भारताचं ब्रम्हास्त्र म्हंटल्या जाणाऱ्या ब्राम्होसची सूत्र मराठी मिसाईल मॅनकडे आलीयेत

भारत दिवसेंदिवस आपल्या संरक्षण क्षेत्रावर जास्त भर देतोय. त्याअंतर्गत बाहेरच्या देशांची मदत तर घेतलीच जात आहे, पण सोबतच स्वतः सुद्धा आत्मनिर्भर होऊन त्यावर काम करतंय. भारताचा असाच एक आत्मनिर्भर प्रोजेक्ट म्हणजे ब्रामोस मिसाईल.

भारताच्या सुरक्षा यंत्रणेत महत्वाची भूमिका बजावणारं ब्रामोस मिसाईल एक सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल आहे. जे पाणबुडी, जहाज, विमान किंवा जमिनीवरूनही डागता येऊ शकतं.  रशियाच्या NPO माशिनोस्ट्रोएनिया आणि भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने संयुक्तपणे हे मिसाईल विकसित केलंय. जे रशियाच्या P-800 Onkis क्रूझ मिसाईलच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे.

ब्रह्मोस ही भारत आणि रशियाने विकसित केलेली आतापर्यंतची सर्वात प्रगत मिसाईल सिस्टीम आहे, ज्यामुळे मिसाईल टेक्नॉलॉजीच्या भारत टॉपला गेलाय. म्हणूनचं भारताच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा आणि अभिमानाचा असा प्रोजेक्ट आहे.

पण भिडू त्याहून अभिमानाची गोष्ट म्हणजे हे मिसाईल बनवणाऱ्या ब्रामोस मिसाईल लिमिटेडची सूत्र आता एका मराठमोळ्या माणसाकडे आलीत.

डीआरडीओचे शास्त्रज्ञ असणारे अतुल राणे यांनी नुकताच ब्रम्होस एअरोस्पेस लिमिटेडच्या सीईओ आणि एमडी पदाची सूत्र हाती घेतलीये. ब्रह्मोस एअरोस्पेस लिमिटेड ही कंपनी सुपरसोनिक क्रुझ मिसाईल बनवते आणि ही  महत्वाची जबाबदारी एका महाराष्ट्रीयन माणसाकडे आली आहे.

१९८७ सालापासून म्हणजे गेल्या ३४ वर्षांपासून अतुल राणे हे डीआरडीओमध्ये कार्यरत आहेत.

जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातील सावदा हे अतुल राणे यांचं मूळगाव. पुढे राणे यांनी चेन्नईच्या गुइन्डी इंजिनिअरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर गाइडेड मिसाइलमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ते पुण्यात आले. आणि १९८७ साली ते डीआरडीओमध्ये जॉईन झाले.

डीआरडीओच्या प्रयोगशाळेतून सिस्टीम मॅनेजर म्हणून त्यांनी आपलं करियर सुरु केलं. पुढे जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या मेड इन इंडिया अशा आकाश मिसाईल सिस्टीमसाठी मॉड्युलर रिअल टाईम सिम्युलेशन टेस्टिंग सिस्टीम उभी करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर त्यांनी ऑनबोर्ड कॉम्प्युटर डिव्हिजनमध्ये अग्नि-१ मिसाईलच बवण्यासाठी नेमण्यात आलेल्या ऑनबोर्ड मिशन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोग्रामचं नेतृत्त्व केलं.

यासोबतच त्यांनी हार्डवेअर इन लूप सिम्युलेशन स्टडीज, सिस्टम अॅनालिसिस, मिशन सॉफ्टवेअरचा विकास आणि डिफेन्स ऍप्लिकेशन्ससाठी एव्हियोनिक्स तंत्रज्ञानाच्या स्वदेशी डिझाइन आणि विकासामध्ये दशकांपासून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

तसं पाहायचं झालं तर अतुल राणे रशिया सोबत ब्रह्मोस मिसाईल बनवणाऱ्या टीमसोबत आधीपासूनच काम करत होते. ते आधीच ब्रह्मोस टीमच्या कोअर टीमचे सदस्य आहेत.  या दरम्यान त्यांनी प्रोग्रॅम मॅनेजिंग, एव्हीओनिक्स आणि प्रोग्राम पीजे-१० साठी सिस्टम्स इंटिग्रेशन म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिलं. याचाच परिणाम आहे कि, आज ब्रह्मोस हे आधुनिक शस्त्रास्त्र सिस्टीम सोबत आपल्या सैन्याला मजबूत करणारं जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल आहे. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.