औरंगाबादच्या भोगलेंनी भारतीय किचनला दिलेलं वरदान म्हणजे ‘निर्लेप तवा’

जर आपल्या आईला जगात लागलेला सर्वोत्तम शोध कुठला अस विचारलं तर ती सांगेल निर्लेप तवा. खरंच या निर्लेप तव्याने किती कष्ट वाचले, किचनमधलं जगण सुखकर झालं हे स्वयंपाक करणाऱ्यालाच माहित.

अशा या किचनचा वरदान समजल्या जाणाऱ्या निर्लेपचा शोध लावला एका मराठी माणसाने. नाव नीलकंठ गोपाळ भोगले.

वैद्यकीय क्षेत्रासाठी लागणारी उपकरणे बनवणे हा त्यांचा मुळ व्यवसाय. स्वतःचा मोठा कारखाना उभारायचं स्वप्न होत पण मुंबईसारख्या महागड्या ठिकाणी ते शक्य नव्हत म्हणून औरंगाबादला आले.

१२ जानेवारी १९६२ रोजी आईच्या नावावरून उमा सन्स इक्विपमेंट्‌स अँड ऍक्सेसरीज्‌ कंपनीची स्थापना केली.

औरंगाबादची इंडस्ट्री नव्यानेच मूळ धरू लागली होती. बरेच उद्योग नव्याने येत होते. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात  चमत्कार घडवून आणण्यासाठी हे नवे उद्योजक झटत होते. उमा सन्सचा मुख्य व्यवसाय  स्टेनलेस स्टीलवर अवलंबून होता. सिमेन्ससारखी मोठी कंपनी त्यांचे मार्केटिंग करत होती. अचानक त्याकाळात स्टेनलेस स्टीलवर सरकार बंदी घालणार अशी अफवा पसरली.

संकट हीच नव्या शोधाची जननी असते.

नीलकंठ भोगले यांनी देखील नवा मार्ग काय काढता येईल याचा शोध घेतला. संशोधन केल्यावर त्यांना कळाले की फ्लुऑन या विशिष्ट लिक्विडचे कोटिंग स्टीलवर केले, तर तो स्टेनलेस स्टीलला पर्याय होऊ शकतो. त्यांनी तातडीने ते लिक्विड मागविले. त्यासाठी त्यांनी त्याकाळचे 20 हजार रुपये खर्च केले.

पण ते फ्लुओन लिक्विड आले आणि सरकारने जाहीर केले की,

‘स्टेनलेस स्टीलच्या आयातीवर बंदी घालण्याचा कोणताही विचार नाही.’

नीलकंठ भोगले यांनी डोक्याला हात लावला. एवढा खर्चिक माल आता काय करायचा. त्यावेळी त्यांचा एक डॉक्टरमित्र नुकताच इंग्लंडला जाऊन परतला होता. युरोपमध्ये ही फ्लुऑन कोटिंग असलेली भांडी वापरली जातात आणि ही भांडी नॉनस्टिक असतात’, अशी माहिती त्याने दिली.

इसवीसन एकोणीशे तीसपासून जगभरात नॉनस्टिक भांडी बनवण्याचे प्रयत्न चालू होते. आज आपण पाहतो त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या रूपातली नॉनस्टिक भांडी तेव्हा बनायची.

भोगले यांनी हाच प्रयोग भारतात करण्याचे ठरविले. कोणतेही इंटरनेट व इतर सुविधा नसताना, कोणतीही बाहेरची मदत न घेता नीलकंठ भोगले व त्यांच्या भावांनी अनेक संशोधन करून ही भांडी बनवली. त्याचे अनेकदा प्रात्यक्षिक घेतले. गुणवत्तेच्या पातळीवर उतरल्याची खात्री पटताच भारतातला पहिला नॉनस्टिक पॅन बाजारात उतरवला.

हे साल होतं १९६८. या नॉनस्टिक भांड्याला नाव दिल निर्लेप. 

निर्लेपचा संस्कृत अर्थ होतो न चिकटणारा. हा अनोखा फ्राय पॅन सर्वात आधी मुंबईकरांच्या भेटीला आला. आणि अवघ्या काही दिवसात प्रचंड फेमस झाला. याची किंमत साध्या तव्याच्या कित्येक पट अधिक होती पण त्याच प्रमाणे स्वयंपाकघरात करावे लागणारे कष्ट देखील कित्येक पटीने कमी होणार होते.

भोगलेनी देशभर फिरून या तव्याचा लाइव्ह डेमो दिला. तव्यात अगदी सहज निघणारे डोसे पाहून तिथे जमलेले अनेकजण आश्चर्यचकित होत.

टीव्हीवर सुद्धा निर्लेपची जाहिरात झळकू लागली.  जिथे रोज डोसे उत्तापे बनतात  अशा ठिकाणी म्हणजेच विशेषतः दक्षिण भारतात या तव्याची जोरदार मागणी होऊ लागली. गंमत म्हणजे एरव्ही एखादी वस्तू मायदेशात गाजली की मग परदेशात निर्यात होऊ लागते. पण निर्लेप तवा जन्म झाल्यापासून जगभरात निर्यात होऊ लागला.

आजही भारतात नॉनस्टिकला समानार्थी शब्द म्हणून निर्लेपला मानलं जात.

या किचनच्या सोबत्याने भांडी धुण्याचे कष्ट तर कमी केलेच शिवाय तेल कमी वापरल्यामुळे आरोग्य तंदुरुस्त राहण्यास देखील मदत झाली. BHफक्त डोस्याचे तवे नाही तर किचनवेअरच्या अनेक व्हरायटीमध्ये निर्लेपने प्रवेश केलाय.

काही वर्षांपूर्वी हा ब्रँड बजाज इलेक्ट्रिकल्सने कोट्यावधी रुपयांना खरेदी केला. पण साठ वर्षांपूर्वी गुणवत्तेशी तडजोड करायची नाही हे तत्व अंगी बाणवल होत ते तत्व आजही पाळलं जात.

फक्त भारतातच नाही तर जगभरात निर्लेप हा सर्वोत्तम नॉनस्टिक ब्रँड मानला जातो याच सगळ श्रेय जात नीलकंठ भोगले यांच्या दूरदृष्टीला.

संदर्भ व फोटो –  ‘झेप’  दत्ता जोशी औरंगाबाद  

हे ही वाच भिडू.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.