औरंगाबादचा इतिहास आहे, ज्यांनी या गावावर विजय मिळवला त्यांनी तिथलं नाव बदललं.

ऐंशीचं दशक. महाराष्ट्रातील राजकीय पातळीवर बऱ्याच घडामोडी होत होत्या. १९८० ते १९८५ या पाच वर्षात महाराष्ट्राने ४ वेगवेगळे मुख्यमंत्री पाहिले होते. कॉंग्रेसमध्येच अंधाधुंदी निर्माण झाली होती. वसंतदादाचं सरकार पाडून कॉंग्रेसच्या बाहेर पडलेले शरद पवार विरोधी पक्ष नेतेपदाची भूमिका बजावत होते. भाजपच अजून बस्तान बसायचं होतं. इतर पक्ष क्षीण पडले होते.

महाराष्ट्रात कॉंग्रेसला मजबूत करण्यासाठी पंतप्रधान राजीव गांधीनी निर्णय घेतला की शरद पवारांना पक्षात परत आणायचं.

औरंगाबाद मध्ये सभा झाली. राजीव गांधींच्याशेजारी बसलेल्या शरद पवारांना पाहून मराठवाड्यातला तरुण कार्यकर्ता प्रचंड नाराज झाला. कॉंग्रेसला पर्याय बनू पाहणाऱ्या पवारांना सर्वात मोठी कुमक मराठवाड्याने दिली होती. ज्या गांधी घराण्याच्या विरोधात कॉंग्रेसच्या विरोधात शिव्या दिल्या आज त्यांच्याच सोबत जाव लागणार हे काही मराठवाड्याला रुचलं नव्हतं.

याच सैरभैर झालेल्या तरुणांनी एक नवीन पर्याय निवडला,

बाळासाहेब ठाकरेंची “शिवसेना”

यापूर्वी शिवसेना फक्त मुंबई ठाण्यापुरती मर्यादित होती.

तिची मुंबईबाहेर एकच शाखा होती तीही औरंगाबादेतच. याच काळात बाळासाहेबांनी निर्णय घेतला होता की महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपर्यात शिवसेनेला पोहचवायचं. प्रत्येक जिल्ह्यात संपर्कप्रमुख नेमण्यात आला. तेव्हाची घोषणाच केली होती,

“गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक ! “

पवारांच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे  दुखावलेले सगळे कार्यकर्ते एकएक करून शिवसेनेत दाखल होऊ लागले. शिवसेनेने नव्यानेच स्वीकारलेला जहाल हिंदुत्वाचा अवतार  जनतेला भावत होता. छगन भुजबळ आणि दादा कोंडके यांच्या साथीने बाळासाहेबांच्या वक्तृत्वाची मोहिनी ग्रामीण तरुणांवर पडली होती.

१९८७ उजाडलं आणि नांदेड लातूर सोडल तर मराठवाड्याच्या प्रत्येक गावाच्या वेशीवर शिवसेनेचा वाघ लोकांच्या स्वागतासाठी उभा ठाकलेला दिसू लागला. प्रत्येक गावात शिवसेनेच्या शाखेच उद्घाटन वाजत गाजत होऊ लागलं होतं.

त्याच वर्षी झालेल्या औरंगाबाद मधल्या २१६ ग्रामपंचायती निवडणुकीत ४५ जागी शिवसेनेचा भगवा फडकला होता.

याच दरम्यान भाजपने देखील अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली आपली हिंदुत्वाची भूमिका जहाल करायचा निर्णय घेतला. त्यांची शिवसेनेबरोबर युती सुद्धा झाली. भाजपचे प्रमोद महाजन बाळासाहेबांच्या सोबत मराठवाड्यातील सभा गाजवू लागले. केंद्रातील शहाबानो तलाक केस, राम मन्दिर हे प्रकरण तापू लागले होते.

अशातच १९८८ सालची औरंगाबादमधील महानगरपालिका निवडणुका शिवसेनेसाठी महत्वाची ठरली. शंकरराव चव्हाणांनी औरंगाबादचा पहिला मुस्लीम महापौर करण्याची घोषणा त्यांच्यावर उलटली. या निवडणुकीने मराठवाड्यात शिवसेनेचा पाया मजबुत झाला असल्याचं जाणवून दिलं. या विजयानंतर औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेबांची विजयी सभा झाली.

याच सभेत बोलताना शिवसेनाप्रमुखांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर ठेवत असल्याची घोषणा केली.

औरंगाबादचा इतिहास बघितला तर या गावावर विजय मिळवणाऱ्या प्रत्येकाने तीच नाव बदलण्याचा प्रयत्न केला आहे. अहमदनगरच्या निजामाचा वजीर मलिक अंबरने खडकी या छोट्याशा गावाला राजधानी बनवलं. त्याच्या मुलाने फतेह खानाने स्वतःच नाव देऊन खडकीला फतेहनगर बनवलं. पुढे आलेल्या औरंगजेबाने या फतेहनगरला स्वतःच्या नावावरून औरंगाबाद बनवलं.

गावाच नाव संभाजीनगर करणार ही घोषणा फक्त एक घोषणा नव्हती तर ती एक भावनिक साद होती. संभाजी महाराजांची इतिहासाने केलेली उपेक्षा भरून काढण्याचे आश्वासन होते. औरंगाबादच्या जनतेला ते प्रचंड भावले. ज्या गावात औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला या काळ्या इतिहासाचे डाग धुतले जाणार असच सर्वसामान्य नागरिकांना वाटत होत.

पुढच्याच वर्षी आलेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून मोरेश्वर साळवे निवडून आले आणि शिवसेनेचा पहिला खासदार लोकसभेत पोहचला. 

पुढच्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ११ आमदार मराठवाड्यातून निवडून आले. औरंगाबाद मध्ये मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनामुळे तर शिवसेनेला प्रचंड मोठे बळ मिळाले. १९९५ ला त्यांचे १५ आमदार एकट्या मराठवाड्यातून निवडून आले होते.

याच वर्षी शिवसेना-भाजप युतीचा भगवा झेंडा महाराष्ट्र विधानभवनावर फडकला. मनोहर जोशी मुख्यमंत्री बनले. सत्ता हाती येताच शिवसेनेने औरंगाबादच्या नामांतराचा विषय पुढे ढकलला. महापालिकेत गावाचे नाव संभाजीनगर करत असल्याचा ठराव पास झाला. मंत्रीमंडळ बैठकीतदेखील यावर शिक्कामोर्तब झाले. पण त्याविरुद्ध महानगरपालिकेचे नगरसेवक मुश्ताक अहमद न्यायलयात गेले. १९९९ ला शिवसेनेची सत्ता गेली आणि हा विषय मागे पडला.

तेव्हापासून हे भिजत घोंगडे तसेच आहे.

गेल्या तीस वर्षे शिवसेना या औरंगाबादच नाव संभाजीनगर करणार या मुद्द्यावर निवडणूक लढवते आहे. २०१४ पासून ते विधानसभेत सत्तेत आहेत. आता तर बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनलेत. पण कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीवर हे सरकार स्थापन झाले असल्यामुळे त्यांची अडचण झाली आहे.

मध्यंतरी मनसेने औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करावे हे आंदोलन सुरु करायचा निर्णय घेतला .

आता औरंगाबादच्या महानगरपालिका निवडणूक जवळ आल्या आहेत. महाविकास आघाडीत मांडीला मांडी लावून बसणारे काँग्रेस आणि शिवसेना हे संभाजी नगरच्या मुद्द्यावरून एकमेकांच्या आमने सामने आले आहेत. हे सगळं लांब कुंपणावर बसून बघणारे भाजप मात्र हि नूर कुस्ती आहे असा आरोप करत आहे. बघू आता याचा निकाल कधी लागतोय ते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.