औरंगाबादचा गणपती बाळासाहेबांना पावला, आत्ता वेळ एकनाथ शिंदेंची आहे..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. नाशिक, मालेगाव उरकून मुख्यमंत्री औरंगाबादला आले. मात्र काल रात्री अचानक दिल्ली वारी करावी लागली. त्यानंतर पहाटे पुन्हा ते औरंगाबादला आले आणि दौरा सुरू झाला.

पण आजच्या दौऱ्याची सुरवात झाली ती औरंगाबादचे ग्रामदैवत असणाऱ्या संस्थान गणपतीच्या दौऱ्याने. संस्थान गणपतीचे दर्शन घेणारे ते पहिले मुख्यमंत्री आहेत. पण यापूर्वी बाळासाहेबांनी या गणपतीचं दर्शन घेतलं होतं.

ही गोष्ट फक्त दर्शन घेण्यापुरती मर्यादित नव्हती तर बाळासाहेबांनी संस्थान गणपतीला नवस केलेला. बाळासाहेबांना संस्थान गणपती पावला देखील. त्यानंतर बाळासाहेबांकडून संस्थान गणपतीला सोन्याचा मुकूट करण्यात आला..

नेमका काय होता तो किस्सा…

तर गोष्ट आहे १९८८ सालची. औरंगाबादमध्ये महानगरपालिका स्थापन केल्यापासून पहिल्यांदाच निवडणूक होत होत्या. अख्ख्या महाराष्ट्रा साठी ही निवडणूक अनेक अर्थाने महत्वाची होती. कारण फक्त मुंबई पुरतीच मर्यादित आहे असं म्हटलं जाणारी शिवसेना मराठवाड्याच्या ग्रामीण भागात शड्डू ठोकून उतरली .

खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या लढ्याची कमान हाती घेऊन  सज्ज झाले होते.

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हे देखील मराठवाड्याचे होते. त्यांनी औरंगाबादच्या महानगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. त्यांनी एका सभेत जोरदार घोषणा केली होती,

औरंगाबादचा पहिला महापौर मुस्लिम व्यक्तीला करू.  

शंकरराव चव्हाणांचा दावा होता कि यातून धार्मिक सौहार्दता वाढेल. पण याचा परिणाम उलट झाला. या घोषणे नंतर धार्मिक तणाव वाढला. बाळासाहेबांनी औरंगाबादचे नाव संभाजी नगर करावे अशी मागणी करून धुरळा उडवून दिला. तिथली जनता शिवसेनाप्रमुखांची फॅन झाली. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होऊ लागली.

औरंगाबाद मधलं वातावरण फिरलं होतं मात्र हा वर्षानुवर्षे काँग्रेसचा बालेकिल्ला होता, तो सहजा सहजी पडणे अवघड होते.

एकदा बाळासाहेब निवडणुकीच्या प्रचाराची आखणी करण्यासाठी मिटिंग घेत होते तेव्हा त्यांना तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विनंती केली,

“साहेब महानगरपालिका जिंकायची असेल तर इथल्या संस्थान गणपतीला साकडं घालूया. हा देव नवसाला पावतो.”

बाळासाहेबांचा नशिबापेक्षाही स्वतःच्या कर्मावर विश्वास होता. पण कार्यकर्त्यांची इच्छा म्हणून ते याला तयार झाले. त्यांनी औरंगाबादच्या राजाबाजारात असलेल्या मानाच्या गणपतीचे दर्शन घेतले.

यश मिळू दे सोन्याचा मुकुट अर्पण करेन म्हणून साकडं घातलं.

बाळासाहेबांची हि छोटीशी कृती कार्यकर्त्यांच्यात उत्साह आणणारी ठरली. गणरायाचा कौल आपल्या बाजूने आहे या विश्वासाने शिवसैनिक तयारीला लागले. आकाश पाताळ एक केलं. प्रत्येक घराघरात जाऊन प्रचार केला.

बाळासाहेब आणि त्यांच्या शिवसैनिकांची भाषा रांगडी होती मात्र त्यांनी औरंगाबादकरांच्या भावनेला साद घातला होता. 

आणि चमत्कार घडला.

या निवडणुकीत शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आले तर काँग्रेसचे फक्त १८. औरंगाबादच्या महापालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा झळकला. विजयानंतर तिथल्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेबांची प्रचंड मोठी विजयी सभा झाली.

औरंगाबाद महानगरपालिकेचा विजय शिवसेनेसाठी ऐतिहासिक असा होता.

फक्त मुंबई -ठाणे या शहरापुरती लिमिटेड संघटना असं ज्याची खिल्ली उडवली जात होती तो पक्ष मराठवाड्याच्या ग्रामीण भागात पाळेमुळे रोवत आहे याच द्योतक होत. या विजयामुळे बाळासाहेबांना देखील आतापण महाराष्ट्र जिंकू शकतो याचा आत्मविश्वास आला  व त्यांनी पुढच्या काही वर्षातच विधानभवनावर देखील भगवा फडकवुन दाखवला. 

हे सगळं झालं  हा चमत्कार संस्थान  गणपतीच्या आशीर्वादामुळे घडून आला होता अशीच कार्यकर्त्यांची भावना होती. 

पुढे शिवसेनाप्रमुखांनी पैठणगेट येथून मुकुटाची रथात मिरवणूक काढली व गणपतीला मुकुट चढवला .

संस्थान गणपतीचे हे ऐतिहासिक मंदिर पावणेदोनशे वर्ष जुने आहे. डाव्या सोंडेच्या या गणपतीची ओळख नवसाचा गणपती अशी आहे. खुद्द लोकमान्य टिळक अनेकदा या गणरायाच्या दर्शनासाठी औरंगाबादला येत असत.

पूर्वी या मंदिराला प्रदशिणा घालण्यासाठी जागा नव्हती. १९६० साली मंदिराची व्यवस्था ट्रस्टकडे आली. ट्रस्टच्या वतीने १९८२ साली लाला लक्ष्मीनारायण, बाबुलाल पराती, बजरंगलाल शर्मा, लक्ष्मण शिंदे, नंदलालसेठ जैस्वाल, माणिकचंद गंगवाल, लखन पैलवान, बाबु उस्ताद यांच्या पुढाकाराने मंदिराचा जिर्णोध्दार करून संगमरवराचे सुंदर मंदिर उभारण्यात आले.

काळ्या पाषाणाचे मूळ स्वरूप असलेल्या या मूर्तीला शेंदूर लावण्यात आला असून आजही औरंगाबादमधल्या अनेकांच्या दिवसाची सुरवात संस्थान गणपतीच्या दर्शनानं होते.

गणेशोत्सवात दागिन्यांनी सजवलेली मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. संस्थान गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवात  मोफत आरोग्य तपासणी शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जनजागृती अभियान, धार्मिक विषयांवर प्रबोधन आदी सामाजिक उपक्रम राबण्यात येतात.

आत्ता हाच गणपती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पावतो का? शिवसेना ज्याप्रमाणे मराठवाड्यात रुजली तशाप्रकारे शिंदे गटाची ताकद मराठवाड्यात वाढवता येवू शकते का? हे येणारा काळच ठरवेल हे मात्र नक्की..

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.