अटलजी म्हणाले होते, “मी आतून पण हिंदू आहे आणि बाहेरून सुद्धा”

अयोध्येतील रामजन्मभूमी जागेचा प्रश्न सुटला आहे. पण या मुद्द्यावरून संसदेपासून रस्त्यापर्यंत देशात जोरदार चर्चा घडल्या आहेत. संसदेत जेव्हा जेव्हा आयोध्येतील राम मंदिराची चर्चा होते तेव्हा देश श्वास रोखून ऐकत असे.

त्याकाळी असं म्हटलं जायचं कि अयोध्येच आंदोलन हे लालकृष्ण अडवाणींनी उभं केलं होत पण वाजपेयींचा त्याला पाठिंबा नव्हता. वाजपेयी बाबरी मशीद पाडण्याच्या विरोधात होते असं हि बोललं जायचं. पण वाजपेयींनी जाहीर रित्या आपली भूमिका कधी मांडली नव्हती. विशेषतः पंतप्रधान झाल्यावर तर त्यांनी या वादग्रस्त विषयाला अनेकदा बदल दिला होता.

खरे तर देशात खळबळ माजवणाऱ्या रामजन्मभूमीवर अटलजींना काहीतरी बोलावे, यासाठी विरोधी पक्षाचे खासदार प्रयत्नशील होते, पण अटलजींनी प्रश्न उपस्थितीत करणाऱ्या विरोधकांना असे काही सांगितले की, त्यांना यावर आता काय प्रतिक्रिया द्यावी हेही समजले नाही.

तर गोष्ट आहे  १६ मार्च २००२ ची.

तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे १६ मार्च २००२ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार  लोकसभेत आयोध्येतील परिस्थितीवर उत्तर देत होते. त्यांच्या भाषणापूर्वी काँग्रेस, डावे आणि इतर विरोधी पक्षातील खासदार अटलजींवर दबाव आणण्यासाठी अनेक प्रश्न उपस्थित करत होते.

‘पंतप्रधान राहण्यासाठी वाजपेयी हे बाहेरून धर्मनिरपेक्ष प्रतिमा ठेवतात, पण आतून हिंदू संघटनांना पाठिंबा देतात’, असे विरोधी पक्षातील काही खासदारांनी अटल बिहारी वाजपेयी  यांच्यावर हल्लाबोल केला होता.  विरोधी खासदारांच्या आरोपां नंतर वाजपेयी उभे राहिले.

वाजपेयी यांचे भाषेवर उत्तम प्रभुत्व होते. ते बोलायला उभे राहिले तर सर्व सभागृह लक्ष देऊन ऐकत असे. यावेळची तर परिस्थिती ही जरा वेगळी होती. यावेळी वाजपेयी यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यात येत होती. अशावेळी शांत बसतील ते अटलबिहारी वाजपेयी कसले.

उत्तर देण्यासाठी वाजपेयी उभे राहिल्यावर सभागृहात शांतता पसरली होती. ते म्हणाले- ‘जे लोक माझ्यावर फक्त बाहेरून धर्मनिरपेक्ष असल्याचा आरोप करत आहेत, कृपया मला समजावून सांगा की, विचार प्रक्रियेत आत आणि बाहेर काय असते? यावेळी सभागृहात संपूर्ण शांतता पसरली.

वाजपेयी पुन्हा म्हणाले – ‘मी आतून हिंदू आहे आणि बाहेरूनही. हिंदुत्व हे माझे जीवन आहे आणि ती माझी संस्कृती, माझी मूल्ये आहेत. मी आतून कोण आणि बाहेरून कोण हे कोणी ठरवेलच कसं!” त्याच्या कडक स्वराने सभागृहातली शांतता आणखीनच गडद झाली.

सर्वजण शांत झाल्यावर अटलजी आपल्या नम्रपणे म्हणाले – ‘धर्मनिरपेक्षता म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी हिंदू धर्मातून शिकावे. या जगात सनातन धर्मापेक्षा धर्मनिरपेक्ष कोणी नाही. हेच प्रत्येकाला स्वतःमध्ये घेते. आणि तुम्ही आम्हाला धर्मनिरपेक्षतेचा धडा शिकवत आहात.

अयोध्येच्या प्रश्नावर आणि आपल्या हिंदुत्वावर वाजपेयींनी स्पष्ट भूमिका मांडली आणि इतकी वर्षे सुरु असलेल्या वादावर कायमचा पडदा टाकला. ते धर्मनिरपेक्ष विचारांचे पुरस्कर्ते होतेच पण त्यासाठी हिंदुत्वाची कास त्यांनी सोडली नव्हती.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.