सूर्यनमस्काराच्या वेडामुळे मराठी राजाला इंग्लंडच्या कोर्टाची पायरी चढावी लागली होती..

औंध म्हणजे सातारा सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यातले छोटेसे संस्थान. राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे औंधचा राजा श्रीमंत बाळासाहेब भवानराव पंतप्रतिनिधी. औंधसारख्या छोट्या दुष्काळी संस्थानाचा हा राजा पण त्यांनी केलेल्या कार्याची दखल स्वतः गांधीजींनी  घेतली होती, इतका हा मोठा माणूस.

त्यांनी आपल्या प्रजेला आपलं कुटुंब समजलं.

शाळा-वसतीगृह काढली आणि तिथं विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. किर्लोस्करवाडी, ओगले काच कारखाना असे उद्योग त्यांच्यामुळेच तर उभे राहिले. पुरोगामी विचारांचा वारसा चालवला, अस्पृश्यता बंद केली. संगीत, नाटक, चित्रकला याला राजाश्रय दिला. कैद्यांना सन्मानाने जगण्याची दुसरी संधी मिळावी म्हणून खुला कारागृह बनवला. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले.

सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातंत्र्याच्याही १० वर्षे आधी आपल्या राज्यकारभाराची सूत्रे प्रजेच्या हाती सोपवली. असा हा कर्मयोगी राजा.

औंधचा राजा बलोपासनेचा भोक्ता होता. वयाच्या पंचेचाळीशीनंतर त्यांनी मिरजेच्या राजेसाहेबांच्या सल्ल्यानुसार सूर्यनमस्कार सुरू केले. दररोज ३०० नमस्कार घालण्याचा क्रम त्यांनी आयुष्यभर जोपासला. त्यांचे सुपुत्र आप्पासाहेब पंत यांनी त्यांच्या या व्यायामाच्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. ते लिहितात,

“महाराजांना तालीम, कुस्ती, जोर, बैठकांचा छंदच होता. औंधच्या डोंगरावरील देवीला ते पळत जायचे.”

सूर्यनमस्कारचे महत्व त्यांनी ओळखले होते. ते स्वतः उतार वयातही नियमित व्यायाम करायचे. औंध संस्थानच्या प्रत्येक शाळेची सकाळची सुरवात पंचवीस सूर्यनमस्कार प्राणायामने होत असे. यात सर्व धर्मातील मुले सामील होतं.

सूर्यनमस्काराची चळवळ त्यांनी औंध संस्थानमध्ये रूढ केली. आपले आरोग्य, प्रकृति रोज नियमित व्यायामानें घट्ट करता येते व ती प्रत्येक स्त्री पुरुषाने केली पाहिजे; तरच तो समाजाची व राष्ट्राची सेवा करू शकेल असे त्यांचे स्पष्ट मत होते. सूर्यनमस्कारावर त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषेंत पुस्तके लिहली. सूर्यनमस्काराचं छायाचित्रांसह पुस्तकही त्यांनी प्रसिद्ध करून लोकांना वाटलं होतं.

बऱ्याचदा शाळाशाळांमध्ये फिरून पंतप्रतिनिधी महाराज मुले सूर्यनमस्कार करतात का? त्यांना योग्य प्रकारचा आहार मिळतो का? याची स्वतः तपासणी करत. फक्त विद्यार्थीच नाही तर  रयतेला सूर्यनमस्कार करता यावेत म्हणून आपल्या राज्यात ठिकठिकाणी सूर्योपासना मंदिरे उभारली होती.

देशभरात सूर्यनमस्कारावर व्याख्यानासाठी त्यांना बोलावले जाई. सूर्यनमस्कार नेमके कसे करावेत व ऱ्हां ऱ्हीं उच्चार कसे असतात हे सगळ्यांना सहज समजावें म्हणून त्यांनी त्याकाळी सूर्यनमस्काराची एक फिल्म बनवली होती. 

१९३६ साली ते युरोपच्या दौऱ्यावर गेले होते त्यावेळी त्यांनी ती फिल्म अनेक देशांत दाखवली. इंग्लंडमधल्या व्यायाममंडळाना देखील हे व्यायामप्रकार दाखवले. काहीं पत्रकार विशेष उत्सुकतेने महाराजांची मुलाखत घेण्यास आले. तेव्हा त्यांच्यातील लुइस मार्गन नावाच्या लेखिकेने औंधच्या राजाची लंडन येथे सेव्हाय हॉटेलमध्ये गाठ घेतली. त्यांनी आग्रह केल्यामुळे महाराजांनी त्यांना तिथे समक्ष सूर्यनमस्कार घालून दाखवले.

निकोप शरीरप्रकृति सत्तरीमध्ये कशी या व्यायामानें राखतां येते हें त्यांना प्रत्यक्ष उदाहरणावरून पटवुन दिले.

लुईस मार्गन यांनी आपल्या वर्तमानपत्रात यावर लेख तर लिहलाच पण शिवाय महाराजांची परवानगीने Ten Point way to Health नावाचा ग्रंथ लिहिला जो आजही प्रसिद्ध आहे.

पण सर्वच वर्तमानपत्रांनी याचे स्वागत केले असं नाही. भारत अजूनही ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात होता. आपल्या गुलामीत असणाऱ्या देशातल्या राजाचा इतका उदो उदो होत आहे हे काही जणांना रुचत  नव्हते. अशातच एका पत्रकाराने संडे रेफ्री या वर्तमानपत्रात एक लेख लिहिला.

“भारतात अनेक व्यसनी व आचरट राजे आहेत. त्यापैके एक वयस्कर राजा आत्ताच लंडनमध्ये आलेला आहे. त्याला एका विशिष्ट अशा व्यायामाचे वेड आहे.त्याने हा व्यायाम आपल्या राज्यात सगळ्यांना घालण्याचा दंडक काढला आहे. विशेषतः तरुण मुलींना हा दंडक लागू आहे. या व्यायामामुळे मुली सुंदर व सडपातळ बनल्यावर त्यांना तो लगेच आपल्या जनाणखान्यात नेतो.”

या लेखामुळे फक्त औंधच्या राजाची नाही तर भारताच्या प्रतिष्ठेवर चिखलगाळ उडवण्यात आली होती. योगायोगाने औंध संस्थांचे युवराज अप्पासाहेब ऑक्सफर्ड विद्यापीठात आपले शिक्षण पूर्ण करून बॅरिस्टरची तयारी करत होते. त्यांनी लागलीच आपल्या वडिलांना पत्र लिहिले व सर्व प्रकार सांगितला.

या बदमाशांना कोर्टात खेचतो परवानगी असावी असं निरोप पाठवला.

यावर राजेसाहेबांनी त्यांना धीराचा सल्ला दिला. उलट टपाली त्यांनी युवराजांना पत्र लिहिले,

“हा परदेश आहे. इथले कायदे अलग आहेत हे विसरू नये. एखाद्याने आपल्यावर घाण टाकली म्हणून आपणही त्याच्यावर घाण टाकावी हे योग्य नव्हे.”

पण अप्पासाहेब ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी एका नामवंत सॉलिसिटरकडे हि केस दिली. नुकताच लंडनचा दौरा करून गेला असल्यामुळे औंधच्या महाराजांच्या बाजूने लॉर्ड ब्रेबॉर्न ते जज्ज किंकेड पर्यंत अनेक जण ओळखीचे झाले होते. महाराजांच्या चारित्र्याची खात्री त्यांच्याकडून करून घेता येणार होती.

संडे रेफ्रीवर खटला दाखल करण्यात आला. वर्तमानपत्राच्या मालकांचे धाबे दणाणले. योग्य तपासणी न करता लेख लिहिल्याबद्दल संबंधित पत्रकाराची कानउघडणी करण्यात आली व अप्पासाहेब पंतप्रतिनिधी यांच्याकडे अब्रुनुकसानि केल्याबद्दल माफी मागितली. या कोर्ट केसमुळे देखील सूर्यनमस्काराची व योगासन प्राणायाम ची चर्चा इंग्लंडमध्ये झाली.

कोर्टाने संडे रेफ्रीला दोन हजार पाउंड म्हणजेच ३० हजार रुपये दंड ठोठावला.

औंधच्या महाराजांनी सूर्यनारायणाची कृपा समजून ही रक्कम बँकेत ठेवली व त्यातुन येणाऱ्या व्याजातून ठिकठिकाणी श्री लाळे व श्री देशपांडे हे सूर्यनमस्कार प्रचारक भारतभरात फुकट पाठविले. तब्बल १४ वर्षे हे प्रचारक अनेक शाळांतील विध्यार्थी विध्यार्थींना नमस्कार शिकवत असत याचा सगळं खर्च संडे रेफ्रीच्या फंडातून केला जात असे.

असाहा आदर्शवादी राजा. आज जगभरात योगासन व सूर्यनमस्काराचे महत्व पोहचले आहे. वेगवेगळ्या योगगुरुना पाश्चिमात्य देशात प्रचंड मानलं जातं, भारताच्या योगसंस्कृतीचे पोवाडे गेले जातात. याचे सर्व श्रेय औंधच्या भवानराव पंतप्रतिनिधीना जाते.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.