१३ दिवसांचे पंतप्रधान वाजपेयी म्हणाले, ‘अशा सत्तेला मी चिमट्याने सुद्धा शिवणार नाही’

वर्ष १९९६. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप ‘सिंगल लार्गेस्ट पार्टी’ म्हणून समोर आली होती. भाजपला लोकसभेच्या १६१ जागांवर विजय मिळाला होता, तर १४० जागांसह काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती. जनता दल आणि डाव्या पक्षांकडे मिळून साधारणतः १२३ जागा होत्या.

कुठलाही पक्ष किंवा पक्ष समूहाकडे सरकार स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या बहुमताच्या आकड्यापर्यंत जाणारं संख्याबळ नव्हतं. त्यामुळे तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी जनता दल आणि डाव्या पक्षांना सरकार स्थापनेसाठी काँग्रेसच्या पाठींब्याचं पत्र सादर करण्यास सांगितलं होतं,

परंतु त्यांनी हे पत्र सादर करण्यापूर्वीच राष्ट्रपतींनी ‘सिंगल लार्गेस्ट पार्टी’ या नात्याने  भाजपला सत्तास्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं.

खरं तर भाजप देखील सत्तास्थापनेच्या परिस्थितीत नव्हता. आपल्या मित्रपक्षांसह भाजपचा आकडा फक्त १९४ जागांपर्यंतच जात होता. हा आकडा बहुमताच्या २७२ या जादुई आकड्यापासून किती तरी दूर होता. असं असतानाही भाजपने राष्ट्रपतींच्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाचा स्वीकार केला.

देशात प्रथमच अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचं सरकार स्थापन झालं.

१२ वर्षांत म्हणजे १९८४ च्या निवडणुकीत केवळ २ जागांवर असणारा पक्ष सत्तेत आला होता.

शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपतींनी बहुमत सिद्ध करण्यासाठी अटल बिहारी वाजपेयींना १३ दिवसांचा वेळ दिला होता. त्यामुळे आता पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि भाजपसमोर प्रश्न होता की, संसदेत बहुमत कसं सिद्ध करायचं..? कारण २७२ खासदारांचा पाठींबा मिळवणं,  हे जवळजवळ अशक्यच होतं.

११ व्या दिवशी संसदेत विश्वास दर्शक ठराव मांडण्यात आला. जवळपास ३ दिवस विश्वास मत प्रस्तावावर चर्चा झाली. सरकार स्थापनेसाठी आवश्यक ते संख्याबळ जवळ नसताना देखील वाजपेयींनी घेतलेल्या सत्ता स्थापनेच्या निर्णयावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली.

आता उत्तर देण्याची वेळ अटलजींची होती. पहिल्यांदाच लोकसभेचे लाईव टेलीकास्ट चालू होत. संपूर्ण देश अटलजींना ऐकत होता. वाजपेयी म्हणाले,

माझ्यावर आरोप लावले गेले की, मला सत्तेचा लोभ आहे. मागच्या १२ दिवसात जे केले ते सत्तेच्या मोहापायी केले, मी मागच्या ४० वर्षांपासून सदनात आहे. सगळ्यांनी माझं आचरण बघितले आहे. कधीच सत्तेच्या मोहापायी चुकीचं काम केलेलं नाही.

वायपेयी यांनी नेता म्हणून त्यांचं कौतुक आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाला नाव ठेवणाऱ्या विरोधकांना फैलावर घेत म्हणाले,

‘बार बार सुना वाजपेयी तो अच्छा है लेकिन पार्टी अच्छी नही है. अच्छा तो अच्छे वाजपेयी का आप क्या करने का इरादा रखते हैं.’

वाजपेयी यांनी असा प्रश्न विचारातच सगळ्या सभागृहात हशा पिकला.

पण अटलजी तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी धीर-गंभीर होत विरोधकांकडे तिरका कटाक्ष टाकला आणि म्हणाले,

‘अगर पार्टी तोड़कर सत्ता के लिए नया गठबंधन कर के सत्ता हाथ आती है तो ऐसी सत्ता को मैं चिमटे से भी छूना पसंद नही करूंगा..

भगवान राम म्हणाले होते, मी मृत्यूला नाही तर बदनामीला घाबरतो.

अटलजी १३ दिवसांमध्ये बहुमत जुळवू शकले नव्हते. विरोधकांच्या एकजुटीपुढे वाजपेयी सरकार पडणार हे आता निश्चित होत. आपल्या जवळपास १ तासाच्या भाषणामध्ये विरोधकांच्या तोडफोडीवर टीका करत वाजपेयींनी शिकवलेल्या राजकारणातील नैतिकतेच्या धड्याने सगळं सभागृह मंत्रमुग्ध झालं होतं.

अखेरीस सरकार बनवण्यासाठी विरोधकांना शुभेच्छा देत वाजपेयींनी आपल्या भाषणात म्हंटलेल्या शेवटच्या वाक्याने संपूर्ण देश आश्चर्यचकित झाला होता.

त्यांचं शेवटचं वाक्य होत,

‘आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. पुढे देखील आम्ही या देशाच्या सेवा कार्यामध्येच राहू. आम्ही संख्याबळासमोर मान झुकवतो, आणि तुम्हाला विश्वास देतो की, जे कार्य आम्ही हातात घेतलं आहे तो राष्ट्र उद्देश जो पर्यंत पूर्ण होत नाही तो पर्यंत थांबणार नाही.

अध्यक्ष महोदय मैं अपना त्यागपत्र राष्ट्रपति को देने जा रहा हूं.’

असं म्हणत विश्वास प्रस्तावावरील मतदानापूर्वीच ‘आपण राजीनामा देत असल्याची घोषणा त्यांनी केली.

बहुमताअभावी वाजपेयींचं सरकार अवघ्या १३ दिवसांत कोसळलं. पण देशातील जनतेच्या नजरेत ते नायक बनले होते. आजच्या काळातील फोडाफोडीच्या राजकारणानं डोकं वर काढलं असताना वाजपेयींनी त्यावेळी आधी १३ दिवस आणि नंतर १३ महिने असा बहुमताअभावी दोन वेळा देशाच्या सर्वोच्च पदाचा त्याग केला.

पण इतर पक्षांची फोडाफोडी करून सरकारात स्थापन करणार नाही असं ठणकावून सांगितलं आणि हेच तत्व त्यांनी अखेरपर्यंत जपलं देखील. 

अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या पाठींब्यावर १३ वेगवेगळया पक्षांच्या ‘संयुक्त मोर्चा’चं सरकार देशात स्थापन झालं. जनता दलाच्या एच.डी.देवेगौडा यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.