९० च्या जमान्यातल्या पोरांची हवा व्हायची ती फक्त ऍटलास सायकलवरचं
तुम्ही ९० च्या दशकातले असालं आणि तुम्हाला ऍटलास सायकल माहित नसेल तर मग अवघड आहे राव…
गावात, शहरात कुठेही गेलं असलं तरीही या सायकलची आठवण जोडलेली असते, पोस्टमन मामापासून ते गावातल्या कामगारापर्यंत सगळ्याची आवडती असते अशी लाडाची आपली ऍटलास सायकल
मजबूती ही ऍटलासची खरी ओळख
काही दशकापूर्वी भारतात जपान, जर्मनी आणि इंग्लड सारख्या देशातून सायकलचे सुट्टे भाग आयात करत होतो. त्यामुळे सामान्य नागरिक अशा सायकली खरेदी करू शकत नव्हते कारण सायकलच्या किंमती सामन्याचा आवाक्या बाहेर होत्या. त्यावेळी पगार सुद्धा खूप कमी होते. अशावेळी ऍटलास सायकल एक प्रकारची क्रांतीच केली होती.
निर्मिती नंतर १० वर्षातच एटलस भारतातील सर्वात मोठी सायकल उत्पादन करणारी कंपनी ठरली होती. आता तरुण मुलांमध्ये सायकलची काही प्रमाणात क्रेज निर्माण झाल्याचे दिसून येते. मात्र त्यांची सायकल घेतांना एक अट राहते. ती म्हणजे सायकल गेअर वाली असायला हवी. त्यामुळे चढावर सायकल चालविणे सोपे जाते. गेअर असणारी पहिली सायकल बनविण्याचा मान सुद्धा ऍटलासला जातो.
हे सगळ देणारी कंपनी मात्र आताच्या घडीला बंद झाली आहे. अनेकांचे स्वप्न पुरण करणारी कंपनी मात्र का बंद झाली आहे. हे आपण पाहूयात.
पत्र्याच्या शेड मध्ये कंपनीची सुरुवात
१९५१ मध्ये एटलस कंपनीची सुरुवात हरियाणातील सोनीपत येथून झाली होती. जानकी दास कपूर यांनी एका पत्र्याच्या शेड मध्ये ही कंपनी सुरु केली होती. पुढच्या १२ महिन्यात शेड मध्ये सुरु झालेली कंपनी २५ एकरच्या फॅक्टरी मध्ये बदलल्या गेली. यावेळी किती मोठ्या प्रमाणात एटलस सायकलला नागरिकांच्या प्रतिसाद मिळत होता ते स्पष्ट होते.
यानंतर एटलस कंपनीने कधीच मागे वळून पहिले नाही. याच काळात भारतात अजून एका कंपनीने सायकलच्या उत्पादनाला सुरुवात केली होती. तिचे नाव होते हिरो. मात्र याचा कसलाही फरक एटलस सायकल वर झाला नाही. त्याचे कारण भारतात सायकलला मोठी मागणी होती.
स्वस्त, टिकाऊ सायकल असल्याने एटलस भारतात खूप फेमस झाली होती. १९६१ पर्यंत १० लाख सायकल विकून झाल्या होत्या. यावेळ पर्यंत भारतात फक्त पुरूषचं सायकल चालवत होते. याच वेळी महिला सुद्धा सायकल चालवू शकतात याचा विश्वास एटलसने दिला होता. पेपर मध्ये जाहिरात सुद्धा दिली होती.
पहिल्या वर्षीच १२ हजार एटलस सायकल विकल्या गेल्या होत्या. महत्वाच म्हणजे इतर देशातून सायकल आयात करणारा आपला देश एटलसची निर्मिती झाली आणि इतर देशांना आपण सायकल निर्यात करू लागलो.
एशियन गेम्स मध्ये एटलसने सायकल पुरविल्या होत्या
१९७८ मध्ये एटलस कंपनीने भारताची पहिली रेसिंग सायकल बनविली होती. १९८२ मध्ये झालेल्या एशियन गेम्स मध्ये एटलसने सायकल पुरविल्या होत्या. १९८७ मध्ये १० गेअरची सायकल बनविली होती.
जागतिकीकरण पथ्यावर
१९९२ मध्ये भारतात जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले होते. इतर देशातील सायकल तयार करणाऱ्या कंपन्या भारतात येऊ लागल्या होत्या. त्यामुळे कंपन्या मध्ये स्पर्धा लागल्या होत्या. तसेच या काळात सर्वसामान्य नागरिकांकडे थोडे अधिकचे पैसे येऊ लागले होते.
यामुळे काही जण कार, दुचाकीकडे वळू लागले होते. यानंतर ही एटलस कंपनी २००४ पर्यत तग धरून होती. देशभरात ४ हजार पेक्षा अधिक डीलर एटलस कंपनीचे होते. कमी अधिक नाही तर ५० देशांमध्ये सायकल निर्यात करत होती. चीन नंतर भारत हा दुसरा देश आहे जिथे सर्वाधिक सायकलीचे उत्पादन होते. मात्र २००४ नंतर कंपनी खाली येऊ लागली होती.
२००० साला नंतर खूपच स्पर्धा वाढली होती आणि त्याच वेळी एटलस कंपनीत अंतर्गत वाद वाढले होते. जतीन दास कपूर यांच्या तिसऱ्या पिढीत वाद सुरु झाले आणि कंपनीचे ३ भागात विभाजन झाले. इथूनच कंपनीचे वाईट दिवस सुरु झाले होते.
मात्र काही दिवसानंतर कंपनीने मार्केट मध्ये परत येण्याचा प्रयत्न केला. यासाठी मोठ्या अभिनेत्यांना, खेळाडूंना ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती केली. त्यात सुनील शेट्टी, सानिया मिर्जा यांचा समावेश होता. त्यासाठी एटलस कंपनीने काही कोटी रुपये खर्च केले होते. मात्र याचा काहीच फायदा झाला नाही.
नवीन असे काही करू शकले नाही. यामुळे कंपनी अजून आर्थिक संकटात फसत गेली. २०१४ मध्ये मध्य प्रदेश मधील एक प्लांट बंद करण्यात आला. त्यात कोरोना महामारी आली त्यामुळे सायकलचे उत्पादन करू शकली नाही. त्यामुळे साहिबाबाद येथील एटलस कंपनीचा प्लांट बंद करावा लागला. तो प्लांट १९८९ मध्ये सुरु करण्यात आला होता.
एटलस कंपनी बंद पडण्याचे मुख्य कारणे
- १९८७ मध्ये पहिली गेअरची सायकल तयार करणाऱ्या एटलसने पुन्हा त्यात अधिकचे बदल केले नाहीत.
- आता लोकांना फॅशनेबल, फिटनेससाठी सायकल हवी होती. मात्र एटलस यात कुठलाही प्रयोग केला नाही,
कामगार हाच आपला खरेदीदार आहे याच मुड मध्ये कंपनी शेवट पर्यत राहिली. नवीन लोकं हिरो सारख्या कंपनीकडे वळले. - एटलसने लहान मुलांसाठी उशिरा सायकल बाजारात आणल्या.
इतर लोकांकडे लक्षचं दिले नाही असच म्हणावे लागल.
आम्ही काही काळासाठी उत्पादन बंद करत असल्याची घोषणा ३ जून २०२० ला केली होती. मात्र आता पर्यत तरी कंपनीने सायकलचे उत्पादन सुरु केले नाही. दुखद बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय सायकल दिनाच्या दिवशीच एटलसने आपण कंपनी बंद करणार असल्याची घोषणा केली होती.
हे हि वाच भिडू
- अखिलेश यादव यांना वाटतंय सायकलछाप परफ्युम योगी सरकारची हवा संपवणार..
- एअरवेजच्या मालकाला सायकलवर डबलशीट बसून फिरणाऱ्या नेत्याने निवडणुकीत पाडलं होतं
- सासऱ्यांनी दिलेल्या सायकल वरून नगरपालिकेत जाणारा मुख्यमंत्री बनला.