अटलजी खामगाव बँकेच्या चेअरमनला म्हणाले, “आमच्या पक्षाला कर्ज देणार काय ?”

महाराष्ट्राच्या विधानसभेत डोक्यावर गांधी टोपी घालणारे फारच थोडे नेते शिल्लक आहेत. यातच समावेश होतो हरिभाऊ बागडे यांचा.शेठजी आणि भटजींचा पक्ष म्हणवल्या जाणाऱ्या भाजपचा बहुजन चेहरा. पक्षाला तळागाळात पोहचवण्यात त्यांचाही मोठा वाटा आहे. त्यांच्या जेष्ठत्वामुळे विधानसभाध्यक्ष बनण्याचा मान त्यांना मिळाला होता.

आणीबाणीच्या काळात कारावास सहन करून आलेल्या हरिभाऊ बागडे यांचा राष्ट्रीय पातळीवरील अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांशी चांगला संपर्क होता.

१९८५ साली औरंगाबाद  जिल्ह्यात त्यांनी आमदारकी पहिल्यांदा जिंकली होती. त्याकाळी मोठा दुष्काळ पडल्यामुळे अटलजी मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार होते. कानाकोपऱ्यातल्या गावात त्यांना पाहणी करायची होती. जळगावमार्गे ते औरंगाबादला आले. 

हरिभाऊ बागडे यांनी त्यांना मजूर पाझर तलावावर कसे काम करतात दाखवायला नायगाव येथे घेऊन जायचं ठरवलं. अटलजी ज्या अँबेसेडरने आले होते ती गाडी तिथे पोहचण्याची शक्यता नव्हती.

त्याकाळात भाजप एक छोटा पक्ष होता. आजच्याप्रमाणे त्यांच्याकडे साधनसंपत्तीचे मोठेपाठबळ नव्हते. दोन खासदार उरलेला हा पक्ष शून्यापासून पुन्हा सुरवात करत होता.    

हरिभाऊ बागडे आमदार होते मात्र त्यांच्याजवळ देखील कार नव्हती. सरकारसुद्धा त्याकाळी आमदारांना कार देऊ शकत नव्हतं. म्हणूनच महिन्यातून पंधरा दिवस बीडीओ, तहसीलदार, अभियंत्याची गाडी त्यांना वापरायला लागायची.

अशाच एका गाडीतून स्वतः सारथ्य करत बागडे अटलजींसोबत नायगावच्या पाझर तलावावर गेले. तिथल्या दुष्काळी कामाची पाहणी केली. वाजपेयींनी मजुरांशी गप्पा मारल्या. त्या मजुरांनी त्यांना मिळालेला निकृष्ट प्रतीचा गहू दाखवला. अटलजी तो गहू घेऊन औरंगाबादला आले. पत्रकार परिषदेत या प्रश्नाला वाचा फोडली. प्रशासनाने तातडीने तो गहू बदलून दिला.

एकदा मात्र हरिभाऊ बागडे यांना अटलजींच्या मिश्किल स्वभावाची ओळख करून देणारा एक गंमतीदार किस्सा घडला.

बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव अरबन बँकेच्या उद्धघाटनाचा सोहळा होता. प्रमुख पाहुणे म्हणून अटलजींना निमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमाला जाण्यासाठी हरिभाऊ बागडे आणि डॉ. विजय मेहेर सोबत होते. अँबेसेडरमधून ते सगळे खामगावला निघाले. एकेठिकाणी जोरदार पावसामुळे ओढा ओसंडून वाहत होता. थोडावेळ तिथे थांबून पाणी ओसरल्यावर मग त्यांनी तिथून गाडी काढली.   

खामगाव बँकेची फित अटलजींनी कापली व बँकेचे उदघाटन केले. बँक पाहण्यासाठी जेव्हा अटलजी निघाले तेव्हा बँकेचे चेअरमन सुद्धा सोबत होते. जिना चढत असताना अटलजींनी त्यांना खोडकरपणे एक प्रश्न विचारला,

“चेअरमन साब क्या आपकी बँक हमारी पार्टी को कर्ज देगी क्या ? “

यावर चेअरमन यांनी थोडावेळ विचार केला आणि नाही म्हणून उत्तर दिलं. भाजपची तेव्हाची आर्थिक व राजकीय स्थितीकडे बघून चेअरमन साहेब तस म्हणाले होते का माहित नाही पण अटलजी मात्र यावर दिलखुलासपण हसले. चेअरमनच्या पाठीवर थाप देत आपल्या स्टाईल मध्ये बराबर है असं म्हणाले.

आजही हरिभाऊ बागडे आपल्या भाषणात हा किस्सा आवर्जून सांगतात. अटलबिहारी वाजपेयी हे अजातशत्रू व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या या हजरजबाबी व जिंदादिल स्वभावामुळे खेडोपाड्यातले लोक त्यांच्यावर प्रेम करायचे आणि भारतीय जनता पार्टीशी जोडले जायचे.

हे हि वाच भिडू.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.