हिरो म्हणून सुपरफ्लॉप झाला पण आता सलमानचा जिजाजी बनून करोडो कमवतोय

अपयशाचे अनेक धक्के खाऊन यशाची गोडी चाखायला कधी मिळेल काही सांगता यायचं नाही. थोडा नशीबाचा सुद्धा भाग असतो म्हणा ! कारण ही कहाणी अशा एका माणसाची आहे, जो एक अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून फ्लॉप ठरला. परंतु तरीही त्याने सलमानच्या बहिणीला पटवलं.

आणि आज बॉलिवुडमध्ये एक यशस्वी निर्माता म्हणून तो करोडोंची उलाढाल करत आहे. या माणसाचं नाव अतुल अग्निहोत्री.

जे दर्दी सिनेरसिक आहेत त्यांना अतुल अग्निहोत्री हे नाव ओळखीचं असावं. ‘क्रांतिवीर’ मध्ये नाना पाटेकर अफाट एनर्जीने संपूर्ण सिनेमात वावरत असतो. त्या तुलनेत अगदी शांतपणे, चेहऱ्यावरची एक रेष सुध्दा न हलणारा नाना पाटेकरच्या भावाच्या भूमिकेत अतुल अग्निहोत्री झळकला. सिनेमात सहाय्यक कलाकाराच्या भूमिकेत काही सिनेमांमध्ये अतुलला तुम्ही पाहिलं असावं.

पण एक कलाकार म्हणून सिनेमा संपल्यावर तो इतका लक्षात राहत नाही. त्याला मात्र कोण काय म्हणेल याची पर्वा नव्हती. तो त्याच्या पद्धतीने काम करत राहिला. अपयशाचे धक्के पचवत राहिला. थोडा वेळ लागला पण आज अतुल अग्निहोत्रीची बॉलवूड मध्ये सुपरहिट सिनेमांचा निर्माता म्हणून ओळख आहे.

कमल हसन यांच्या ‘एक दुजे के लिये’ सिनेमाद्वारे रती अग्निहोत्रीने एक अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. रती अग्निहोत्रीचा विषय काढायचं कारण.. रती आणि अतुल सख्खे बहीण भाऊ. अतुल अगदी लहान असताना डोक्यावरचं पितृछत्र हरपलं. वडिलांच्या व्यवसायाची सर्व सूत्र अतुलने स्वतःच्या खांद्यावर घेऊन कुटुंबाला आधार द्यायचा प्रयत्न केला. रती मुंबईत सिनेसृष्टीत स्वतःचं नशीब आजमावत होती. तिच्यामुळेच अतुलला सुद्धा बॉलिवुड विषयी आकर्षण वाटू लागले.

वयाच्या १३ व्या वर्षी ‘पसंद अपनी अपनी’ सिनेमात अतुलने काम केलं. रती या सिनेमाची हिरोईन होती.

एकदा का या झगमगत्या इंडस्ट्री मध्ये प्रवेश घेतला की, कोणाच्याही मनात या फिल्मी दुनियेविषयी सुप्त आकर्षण निर्माण होतं. अतुलचं सुद्धा तेच झालं. महेश भट्ट यांच्या १९९३ साली आलेल्या ‘सर’ या सिनेमातून अतुल हीरो म्हणून झळकला. प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी या सिनेमाला पसंती दर्शवली. पुढची काही वर्ष अतुलने ‘क्रांतिवीर’, ‘नाराज’, ‘आतीश’, ‘यशवंत’, ‘हम तुम्हारे है सनम’ अशा सिनेमांमध्ये भूमिका केल्या.

समोर नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, परेश रावल यांसारखे उत्कृष्ट अभिनेते होते. अतुलचे सिनेमे सुद्धा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले. परंतु अतुलच्या कामाची हवी तशी दखल कोणी घेतली नाही. अतुलला सिनेमात फक्त सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका मिळत होत्या. यामुळे अभिनय क्षेत्रात अतुलला हवं तसं यश मिळवता आलं नाही.

याच दरम्यान १९९५ साली अतुलने सलमान खानची बहीण अल्विरा सोबत प्रेमविवाह केला.

लग्न झाल्यानंतर हळूहळू अतुलची अभिनय कारकीर्द संपुष्टात आली. अभिनय सोडून अतुलने दिग्दर्शनात रस घेतला. आत्ता सलमान खानशी घरचे संबंध झाल्याने पहिला सिनेमा दिग्दर्शित करण्यासाठी मुख्य कलाकारांच्या यादीत सलमान खान अग्रक्रमावर होता.

२००४ साली ‘दिल ने जिसे अपना कहा’ हा सिनेमा अतुलने दिग्दर्शित केला. या सिनेमात सलमानसोबत प्रीती झिंटा, भूमिका चावला या अभिनेत्री होत्या. सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाणकन आपटला. पहिलाच सिनेमा फ्लॉप ठरल्याने अतुलने स्वतःला आणखी एक संधी द्यायचं ठरवलं. सिनेमाची तयारी झाली. पुन्हा एकदा सलमान खान विशेष भूमिकेत.

यावेळी सोहेल खानला प्रमुख भूमिका देण्याची रिस्क अतुलने घेतली. रिस्क अंगलट आली. अतुलने दिग्दर्शित केलेला दुसरा सिनेमा ‘हॅलो’ सुद्धा फ्लॉप झाला.

दोन सिनेमे दिग्दर्शित करून अतुलला चांगलाच अनुभव मिळाला असावा. अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही गोष्टींमध्ये सपाटून मार मिळाल्यामुळे अतुलने निर्माता होण्याची वाट निवडली.निर्मितीमध्ये पाय रोवताना सुद्धा अतुलने सलमानची निवड केली.

घरचे संबंध असले तरीही प्रत्येक वेळी नव्या कामाचा श्रीगणेशा करताना अतुलला सलमान आठवायचा. यामागे भाईजानचा धाक की प्रेम हे कळायला मार्ग नाही.

सलमान खान आणि करीना कपूर प्रमुख भूमिकेत. सिनेमा होता ‘बॉडीगार्ड’. अपयशाचे दिवस सरले, या सिनेमाने एक निर्माता म्हणून अतुल अग्निहोत्रीला भरपूर यश मिळवून दिले. २५० कोटींचा व्यवसाय या सिनेमाने केला.

आत्ता कुठे अतुल, निर्माता म्हणून स्थिरस्थावर होतोय तोच ‘ओह तेरी’ सारख्या सिनेमाची निर्मिती त्याने केली. हा सिनेमा फ्लॉप झाला. बुडत्याला काठीचा आधार, तसं पुन्हा एकदा अतुलला सलमानचा आधार झाला.

२०१९ साली आलेल्या सलमानच्या ‘भारत’ सिनेमाची निर्मिती अतुलने केली आणि पुन्हा एकदा यशाची चव चाखली.

आज बॉलिवुड मध्ये अतुल अग्निहोत्रीला यशस्वी निर्माता म्हणून ओळखले जाते. अभिनय, दिग्दर्शन या गोष्टींमध्ये भले अतुल असफल झाला असला तरीही निर्माता म्हणून आज अतुलची इंडस्ट्रीत चांगली ओळख झाली आहे. घरोबा असल्याने वेळोवेळी अतुलच्या साथीला मेव्हणा सलमान खान असतोच. त्यामुळे जीजा – साल्याचे हे मैत्रीपूर्ण संबंध नेहमीच चर्चेत असतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.