गोळ्या लागूनसुद्धा लढलेल्या आर्मीतल्या श्वानांना ट्रेनिंग असं दिलं जातं….

‘श्वानपथक’ लष्कराच्या पथकातील एक महत्वाचा भाग आहे ज्याच्याशिवाय तपासाला नवी दिशा मिळत नाही.  पोलिसांकडे असणाऱ्या श्वानांबद्दल आपल्याला एवढंच माहिती असतं कि हे कुत्रे वासावरून संशयित गोष्टींचा सुगावा लावतात. त्यांनाच विशेष स्निफिंग डॉग्ज म्हणलं जातं. पण स्निफर डॉग्ज फक्त वासावरून तपासात सहभाग घेत नाहीत. तर त्यांना गनपावडर शोधण्यापासून ते स्वतःचा बचाव आणि शत्रूंवर हल्ला करण्यापर्यंतचे सगळं ट्रेनिंग दिलं जातं.  तपास यंत्रणांमधील श्वानांबद्दल आज बोलण्याचं निमित्त म्हणजे, जम्मू- काश्मीरमध्ये घडलेली घटना.

९ ऑक्टोबरच्या रात्री जम्मू-काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यातील एका भागात दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. लष्कराने तात्काळ शोधमोहीम सुरू केली. या शोधमोहीमेत लष्कराने आपल्या ‘असॉल्ट डॉग’ म्हणजेच लष्करातील ‘झूम’ नावाच्या कुत्र्याला देखील सामील केले होते. ‘झूम’ला एका घरात दहशतवादी शोधायचे होते. त्याने आपले काम चोखपणे बजावत दहशतवाद्यांना ओळखले आणि दहशतवाद्यांवर हल्ला केला, मात्र यादरम्यान ‘झूम’ सुद्धा दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झाला. 

परंतू त्याच्या मदतीने लष्कर-ए-तोयबा च्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आले आहे. त्याच झूम वर आता श्रीनगरमध्ये लष्कराच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

महत्वाचं म्हणजे, जम्मू आणि काश्मीरमधील प्रत्येक दहशतवादविरोधी मोहिमेमध्ये भारतीय लष्कराची कॅनाइन टीम आघाडीवर असते. या ऑपरेशन्सचे यश मुख्यतः भारतीय लष्कराच्या श्वान पथकातील उच्च प्रशिक्षित श्वानांवर अवलंबून असते. 

लपून बसलेल्या दहशतवाद्यांचे ठिकाण आणि त्यांच्याकडे असलेली शस्त्रे आणि दारूगोळा शोधण्यासाठी युनिटमधील श्वानांना प्रथम पाठवले जाते. या श्वानांवर कॅमेरे बसवलेले असतात आणि कॅमेऱ्यांच्या आधारे फीडवर नियंत्रण कक्षातून नजर ठेवली जाते. या श्वानांना लपून बसलेल्या दहशतवाद्यांच्या नकळत त्यांच्या जागी घुसण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या ऑपरेशन्स दरम्यान भुंकू नये यासाठी त्यांना वेगळे प्रशिक्षण दिले जाते. 

हे श्वान लपून बसलेल्या अतिरेक्यांच्या लक्षात आले आणि त्यांच्यावर हल्ला झाला तर त्याला प्रत्युत्तर सुद्धा देतात. त्यावेळी त्यांचा सांभाळ करणारा व्यक्ती नेहमीच अशा परिस्थितीवर बारीक नजर ठेऊन असतो.

असॉल्ट डॉग असलेल्या झूम ने दक्षिण काश्मीरमध्ये अनेक ऍक्टिव्ह ऑपरेशनमध्ये भाग घेतला आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार झूम हा उच्च प्रशिक्षित, आक्रमक आणि निष्ठावान श्वान आहे. लपलेल्या दहशतवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कराच्या या असॉल्ट डॉग्सला उच्च प्रतीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

डॉग युनिटमध्ये भारतीय प्रजातीचे मुधोळ हाउंड शारिरीक तंदुरुस्तीच्या बाबतीत सरस असतात.

भारतीय लष्कराच्या डॉग युनिटमध्ये कुत्र्यांच्या अनेक प्रजाती आहेत. त्यामध्ये लॅब्राडॉर, जर्मन शेफर्ड्स, बेल्जियन मालिनॉइस आणि ग्रेट माउंटन स्विस डॉग्स यांचा समावेश आहे. त्या व्यतिरिक्त भारतीय जमातीच्या मुधोळ हाउंडचाही यात समावेश आहे.

डिसेंबर २०१७ पासून भारतीय सैन्य दलात पहिल्यांदाच एका देशी श्वानाचा म्हणजे मुधोळ हाऊंडचा समावेश करण्यात आला.

स्फोटके हुंगण्याची त्यांची क्षमता इतर कुत्र्यांपेक्षा किती तरी पटीने जास्त आहे हे अभ्यासाअंती सिद्ध झाले. शिवाय कोणत्याही वातावरणात सहज जुळवून घेण्याची क्षमता या श्वानात आहे. सहजासहजी ते आजारी पडत नाही.

एकदा प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला एक अजब सल्ला दिला होता. काँग्रेस नेत्यांना देशभक्ती आणि निष्ठा शिकायची असेल, तर भारतीय प्रजातीच्या मुधोळ हाउंड कुत्र्यांकडून देशभक्ती शिका. मुधोळ हाउंड ही भारतीय कुत्र्यांची एकमेव भारतीय जात आहे जी भारतीय सैन्यात सामील झाली आहे. या जातीच्या कुत्र्यांचा भारतीय लष्करात समावेश होण्याचे कारण म्हणजे हे कुत्रे सीमावर्ती भागात शत्रूच्या हालचाली, स्फोटक साहित्य इत्यादी अतिशय लवकर ओळखू शकतात.

मुधोळ हाउंडची पाहण्याची क्षमता इतकी तीक्ष्ण आहे की तो वास घेण्यापेक्षा दुरून पाहून त्याच्या शिकारावर हल्ला करतो. जे काम जर्मन शेफर्ड कुत्रे ९० सेकंदात पूर्ण करतात, मुधोळ हाउंड ते काम अवघ्या ४० सेकंदात पूर्ण करतात. सुरक्षा दलाच्या जवानांना या कुत्र्यांसह शोधमोहीम राबवणे सोपे जाते. भारतीय प्रजातीचे हे कुत्रे वेग, ताकद, चपळता आणि संयम यासाठी ओळखले जातात. सडपातळ दिसणारे मुधोळ हाउंड हे उंच असतात आणि त्यांचे जबडे मजबूत असतात, जेणेकरून एकदा पकडल्यानंतर ते त्यांचे शिकार सोडत नाहीत.

शारीरिक तंदुरुस्तीच्या बाबतीतही मुधोळ शिकारी कुत्र्यांच्या इतर जातींपेक्षा सरस आहेत. म्हणून, ते कोणत्याही ऋतूमध्ये राहण्यास अनुकूल आहेत. त्यांची देखभाल करणे सोपे असते. परदेशी जातीच्या इतर कुत्र्यांप्रमाणे त्यांना दररोज आंघोळ किंवा स्वच्छ करण्याची गरज नसते. परंतु आठवड्यातून फक्त एक किंवा दोन दिवस त्यांची देखरेख करणे गरजेचे असते.

आर्मीच्या श्वानांना मेरठमधील रिमाउंट आणि व्हेटरनरी कॉर्प्स सेंटर आणि स्कूलमध्ये प्रशिक्षण दिले जाते. 

सैन्यातील प्रत्येक कुत्र्याची काळजी घेण्यासाठी जबाबदारी हँडलरची असते. त्याला कुत्र्याच्या खाण्या-पिण्यापासून स्वच्छतेची काळजी घ्यावी लागते आणि ड्युटीवर असताना सर्व कामे करून घेण्याची जबाबदारी हँडलरची असते. कुत्र्यांच्या जाती आणि पात्रतेनुसार त्यांना सैन्यात भरती करण्यापूर्वी अनेक गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते. 

त्यांना आवाजाऐवजी डोळ्यांच्या इशारे समजून घेण्यास आणि काम करण्यास शिकवले जाते. हँडलर त्यांना इतके प्रशिक्षण देतात की अडचणीच्या वेळी कुत्र्यांना हुकूम देण्याची गरज नाही, उलट ते न बोलता काम करू लागतात. हे कुत्रे निवृत्त होण्यापूर्वी सुमारे आठ वर्षे सेवेत असतात. लष्करात भरती झालेल्या श्वानांचाही त्यांच्या सेवेबद्दल गौरव केला जातो.

इंग्रजांच्या काळापासून भारतीय लष्करात श्वानांना दयामृत्यू दिला जायचा. 

लष्कराला भीती असायची की हे कुत्रे चुकीच्या लोकांच्या हाती आले तर. या कुत्र्यांना लष्कराच्या गुप्त जागांची माहिती असायची. त्यामुळे कुत्र्यांचा वापर चुकीच्या पद्धतीनं झाला तर. याशिवाय कुत्र्यांना गंभीर दुखापत झाली, ते आजारी पडले तर त्यांना मारलं जायचं.

सुरुवातीला अशा कुत्र्यांवर उपचार केले जायचे. पण काही सुधारणा झाली नाही तर त्यांना गोळी मारली जायची. फक्त कुत्रेच नाही तर घोडे, गाढवं यांनाही उपयोग संपल्यावर मारलं जायचं. याला अॅनिमल युथेनेशिया म्हणतात.

लष्कराच्या कुत्र्यांना दत्तक का दिलं जात नाही ? 

त्यामागे असाही विचार असायची की लष्करानं तयार केलेल्या कुत्र्यांना सामान्य माणसांसोबत कसं ठेवणार ? पुन्हा सैन्यात त्यांना जेवढी सुविधा मिळते, तेवढी दुसरीकडे मिळणं शक्य नाही. 

२०१५ मध्ये सरकारने सांगितलं अशा कुत्र्यांना न मारता त्यांना दत्तक देता येईल, अनेक देशांत असे कायदे सुद्धा आहेत. नंतर हे प्रकरण दिल्ली हायकोर्टात गेलं होतं.

कोर्टानं कुत्र्यांना ठार करणं हे कायद्याचं उल्लंघन म्हटलं होतं. २०१७ मध्ये मेरठमध्ये कुत्र्यांसाठी ‘एज होम वॉर डॉग ट्रेनिंग स्कूल’ स्थापन केलं गेलं. यावेळी लष्कर अधिकाऱ्याने सांगितलं, वैद्यकीय उपचार संपतात तेव्हाच कुत्र्यांना मारलं जातं. भारतात कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या राज्यांत कुत्र्यांना दत्तक घेण्याची सोय आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.