देशांनी मेडल जिंकायला पाठवलं ,पण खेळाडू ऑलिम्पिक,कॉमनवेल्थला गेल्यावर देश सोडून पळाले

संकेत सरगर, मीराबाई चानू, तेजस्विनी शंकर, अविनाश साबळे यांच्यासह अनेक खेळाडूंच्या स्ट्रगलच्या कथा काही दिवसांपासून मीडियात दाखवल्या जात होत्या. कारण या खेळाडूंनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढला आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला मेडल्स मिळवून दिलेत.

या खेळाडूंमुळे नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला १८ सुवर्ण, १५ रौप्य आणि २२ कास्य अशी एकूण ५५ पदकं मिळाली आहेत. या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये अनेक खेळाडूंनी भारताची मान गर्वाने उंच केलीय. 

परंतु या खेळामध्ये सहभागी झालेल्या श्रीलंकेतील १६१ जणांच्या टीममधले दहा सदस्य बर्मिंगहममध्येच  बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये एक अधिकारी आणि ९ खेळाडूंचा समावेश आहे.

परंतु अशा इंटरनॅशनल गेम्समध्ये श्रीलंकेतील खेळाडू परदेशात बेपत्ता होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये.

यापूर्वीसुद्धा श्रीलंकेचे अनेक खेळाडू परदेशात बेपत्ता झाले होते. सप्टेंबर २००८ मध्ये दक्षिण जर्मनीतील टीव्हीएस वेंटिस्लिगेन या स्पोर्ट क्लबनं हँडबॉलच्या इंटरनॅशनल गेम्सचं आयोजन केलं होतं. त्या स्पर्धेमध्ये श्रीलंकेतील २३ सदस्यांचा चमू सुद्धा सहभागी झाला होता.

परंतु गेम्स संपल्यानंतर अख्खी टीम बेपत्ता झाली होती. याचा तपास करतांना पोलिसांना एक चिट्ठी मिळाली होती. ज्यात अख्खी टीम जर्मनीवरून ऑस्ट्रियाला जात आहे असं सांगितलं होतं. 

टीम बेपत्ता झाल्यांनतर जर्मन पोलिसांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. त्या तपासादरम्यान श्रीलंकेतील अधिकाऱ्यांनी देशात अशी कोणती टीमचं नव्हती असं उत्तर दिलं होतं.

याआधी २३ जणांची अख्खी टीम आणि आता १० सदस्य का बेपत्ता झाले असतील?

तर २००४ मध्ये टीमच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास करतांना, जर्मन पोलिसांनी श्रीलंकेतून आलेली हँडबॉल टीम खेळाडू नसल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तसेच श्रीलंकेत चालू असलेल्या गृहयुद्धाला कंटाळून ही टीम जर्मनीत आली असेल आणि इथेच राहिली असेल असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. 

यंदा बर्मिंगहम मध्ये श्रीलंकन खेळाडूंच्या बेपत्ता होण्यामागे देशातील आर्थिक संकटाला कारणीभूत मानलं जात आहे. श्रीलंकेत चालू असलेल्या आर्थिक संकटामुळे खेळाडूंना अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. 

अन्नधान्याच्या टंचाईमुळे खाण्यापिण्याची कमतरता होती. इंधनाच्या टंचाईमुळे सर्व करण्याच्या ठिकाणी २० किमी चालत जावं लागत होतं. त्यामुळे खेळाडू आणि कोच यूकेमध्ये बेपत्ता झाले असावेत असा अंदाज लावला जात आहे. 

परंतु इंटरनॅशनल खेळांमध्ये खेळाडू बेपत्ता होणारा श्रीलंका एकटाच देश नाही.

श्रीलंकेसोबतच जगातील अनेक देशांचे खेळाडू इंटरनॅशनल गेम्सच्या दरम्यान बेपत्ता झाले आहेत. २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट शहरात कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन करण्यात आलं होतं.

तेव्हा खेळांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंपैकी १३ आफ्रिकन खेळाडू बेपत्ता झाले होते.त्या १३ आफ्रिकन खेळाडूंमध्ये बहुतांश खेळाडू एकट्या कॅमेरून देशाचे होते. तर बाकी खेळाडू रवांडा, सिएरा लिओन आणि युगांडाचे होते. 

बेपत्ता झालेल्या या खेळाडूंनी आपल्या देशाचा त्याग केलाय असं सांगण्यात आलं होतं. कारण त्या सगळ्यांपैकी प्रत्येकाच्या देशात कोणते ना कोणते राजकीय आणि आर्थिक संकट होते.  खेळाडूंनी त्याच संकटांना कंटाळून आपला देश सोडला होता.

२००६ मध्ये सुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये असाच प्रकार घडला होता.

२००६ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात कॉमनवेल्थ गेम्सचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा ४० पेक्षा अधिक खेळाडू आणि कोच बेपत्ता झाले होते. त्यातल्या अनेकांनी ऑस्ट्रेलिया सरकारकडे आश्रय द्यावा अशी मागणी केली होती.

२००६ च्या कॉमनवेल्थ गेम्स नंतर कॅमरुनचा धावपटू लॅमिन टकर हा ऑस्ट्रेलियातच राहिला होता. त्याला काही काळासाठी ऑस्ट्रेलियात आश्रय देण्यात आला होता. मात्र त्यांनतर त्याला देशातून हद्दपार करण्यात आलं होतं.

निव्वळ आफ्रिकन देश आणि श्रीलंकाच नाही तर युरोपातील खेळाडू सुद्धा आश्रय घेण्यासाठी बेपत्ता झाले होते.

१९५६ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये ऑलम्पिक गेम्सचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा हंगेरीमध्ये विरोध दडपण्यासाठी सोवियत युनिअनने प्रचंड बळाचा वापर केला होता. ही बातमी जेव्हा हंगेरीच्या खेळाडूंनी वाचली तेव्हा त्यांनी देशात परत जायचं नाही असा निर्णय घेतला होता.

ऑलम्पिक खेळांमध्ये हंगेरी आणि सोवियत युनियनच्या संघात वॉटर पोलोचं सेमीफायनल झालं. खेळादरम्यान परिस्थिती इतकी विकोपाला गेली कि हंगेरीचे खेळाडू रक्तबंबाळ चेहऱ्याने वॉटर पुलच्या बाहेर पडले होते. या वादानंतर हंगेरीचे खेळाडू अमेरिकेत गेले.

तसेच अमेरिका आणि सोवियत युनियनमध्ये चाललेल्या शीतयुद्धाच्या काळात कम्युनिस्ट देशांच्या खेळाडूंनी वेस्टर्न देशांमध्ये आसरा घेतला होता. अशा प्रकारे खेळाच्या निमित्ताने आपलं देश सोडून परदेशात राहणाऱ्यांना ऑलिम्पिक डीफेक्टर्स म्हटलं जाऊ लागलं.

कॉमनवेल्थ देशांच्या खेळादरम्यान खेळाडू जास्त प्रमाणात बेपत्ता होतात.

सिएरा लिओनच्या एका खेळाडूनं सांगितलं कि, देशात फार मोठी आर्थिक तंगी आहे. खेळांची प्रॅक्टिस करण्यासाठी कोणत्याच पायाभूत सुविधा नाहीत. टायरमध्ये काँक्रीट भरून वेटलिफ्टिंग ची प्रॅक्टिस करावी लागत होती. त्यामुळे आता परत मायदेशात जायचं कि यूकेमध्येच राहायचं काहीच कळत नाही.

कॉमनवेल्थ देशांमध्ये अनेक देशांमध्ये गरिबी आणि राजकीय अस्थिरता आहे. जेव्हा अशा देशांमधील खेळाडू विकसित देशांमध्ये जातात तेव्हा विकसित देशांमधील सुविधा आणि आपल्या देशातील संकट या दोन्ही गोष्टींचा विचार करतात. त्यामुळेच खेळांचं होस्टिंग करणाऱ्या देशात राहण्यासाठी असे मार्ग अवलंबतात.

परंतु व्हिजाची मुदत संपल्यानंतर देशात राहूनही नागरिकत्व मिळत नाही.

जेव्हा एखाद्या देशाचे खेळाडू दुसऱ्या देशात खेळायला जातात तेव्हा त्यांचे पासपोर्ट अधिकाऱ्यांकडे ठेवलेले असतात. त्यामुळे जर खेळाडू किंवा कोच लपून त्या देशात राहत असतील तर ते बेकायदेशीर ठरते.

देशातील समस्यांना कंटाळून परदेशात बेकायदेशीर राहणाऱ्या खेळाडूंच्या प्रकरणांमुळे भारताने सुद्धा राष्ट्रकुल देशामध्ये भाग घेणं थांबवायचं का असा प्रश्न विचारला जातोय. मात्र भारतातील एकही खेळाडू अशा प्रकारे पळून गेलेला नाही. तर सगळे खेळाडू आपल्या परीने मेडल्स आणून देशाचा सन्मानच  वाढवत आहेत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.