८४६ कि.मी. लांबीच्या महामार्गांचे चौपदरी व सहापदरी द्रुतगती महामार्गामध्ये रूपांतर करण्याचे आराखडे तयार करण्यात येऊन डिसेंबर २००० पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. या प्रकल्पामध्ये दिल्ली कोलकाता (राष्ट्रीय महामार्ग क्र. २), कोलकाता-चेन्नई (राष्ट्रीय महामार्ग क्र. ५), चेन्नई – मुंबई (राष्ट्रीय महामार्ग क्र ४, ७ व ४६) व मुंबई-दिल्ली (राष्ट्रीय महामार्ग क्र. ८) या महामार्गांचा समावेश करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ चा एक भाग असलेल्या मुंबई-पुणे सहापदरी द्रुतगती महामार्गाचाही अंतर्भाव या प्रकल्पामध्ये करण्यात आला. 

सुवर्ण चतुर्भुज भारतातील १३ राज्यांमधून जातो.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, जानेवारी २००८ पर्यंत या प्रकल्पाचं सुमारे ९७ टक्के काम पूर्ण झालं. 

आसाममधील सिल्चर व गुजरातमधील पोरबंदर यांना जोडणाऱ्या पूर्व-पश्चिम, आणि जम्मू काश्मीरमधील श्रीनगर व तामिळनाडूतील कन्याकुमारी यांना जोडणाऱ्या उत्तर-दक्षिण महामार्गांच्या कामालाही डिसेंबर २००० मध्ये सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, जानेवारी २००८पर्यंत एकूण ७३०० कि.मी. लांबीच्या या महामार्गांचं सुमारे २५ टक्के काम पूर्ण झालं. याशिवाय, सुमारे १३०० कि.मी. लांबीच्या महत्त्वाच्या बंदरांना जोडणाऱ्या तसंच इतर महामार्गांच्या विकासाच्या कामालाही डिसेंबर २००० मध्ये सुरुवात करण्यात आली.

या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये चार प्रमुख महानगरांसह देशाच्या सर्व भागातील अनेक लहान-मोठी शहरं परस्परांशी जोडली गेल्यामुळे प्रादेशिक स्तरावर औद्योगिक विकासाला गती मिळाली. 

त्याचप्रमाणे शेतीमालाच्या देशांतर्गत बाजारपेठेच्या विस्ताराला तसंच परदेशात निर्यातीलाही चालना मिळाली. या योजनेमुळे सिमेंट व स्टील उद्योगांमध्ये उत्पादनवाढीला जसं प्रोत्साहन मिळालं, तसंच रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या. एकूणच देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरली. 

पुढे २००५ मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने या योजनेचा आणखी विस्तार केला. 

त्यामध्ये सुमारे १२००० कि.मी. लांबीच्या महामार्गांचं चौपदरीकरण, तसंच सुमारे २००००कि.मी. लांबीच्या महामार्गांच्या दुपदरीकरणाचा समावेश करण्यात आला. याशिवाय नोव्हेंबर २००६ मध्ये सुवर्ण चतुष्कोन योजनेतील महामार्गांसह सुमारे ६५०० कि.मी. लांबीच्या महामार्गांचं सहापदरीकरण, तसंच सुमारे १००० कि.मी. लांबीच्या नव्या द्रुतगती महामार्गांची (एक्स्प्रेस हायवे) निर्मिती या प्रकल्पांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला.

तर हा जगातील पाचवा सर्वात लांब महामार्ग प्रकल्प आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.