स्वत:ची ग्रामपंचायत नसणाऱ्या महाराष्ट्रातल्या गावात भरतं, “एक दिवसाच साहित्य संमेलन”.

महाराष्ट्रात एक साहित्य संमेलन भरते. त्या साहित्य संमेलनाच हे ७६ वे वर्ष. संमेलनाची वेगळी ओळख सांगायची झाली तर या संमेलनामध्ये आजपर्यन्त एकदाही वाद झाला नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणुक म्हणजे भल्याभल्या राजकारण्यांना लाजवणारी असते. इथे मात्र साहित्यसंमेलनाचा अध्यक्ष कुठल्याही वादविवादा शिवाय निवडला जातो. कार्यकारी मंडळाची बैठक बसते व अध्यक्ष निवडला जातो.

गेली ७६ वर्ष हे संमेलन मकर संक्रातीच्या दिवशी भरत असल्याने आजूबाजूच्या रसिकांना ते माहितच होतं. त्या दिवशी लोक एकत्र येतात आणि दिवसभरात संमेलन पार पाडून उत्साहाने आपआपल्या घरी जातात. 

आज हे साहित्य संमेलन भरत आहे, 

“हि गोष्ट औंदुबरच्या एका दिवसाच्या सदानंद साहित्य संमेलनाची.”   

औंदुबर हे सांगली जिल्हातलं छोटस गाव. इतकं छोट की या सांगली जिल्ह्यातल्या या गावात ग्रामपंचायत देखील नाही. अंकलखोपची ग्रामपंचायत हिच औंदुबरची ग्रामपंचायत. पण या गावात निर्सगाची जोड लाभलेली. कृष्णाकाठी असणाऱ्या या गावात श्री क्षेत्र औंदुबरामुळे धार्मिक वातावरण. याच वातावरणाच्या मोहात कोकणातले विश्वनाथ सामंत पडले. विश्वनाथ सामंत  ग्राट मेडिकल कॉलेजमधले शिकलेले विश्वनाथ सामंत अध्यात्माच्या शोधात औंदुबरला स्थायिक झाले.

अशा वडिलांच्या पोटी सदानंद सामंत यांचा जन्म झाला. विश्वनाथ सामंत यांनी आपल्या मुलाला शाळेत पाठवले नाही. शाळेत न जाता सदानंद सामंत घरी अभ्यास करु लागले. बंगाली साहित्यावर देखील त्यांनी पकड मिळवली होती. त्याकाळी प्रसिद्ध असणाऱ्या किर्लोस्कर मासिकात त्यांचे लेख येत असत. हिरकणी, अभागी अबला, सुन् यत् सेन, केमालपाशा अस चरित्रपर लेखन प्रसिद्ध झालं. जसे ते साहित्यात होते तसेच ते चांगला मुलगा म्हणून देखील लोकप्रिय होते.

सदानंद सामंत व कवी सुधांशू या शाळकरी मुलांनी “बालशारदा मंडळाची” स्थापना केली.

बालशारदा मंडळाची स्थापना करण्यात आली होती ते साल होतं १९३६ चं. पण पुढच्या दोन वर्षातच म्हणजे १९३८ साली सदानंद सामंत यांच निधन झालं.  त्यांच्या निधनानंतर या शाळकरी मुलांनी आपण साहित्यसमेलन आयोजिक करायच असा निर्धार केला. कवी सुधांशू आणि म.बा.भोसले, ग.न.जोशी, राजाराम केशव जोशी या मुलांनी साहित्यसंमेलनास सुरवात केली. त्यासाठी दिवस ठरवण्यात आला तो मकरसंक्रातीचा. 

१४ जानेवारी १९३९. 

पहिले साहित्य संमेलन भरवण्यात आले. आजूबाजूच्या घरांमध्ये या साहित्य संमेलनाची माहिती देण्यात आली. या पहिल्या साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष दत्तो वामन पोतदार. या मुलांनी पहिल्या संमेलनासाठी गोळा केलेल्या माणसांची संख्या होती. अवघी २० ते २५ जण. 

दत्तो वामन पोतदार यांनी आपलं अध्यक्षीय भाषण केलं. कवी सुधांशू कमी लोक आल्याने नाराज होते तेव्हा दत्तो वामन पोतदार कवींना म्हणाले,

“ हि पंचवीस माणसे पुरेसी आहेत. काहीतरी ऐकण्याच्या इच्छेने ती आली होती. पंधरा माणसे आली असती तरी मला वाईट वाटले नसते. तीस चाळीस घरांच्या खेड्यात मराठी भाषेच्या प्रेमाखातर इतकी माणसे आली हिच माझ्या दृष्टीने मोठ्ठी गोष्ट आहे. पुढच्या वर्षी आणखी माणसे जमतील, हळुहळु गर्दी वाढत जाईल. खंत करु नका तुमचे काम चालू ठेवा”. 

या मुलांनी आपलं काम चालू ठेवलं. पुढे या संमेलनाला जे अध्यक्ष लाभले त्यांची नावे होती, श्री.म.माटे, चि.वि.जोशी, महादेव शास्त्री, वि.स.खांडेकर, कवी यशवंत, ग.दि. माडगुळकर, पु.ल. देशपांडे, व्यंकटेश माडगुळकर, वसंत कानेटकर, बा.भ. बोरकर, शंकर पाटील, शांता शेळके, शंकरराव खरात, व.पु.काळे, नारायण सुर्वे, व.पु.काळे, मारूती चित्तमपल्ली, नामदेव ढसाळ असे कित्येकजण. 

या संमेलनाला यांसारखे कित्येक मोठ्ठी माणसं अध्यक्ष म्हणून लाभली. इतकी मोठ्ठी माणसं या संमेलनाला अध्यक्ष लाभली त्याच कारण संमेलनाच्या साधेपणात होतं. मंदिराच्या आवारात असणाऱ्या ओंदुबराच्या झाडाखाली हे संमेलन भरत असे. २००७ साली हे झाडं पडलं त्यानंतर मात्र छोटेखानी मंडप घालून संमेलन आयोजित करण्यात येते. 

संमेलनाच्या दिवशी सकाळी नियोजित अध्यक्ष येतात. अध्यक्षीय भाषण होते. त्यानंतर इतर कार्यक्रम झाल्यानंतर अध्यक्षांबरोबरच रसिक एका पंगतीत जेवण करतात. त्यानंतर दूपारी १२ ते ३ च्या वेळेत काव्यसंमेलन पार पडते. हे काव्य संमेलन कसे असते तर ज्याला कवीता ऐकवायची असते तो रसिक आपले नाव नोंदवतो. एकएकजण पुढे जातो आणि आपली कविता म्हणू लागतो. अशा वेळी कितीही मोठ्ठा साहित्यिक असला तरी तो एका रसिकाप्रमाणे मांडी घालून नवकवीची कविता तल्लीन होवून ऐकू लागलो. 

आजूबाजूच्या गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील रसिक इथे येतात. दिवसभर औंदुबरच्या प्रसन्न वातावरणात साहित्य संमेलनात तल्लीन होतात. या संमेलनामुळे फक्त रसिकांनाच आनंद मिळत नाही तर कित्येक नवे लेखक या एका दिवसाच्या संमेलानामुळे घडले. कृष्णात खोत यांची गावठाण हि कादंबरी लिहण्याची प्रेरणा या संमेलनातून मिळाली. विजय जाधव यांच्या जलप्रलय यांची प्रेरणा देखील हेच संमेलन ठरले. 

आत्ता या सदानंद साहित्य संमेलनाची आणि आमच्यासारख्या तरुणांची नाळ म्हणजे आपल्या आजूबाजूला अस काहीतरी घडतय याच कौतुक वाटण्याइतपत मर्यादित होती. वादविवादाने रंगणाऱ्या अखिल मराठी साहित्य संमेलनाच्या ऐवजी साहित्य हा शब्द आम्हाला कळला तो “सदानंद साहित्य संमेलामुळे”. गावाकडच्या मुलांना शाळेय वयात साहित्य म्हणजे काय असतं हे कळणं देखील किती महत्वाच आहे याचा अंदाज आपण बांधू शकत नाही.

आज या साहित्यसंमेलनास सुरवात होत आहे. आपण जवळपास असाल तर नक्की जा इतकच. सांगली जिल्ह्यातल्या औंदुबरच्या साहित्य संमेलनाला. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.