अतुल कुलकर्णी आणि बिपाशाने हॉलिवूडमध्ये मराठ्यांची भूमिका साकारली होती

भारतीय हिरोनी किंवा हिरॉईननने हॉलिवूडमध्ये काम केलं म्हणजे आपल्याला लय कुल वाटतं म्हणजे यावरून हॉलीवूड इंडस्ट्री किती बाप आहे वैगरे चर्चा झडतात. पण एकदा हॉलिवूडमध्ये मराठी इतिहास सादर केला गेला होता तोही अस्सल मराठी हिरोंकडून. मराठी इतिहासातले अज्ञात पैलू या सिनेमातून उलगडण्यात आलेले होते. तर जाणून घेऊया काय होता हा सिनेमा.

मराठी मनाचा लाडका अभिनेता म्हणजे अतुल कुलकर्णी. कोणतीही भूमिका असो तिला जिवंत कशी सादर करायची याचं उत्तम उदाहरण म्हणजे अतुल कुलकर्णी. हॉलिवूडच्या ‘सिंग्युलॅरिटी’ या बहुचर्चित चित्रपटात अतुल कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसून आले होते. रोलँड जोफ दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव अगोदर सिंग्युलॅरिटी असं होतं पण नंतर द लव्हर्स असे ठेवण्यात आलं. या चित्रपटात भारतीय कलाकार अतुल कुलकर्णी यांच्याव्यतिरिक्त बिपाशा बसू, अभय देओल, मिलिंद गुणाजी आणि इतर काही कलाकार होते.

हा चित्रपट लेखक अजय झनकर यांच्या ‘द्रोहपर्व’ या मराठी कादंबरीवर आधारित होता. पेशवे रघुनाथराव यांनी मराठा साम्राज्याशी गद्दारी केल्यावर अँग्लो-मराठा युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी आधारित होती.

बिपाशा बसू आणि अभय देओल यांनी साकारलेल्या तुळजा आणि उदाजीचा प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला. तुळजा आणि उदाजी या पात्रांचा इतिहासात उल्लेख नाही; पण कादंबरीच्या कथेत या पात्रांच्या माध्यमातून वर्णन केले आहे.

‘सिंग्युलॅरिटी’ म्हणजे ‘द लव्हर्स’ ही एका सागरी पुरातत्वशास्त्रज्ञाची कथा आहे जो बोस्टन हॉस्पिटलमध्ये ब्रेन डेड होतो आणि त्याच्या स्वप्नासारख्या कोमात तो स्वतःला 1778 मध्ये पुण्याला परत घेऊन जातो. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी राजवाड्यांवर आक्रमण करते. जेम्स स्टुअर्ट (जोश हार्टनेट) नावाचा तरुण कर्णधार, तो आपल्या धोकादायक मोहिमेवर असताना तुळजा नाईक (बिपाशा बसू) नावाच्या मराठी योद्धाच्या प्रेमात पडतो.

अतुल कुलकर्णीचे पात्र पेशवे रघुनाथराव यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित होते. अतुल कुलकर्णी व्यतिरिक्त आणखी एक मराठी अभिनेता मिलिंद गुणाजी देखील या चित्रपटाचा एक भाग होते. हा सिनेमा त्यांना कसा मिळाला याची देखील एक स्टोरी आहे त्याविषयी मिलिंद गुणाजी सांगतात, ‘चित्रपटात मी खूप छोटी भूमिका केली होती. खरं तर सात वर्षांपूर्वी रोलँड जोफ आपल्या टीमसोबत महाराष्ट्रातल्या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी भारतात आला होता. मी त्या दिवसांत ‘भटकंती’ हा ट्रॅव्हल शो करत होतो आणि महाराष्ट्रातील सुंदर ठिकाणांवर पुस्तके लिहिली होती म्हणून त्यांना मला भेटण्याची इच्छा झाली. त्यांनी मी लिहिलेली पुस्तकेही विकत घेतली.

लोकेशन एक्सप्लोर करण्यासाठी गेले असताना मिलिंदला ऑटोग्राफ मागताना पाहून रोलँड यांना आश्चर्य वाटले. ‘ते आश्चर्यचकित झाले आणि मिलिंद गुणाजींना विचारलं काय करताय तुम्ही हे ? गुणाजींनी त्यांना सांगितले की मी एक अभिनेता आहे आणि काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यानंतर त्याने मिलिंद गुणाजीना चित्रपटात कास्ट करण्याचं ठरवलं. पण कोणती भूमिका करणार हे खूप नंतर ठरवलं होते. आणि त्यांना या सिनेमात मराठा योद्धा शिवाची भूमिका ऑफर करण्यात आली. ही खूप छोटी भूमिका होती पण अजय झनकर हे मिलिंद गुणाजींचे चांगले मित्र असल्याने त्यांनी ती केली.

मिलिंद गुणाजी हे पहिले भारतीय अभिनेते होते जे या चित्रपटाशी अधिकृतपणे जोडले गेले होते. ‘काळानुसार चित्रपटात बरेच बदल झाले. 1990 च्या दशकात या चित्रपटावर काम सुरू झाले. या चित्रपटाचे मूळ नाव ‘द इनव्हेडर्स’ असे होते आणि त्यात हॉलिवूड अभिनेता ब्रेंडन आणि बॉलीवूड कलाकार ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय यांचा समावेश होता.’

आपल्या परफेक्शनसाठी प्रसिद्ध असलेल्या अतुल कुलकर्णीलाही या चित्रपटात काम करण्याचा अनुभव आला. अतुल कुलकर्णी यांनी या चित्रपटाविषयी सांगितलं होतं, ‘चित्रपटासाठी शूटिंग करण्याचा हा एक उत्कृष्ट अनुभव होता. युनिट भारतात चित्रपटासाठी कास्टिंग करत होते. रोलँडने माझे काही चित्रपट पाहिले होते. आम्ही दोन वेळा भेटलो आणि नंतर, त्याने मला कास्ट केले.

अतुलचे काही भाग ऑस्ट्रेलियात शूट करण्यात आले होते आणि तो भारतातील शेड्यूलचा भाग नव्हता. अतुल कुलकर्णी पुढे म्हणाले की,

‘हॉलीवूड कनेक्शनमुळे मी हा चित्रपट केला नाही. मला स्क्रिप्ट आवडली आणि रावजी ही माझी भूमिका चित्रपटातील प्रमुख पात्र आहे. एक कलाकार म्हणून माझ्यासाठी चांगला वाव होता.’

विजय ठोंबरे आणि निशा शर्मा हे इतर भारतीय कलाकार होते ज्यांनी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.अशा प्रकारे द लव्हर्सच्या माध्यमातून मराठी इतिहास मराठी अभिनेत्यांनी जगापूढे आणला होता.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.