मुस्लिम असुनही अहमदिया समाजाला पाकिस्तानात टार्गेट का केलं जातंय?

काल परवापासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये काही लोक एका मशिदीची तोडफोड करताना दिसतायत. अगदी मशिदीवर चढून हातोड्याने मशिदीच्या तोडफोडीचा प्रयत्न सुरू असल्याचं या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतंय.

हा व्हिडीओ आहे कराची, पाकिस्तान इथला.

पटकन विश्वास बसणार नाही कारण, पाकिस्तान सारख्या कट्टर मुस्लिम समजल्या जाणाऱ्या देशात मशिदीची तोडफोड आणि ते सुद्धा इतक्या खुलेआमपणे कशी शक्य आहे? असा प्रश्न डोक्यात आला असेल…

 या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याआधी ही तोडफोड कुणी केलीये हे बघुया.

तर, माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार  ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ या जिहादी संघटनेने मशिदीची तोडफोड केलीये. आता पुन्हा तोच प्रश्न पडतो की, जिहादी संघटना मशिदीची तोडफोड का करेल?

त्याचं उत्तर आहे, ‘ही मशीद अहमदिया या समाजाची आहे.’

हा अहमदिया समाज काय आहे ते थोडक्यात बघुया.

अहमदिया हा मुस्लिम समाजातील सुन्नी समाजातील एक उपपंथ आहे.  अगदी अलीकडच्या काळात म्हणजे ८० चं दशक संपण्याच्या वगैरे काळात या उपपंथाची स्थापना झाली. विशेष म्हणजे या उपपंथाची स्थापना ही भारतातलीच आहे. पंजाबमधील कादियानामध्ये मिर्झा गुलाम अहमद यांनी या उपपंथाची स्थापना केली होती.

मिर्झा गुलाम अहमद यांनी स्वत:चा शरियतचा कायदा मांडला नाही तर मोहम्मद पैगंबरांनी सांगितलेल्या शरियतचं पालन करा असं त्यांनी सांगितलंय.

झालंय असं की, अहमदिया समाजातील लोकांमध्ये मिर्झा यांना नबीचा दर्जा आहे. असं म्हटलं जातं की, स्वत: अल्लाहने मिर्झा यांना पृथ्वीवर पाठवलं होतं. मुस्लिम समाजाच्या अडचणी दूर करून समाजाला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी ते पृथ्वीवर आले होते अशी श्रद्धा अहमदिया समाजातील लोकांमध्ये आहे.

पण, याच विचारांमुळे इतर मुस्लिम समाज आणि अहमदिया समाजामध्ये मतभेद आहेत.

हे मतभेद इतके टोकाचे आहेत की, १९७२ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी घटनेत दुरूस्ती करून घेतली आणि अहमदिया समाजाला इस्लाम धर्मातून बेदखल केलं. त्यामुळे, या समाजाला मशिदीमध्ये जाण्यासही बंदी घालण्यात आली.

परिणाम असा झाला की, अहमदिया समाज हा पाकिस्तानातल्या अल्पसंख्यांक गटात गेला.

त्यामुळे, इतर  सर्व मुस्लिम समाज आणि अहमदिया समाज यांच्यातला संघर्ष हा उघड आहे. याच कारणांमुळे  ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ या जिहादी संघटनेने अहमदिया समाजाच्या मशिदीची तोडफोड केली.

बरं पाकिस्तानात अहमदिया समाजासोबत असं होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये.

एकूण संख्या बघितली तर, जगभरात जवळपास १ कोटी २० लाख इतकी अहमदिया पंथाची लोकसंख्या आहे. पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त २ टक्क्यांच्या आसपास लोक हे अहमदिया पंथाचे आहेत. त्यामुळे, पाकिस्तानात अहमदिया पंथ हा टार्गेट करायलाही सोपा जातो.

अगदी आताचाच विचार करायचा झाला तरी, आता एक व्हिडीओ व्हायरल होतोय पण अलीकडच्या काळातच ४-५ वेळा अहमदिया समाजाच्या मशिदींवर हल्ला झाला असल्याचं वृत्त हे स्थानिक माध्यमांमध्ये आहे.

यापूर्वी काही अहमदिया मुसलमानांना पैगंबरांचा अवमान केल्याच्या आरोपांखाली फाशीचीही शिक्षा सुनावण्यात आलेली होती. हे आरोप खोटे असल्याचंही दबक्या आवाजात बोललं जातं. गेल्या वर्षी ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’चे मौलवी  महंमद नईम चट्ठा यांनी गर्भवती अहमदिया मुसलमान महिलांवर आक्रमण करायचं आवाहन केलं होतं. ‘असं केलं, तर अहमदिया मुसलमान जन्मालाच येणार नाही’, असं या मौलवींचं म्हणणं होतं.

त्यामुळे, मुस्लिम समाजातील अंतर्गत मतमतांतरांमुळे अहमदिया समाजाला टार्गेट केलं जातं असं सतत बोललं जात असतं आणि अशा घटनांमुळे या चर्चांना दुजोराही मिळतो.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.